मराठी साहित्यविश्वातील वर्तमान स्थिती-गतीची, घटना-घडामोडींची आस्थेने अन् आस्वादक चिकित्सा करणारे सदर..

‘कविता ही अगोदर कविता असली पाहिजे. मग ती कुणाचीही का असेना; कुठल्या लेबलाखाली (दलित, ग्रामीण, आदिवासी, पांढरपेशी, महानगरीय, इ. इ.) का असेना; त्याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही. विशिष्ट प्रकारच्या वर्गात वा गटात कवितेला बसवून तिचा त्या चौकटीत विचार करण्याचा दृष्टिकोन ‘कविता-रती’ने स्वीकारलेला नाही. तर कवितेचा कविता म्हणून विचार करण्याचं धोरण अंगीकारलं आहे..’

३ मार्च १९२८ रोजी जन्मलेले आणि १६ जानेवारी २०१७ रोजी ऐहिक जगाचा अखेरचा निरोप घेतलेले प्रा. पुरुषोत्तम पाटील (पुपा) यांनी ज्या द्वैमासिकाचे संपादन मोठय़ा निष्ठेने केले, त्या ‘कविता-रती’ची ही संपादकीय भूमिका. संपादकीय भूमिका ‘संपादकीय’मध्ये मांडून प्रत्यक्ष अंकात त्याच्या विपरीत वर्तन करणाऱ्यांपकी प्रा. पुरुषोत्तम पाटील नव्हते. गेल्या ३० वर्षांपेक्षा अधिक काळ चालू असलेल्या ‘कविता-रती’च्या अंकांमध्ये ज्या कवींच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत त्यांच्या नावांवर एक नजर टाकली तरी या संपादकीय भूमिकेशी प्रा. पाटील किती बांधील होते ते लक्षात येईल. द. मा. धामणस्कर यांच्यापासून ते मंगेश नारायणराव काळे यांच्यापर्यंत, अरुणा ढेरे यांच्यापासून ते प्रज्ञा दया पवार यांच्यापर्यंत, रजनी परुळेकर यांच्यापासून ते प्रवीण बांदेकर यांच्यापर्यंत.. यादीतील ही नावे केवळ उदाहरणांसाठी. किती रीतीच्या, किती विविधतेच्या कविता ‘कविता-रती’मध्ये प्रसिद्ध झाल्या व होत आल्या आहेत याची साधारण कल्पना या नावांवरून यावी. त्याखेरीज त्यात कविताविषयक प्रसिद्ध झालेले लिखाणही असेच चौफेर.

या द्वैमासिकाचा प्रारंभ सन १९८५ मधला. मराठी साहित्यक्षेत्रात वेगवेगळ्या पातळ्यांवर घुसळण घडवून आणणाऱ्या ‘सत्यकथे’चे शेवटचे पान कायमचे मिटून काही काळ उलटला होता. लघुनियतकालिकांना आलेला बहर ओसरत असल्याचा तो काळ. अशा काळात पुरुषोत्तम पाटील यांनी ज्या नियतकालिकाची सर्व पाने केवळ आणि केवळ कवितेसाठी व त्यावरील लिखाणासाठीच राखलेली असतील असे द्वैमासिक सुरू केले.. ‘कविता-रती’!

