अ‍ॅनिमेशन क्षेत्रात काम करण्याचे योगिनी ओझा या युवतीचे स्वप्न लीला पूनावाला फाउंडेशनच्या शिष्यवृत्तीमुळे साध्य झाले आहे. फाउंडेशनतर्फे तिला तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी दीड लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे.

प्रतिकूल परिस्थिती देखील योगिताच्या आकांक्षांना अडथळा होऊ शकली नाही. योगिनीचे वडील एका छोटय़ा ढाब्यामध्ये काम करतात. आतापर्यंत मुलीच्या भविष्यासाठी काही बचत करून त्यांनी तिला शिक्षण दिले. बी. टी. शहाणी नवीन हिंदू स्कूल येथे तिचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. अ‍ॅनिमेटर व्हावे हे तिचे स्वप्न होते. त्यासाठी बंडगार्डन येथील अ‍ॅरेना अ‍ॅनिमेशन येथे तिने प्रवेश घेतला. तिच्या चिकाटी आणि मेहनतीला दाद देत लीला पूनावाला फाउंडेशनने योगिनी हिला तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी दीड लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली आहे. माझ्या शिक्षणासाठी वडिलांनी केलेले कठोर परिश्रम प्रेरणादायी आहेत. आता अ‍ॅनिमेशनचा अभ्यास करण्यासाठी ही शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे मी खूप खूश आहे, अशी भावना योगिताने व्यक्त केली. या अभ्यासक्रमानंतर तिला आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळेल असे,अ‍ॅनिमेशनचे संचालक विवेक भिडे यांनी सांगितले.