पिटा कायद्यांतर्गत कारवाई करून सोडवणूक केलेल्या तिघींना पोलिसांच्या वाहनातून सेवाग्राम पुनर्वसन केंद्रात नेण्यात येत असताना रस्त्यात गाडीचा दरवाजा उघडून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात त्या जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी या तिघींविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पिंपरीच्या अजमेरा कॉलनी येथे पिटा कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत या तिघींची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना िपपरीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाचे कामकाज संपल्यानंतर महिला पोलीस शिपाई या तिघींना घेऊन पोलीस व्हॅनमधून हडपसर येथील पुनर्वसन केंद्राकडे निघाल्या होत्या. वाटेत हडपसर येथील गोसावी वस्ती येथे या तिघींनी महिला पोलिसाला धक्का देऊन गाडीच्या दरवाजाचे लॉक उघडले व काही कळायच्या आत तिघींनीही गाडीतून उडय़ा घेतल्या. या घटनेत तिघींनाही जखमा झाल्या आहेत.