या द्वैमासिकाचा पहिला अंक निघाला तो ३० नोव्हेंबर १९८५ रोजी. (३० नोव्हेंबर हा बा. भ. बोरकर यांचा जन्मदिवस. ‘कविता-रती’ त्यांच्याच स्मरणार्थ निघू लागले.) या पहिल्याच अंकात पुरुषोत्तम पाटील यांनी त्यांची अंकाविषयीची भूमिका स्पष्ट केली होती. ‘विशिष्ट साहित्यप्रकाराचे संगोपन व विकास व्हावा या हेतूने ‘कविता-रती’ची मांडणी असेल. विशेषीकरणाच्या दिशेने वाटचाल करण्याचा आमचा नम्र प्रयत्न असेल,’ असा शब्द या पहिल्या अंकात देण्यात आला होता. हा विशिष्ट साहित्यप्रकार म्हणजे अर्थातच कविता. कविता म्हणजे जणू त्या, त्या भाषेच्या गाभ्याशी असलेले मोलाचे असे काही.. जणू बीजगर्भातील सृजनाचा नाद. तर अशा या कवितेचे संगोपन आणि तिचा विकास याबाबत प्रयत्न करण्याचा दिलेला शब्द पुरुषोत्तम पाटील यांनी अखेपर्यंत पाळला.. अगदी निष्ठेने पाळला. हे काम तसे सोपे नव्हते. आíथक, व्यावहारिक, मानसिक अशा सगळ्या पातळ्यांवर अडचणी आल्या, पण पुरुषोत्तम पाटील ‘कविता-रती’चे काम करीत राहिले ते कवितेवरील आंतरिक प्रेमापोटी. त्यांचे कवितेवरील प्रेम श्रद्धा म्हणावी अशा टोकाचे. पण ही श्रद्धा साच्यात न बसणारी. कुंपणात न राहणारी. म्हणजे ‘मला बोरकरांची कविता आवडते, तर नामदेव ढसाळ आवडून कसे चालतील?’ ‘मला बालकवींची कविता भावते, तर अरुण कोलटकर कसे भावतील?’, ‘मला शांताबाईंची शब्दांची गुंफण खूप जवळची वाटते, म्हणजे दिलीप चित्रेंना दूरच लोटायला हवे..’ असली अंधश्रद्धा पुरुषोत्तम पाटील यांच्यात नव्हती. आरती प्रभूंच्या शब्दांचा आधार घेऊन सांगायचे तर कवितेकडे पाहण्याचे डोळे पुरुषोत्तम पाटील यांना लाभले होते. ती नजर त्यांना लाभली होती. ही नजर कशी? स्वच्छ, निरभ्र, तरीही पारखी. कालच्या कविता निरखून पाहताना त्यांना आजच्या कवितेचेही भान होते आणि उद्याच्या कवितांविषयीही आस्था होती. म्हणून तर काळाचा एक मोठा कालखंड- ज्यात अनेक उलथापालथी झाल्या व त्या साहित्यात, कवितेत प्रतििबबित झाल्या- ते ‘कविता-रती’च्या माध्यमातून कवेत घेऊ शकले. काळाकडे उघडय़ा नजरेने बघू शकले.

‘कविता-रती’मधील प्रत्येक कविता उत्तमच होती वा उत्तमच असते असा दावा कुणी करणार नाही. स्वत: पुरुषोत्तम पाटील यांनीही तो केला नसता. त्यातील कवितांच्या दर्जाबाबत काही वेळा प्रश्नचिन्हे उपस्थित व्हायचीच. ती तशी व्हायलाच हवीत. पण प्रश्नचिन्हे उपस्थित झाली म्हणजे सारे श्रमच शून्य ठरतात असे नव्हे. उलट, अशी प्रश्नचिन्हे चच्रेला, सुधारणेला वाव देणारी ठरतात अनेकदा. अर्थात त्यासाठी तेवढी खुली दृष्टी हवी, हे महत्त्वाचे; जी पुरुषोत्तम पाटील यांच्याकडे होती. बा. भ. बोरकर, वि. स. खांडेकर यांचे लेखनिक म्हणून केलेले काम, ‘अनुष्टुभ’सारख्या दर्जेदार नियतकालिकाच्या संपादकपदाचा अनुभव, महाविद्यालयातील प्राध्यापकी अशा अनुभवविश्वातून पुरुषोत्तम पाटील यांची काव्यविषयक व एकूणच आयुष्यविषयक जाणीव समृद्ध, व्यापक होत गेली असावी का? शक्य आहे. पाटील हे स्वत: उत्तम कवी. मात्र, भारंभार लिहिणाऱ्यांतले नव्हेत. ‘परिदान’ व ‘तळ्यातल्या सावल्या’ एवढे दोनच कवितासंग्रह त्यांच्या नावावर. (‘तुकारामाची काठी’ आणि ‘अमृताच्या ओळी’ हे त्यांचे दोन लेखसंग्रह.) त्यांच्या कविता सौंदर्यवादी प्रवाहातल्या. पुरुषोत्तम पाटील यांचे लिखाण या प्रवाहातले असले तरी त्यांची अभिरुची मात्र कुठल्या एकाच प्रवाहाशी बद्ध अशी नव्हती. त्यामुळेच विविध प्रवाहांतील कवितांचा समुच्चय असलेले ‘कविता-रती’ ते इतकी वष्रे चालवू शकले. अर्थात ‘कविता-रती’ इतकी वष्रे चालवणे सोपे नव्हतेच. विशेषत: भौगोलिक व आíथक पातळीवर. ‘कविता-रती’चे.. म्हणजेच पुरुषोत्तम पाटील यांचे गाव धुळे. जे मुंबई-पुण्यासारख्या केंद्रांपासून खूपच दूर. त्या अर्थाने आडवाटेवरचे. शिवाय, सरकारी अनुदान घ्यायचे नाही, ही पुरुषोत्तम पाटील यांची भूमिका. त्यामुळे कारभार चालणार तो वर्गणीदार व हितचिंतक यांच्या बळावर. ‘कविता-रती’ची आत्ताचे वर्गणीदार तेराशेच्या घरात. (वर्गणीदारांपैकी साधारण निम्मेच लोक नियमित वर्गणी देतात, असे खुद्द पुरुषोत्तम पाटील यांनी काही काळापूर्वीच्या मुलाखतीत नमूद केले होते!) त्याची वार्षकि वर्गणी २०० रुपये.  म्हणजे हा अंक काढणाऱ्यांना आíथक फायदा काय होणार, याची कल्पनाच केलेली बरी. असल्या व्यवहारांत बेरजेपेक्षा वजाबाकी आणि गुणाकारापेक्षा भागाकारच अधिक असायचा! पण या वजाबाकीची वा भागाकाराची फिकीर न करता पुरुषोत्तम पाटील ‘कविता-रती’ एखाद्या व्रतस्थाप्रमाणे काढत राहिले. अंकाच्या अथपासून इतिपर्यंतच्या जबाबदाऱ्या- कवितानिवड, मुद्रितशोधन, अंक पाकिटांत भरून त्यावर टपाल तिकिटे डकवणे, पाकिटे पोस्टात टाकणे- ते आनंदाने उचलत राहिले. माणूस प्रसिद्धीपासून दूरच राहणे पसंत करणारा. त्यामुळे संस्थांतील राजकारण, पुरस्कारांची गणिते, वादांचे आखाडे, हितसंबंधीयांचे कोंडाळे, त्यातून स्वत:चे हित साधून घेणे अशा सगळ्याच गोष्टी वज्र्य.

सहाशेपेक्षा अधिक कवींना आपल्या अंकाचे व्यासपीठ खुले करून देणाऱ्या या माणसाकडून खूप काही शिकण्यासारखे. ही शिकवणूक कुणासाठी? आपली कविताच खरी, आपलीच कविता सर्वश्रेष्ठ असे मानणाऱ्यांसाठी, कवितेचे एखादे पुस्तक निघाले की अंगावर मूठभर मांस चढवून उगाचच स्वत:ची सावली मोठी झाल्याचा आव आणणाऱ्यांसाठी, नियत/अनियतकालिके काढतो म्हणजे जणू काही मराठी व मराठीजनांवर उपकार करतो अशी भावना बाळगणाऱ्या मंडळींसाठी, आणि कवितेवर निस्सीम प्रेम करणाऱ्या चाहत्यांसाठीही. पुरुषोत्तम पाटील यांच्यासारखी माणसे आणि ‘कविता-रती’सारखी नियतकालिके साहित्याच्या संवर्धनासाठी, विकासासाठी मोलाची असतात. हे असे काही मोलाचे टिकवून ठेवणे ही जबाबदारी आपली. या जबाबदारीचे भान आपण राखायला हवे.

‘मी तसं एक लहानसं झाड,

पान-फूल गळून पडल्यानंतर,

फळभाराचा अखेरचा मोसम संपल्यानंतर

मी वठून जाईन,

हे तर खरंच.

जे वैभव

ऊन-पाऊस-वारा-मातीच्या कृपेने

मला मिळालं

ते मी माणसांना भरभरून दिलं.

आणखीही द्यायचं आहे-

मी वठल्यावर

माझं लाकूड कामाला येईलच.

पण त्याचं

टेबल, खुर्ची, कपाट वगरे

काहीही बनवू नका.

फक्त

एक छानशी खिडकी तयार करा-

जिच्या चौकटीवर हात ठेवून

कुणीतरी व्याकूळ प्रेयसी

बाहेर बरसणाऱ्या मेघांकडे

डोळाभर तरंगणाऱ्या आसवांतून नजर लावून

आपल्या प्रियकराची वाट पाहात असेल..’

ही कविता पुरुषोत्तम पाटील यांचीच. त्यातील संदर्भ थोडे बदलून बोलायचे तर त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी कवितांची एक छानशी, लख्ख खिडकी खुली करून ठेवली आहे. जिच्या चौकटीवर हात ठेवून कवितांचा निभ्रांत आनंद आपल्याला घेता येऊ शकेल. डोळाभर तरंगणाऱ्या आसवांतून नजर लावून नव्हे, तर कवितानंदाची निखळ जाणीव डोळ्यांत साठवून.. आणि पुरुषोत्तम पाटील यांची आठवण मनात साठवून.

राजीव काळे rajiv.kale@expressindia.com