किराणा घराण्याच्या दिवंगत गायिका गंगुबाई हनगल यांचा जीवनपट उलगडणारं हे पुस्तक तीन सप्तकांत फिरतं..  कर्नाटक संगीतापासून हिंदुस्थानी संगीतापर्यंत झालेला त्यांचा प्रवास व त्या निमित्तानं त्या काळाचा इतिहास, शिक्षण आणि त्यानंतरचं  गंगुबाईंचं सांगीतिक कर्तृत्व, तसंच गंगुबाईंचं कौटुंबिक जीवन अशा तीन पातळय़ा समजून घेताना, लेखिकेनं गंगुबाईंवरचे काही आक्षेपही मांडले आहेत..
भारताचे कलाविश्व जातीने कलावंत म्हणून जन्माला आलेल्या कलाकारांनी समृद्ध केले आहे. ‘चांगल्या घरातील’ स्त्रियांनीच नव्हे तर पुरुषांनीसुद्धा कलाकार म्हणून जगणे समाजाला मान्य नव्हते. या कलांचा उपभोक्ता म्हणून आस्वाद त्यांनीच घ्यायचा पण पेशा मात्र कलावंतानीच करायचा. कला मानवाला अभिव्यक्तीच्या एका श्रेष्ठ उंबरठय़ावर नेऊन ठेवतात. परंतु कलावंताना एका जातीत ढकलून, त्यांच्या भोवती हीनपणाचे, नियमाचे बंध गुंडाळून त्यांच्याही आविष्काराला समाजाने कुंपण घातले आहेत. उत्स्फुर्ततेने, सहजपणे व्यक्त होते ती कला. जातीनिहाय विहित कार्य म्हणून करायचे ते पोटार्थी काम. या जातीत जन्माला आल्यामुळे बहुसंख्यांनी हे काम केले पण त्याला कला म्हणून मान कधीच मिळाला नाही. यातूनच काहींनी उत्तमाचा ध्यास घेतला व नावही कमावले. त्यांना समाजात आदर तसेच मान त्याचबरोबर अपमानही मिळाला. या सगळ्यांचा जीवनप्रवास जाणून घेताना वाटत राहते की यांना जर आस्तित्वासाठी एवढा झगडा करावा लागला नसता, तर त्यांची कला यापेक्षा जास्त बहरली असती का? दीपा गणेश यांनी श्रीमती गंगुबाई हनगल यांचा जीवनप्रवास रेखाटताना, आपल्या संशोधनाची चौकट अतिशय रुंद ठेऊन अनेक प्रश्न व विविध प्रकारची माहिती आपल्या समोर ठेवली आहे. बंगळुरुहून हुबळीचाचा सतत प्रवास करून, गंगुबाईच्या घराला भेटी देऊन, शक्य तेवढी माहिती लेखिकेने जमा केली आहे. आपल्याला साधारणत: हिंदुस्तानी शास्त्रिय संगिताच्या भौगोलिक क्षेत्रातील घडामोडींची माहिती लेखिकेने जमा केली आहे. आपल्याला साधारणत: हिंदुस्थानी शास्त्रीय संगिताच्या भौगोलिक क्षेत्रातील घडामोडीची माहिती असते पण दक्षिणेत व कर्नाटक संगिताच्या क्षेत्रात काय घडले या विषयी आपल्याला माहिती नसते. ती तिने दिली आहेच पण कानडी बोलणारे, उत्तर कर्नाटकातून आलेले आपले दिग्गज गायक, हिंदुस्तानी गायकीकडे का व कसे वळले हेही कुतूहल या पुस्तकामुळे काहीसे शमते. याचे जास्त विवरण अमिरबाई कर्नाटकीवरील पुस्तकही देते.
आमच्या पिढीला गंगुबाईना खूप ऐकण्याचे भाग्य लाभले. पुस्तक वाचताना दीपा त्यांच्या व्यक्तीमत्वाचे वर्णन करते. साध्या, सौजन्यमूर्ती, गाणे मात्र दमदार- हे वर्णन पटते. गंगुबाई स्वत:च हसून दीपाला म्हणतात की टॉन्सील्सचे ऑपरेशन होण्यापूर्वी त्यांचा आवाज पातळ व कोमल होता. त्यानंतर मात्र तो असा झाला की लोक म्हणायचे की ही गंगुबाई ही गंगुबुवा? त्या आवाजाला, प्रचंड मेहनत करून, त्यांनी गोलाई व माधुर्य प्राप्त करून दिले. गाण्याच्या प्रती अपार निष्ठा असल्याने त्यांनी प्रत्येक मैफिल गांभीर्याने घेतली व त्यामुळे त्यांची एकही मैफिल पडल्याचे आठवत नाही. गाणे गांभिर्याने घेण्याचे संस्कार त्यांच्यावर त्यांची आई अंबाबाई यांनी केले. त्या स्वत: कर्नाटक संगीताच्या गायिका होत्या. दीपा लिहितात की त्यांची विद्वत्ता एवढी होती की, अब्दुल करीम खांनसाहेब हुबळी-धारवाडच्या बाजूला असले तर अंबाबाईच्या घरी येऊन, त्याच्याशी संगीतावर चर्चा करूनच, पुढे मिरजेला जायचे. गंगुबाईना हिंदुस्तानी संगीताची आवड लागण्यास कारणीभूत म्हणजे भारतात ग्रामोफोनचे आगमन व गंगुबाईच्या घराजवळ संगीतशौकीनाचे असलेले दुकान! त्या दुकानात गौहरजानच्या रेकॉर्डस् सतत लागलेल्या असायच्या व शाळकरी गंगुबाई त्या ऐकून स्वत:शी ते सतत गुणगुणत असायच्या. दीपाने हिंदुस्तानी संगीत, दक्षिणेत रुजवण्यात, मैसूरच्या वोडियार राजाच्या हातभाराचे सविस्तर विवेचन केले आहे. पण मैसूर तसे त्या काळच्या मानाने खूपच दूर होते पण तिने उल्लेखलेल्या लिंगायत मठाचे योगदान ताडून पाहण्यासाठी आवश्यक तळटीपा नाहीत व संदर्भग्रंथाच्या सूचीत तसे पुस्तकही नाही. अमीरबाईच्या पुस्तकात मराठी नाटकांचा प्रभाव व त्यामुळे हिंदुस्तानी संगीताचा प्रसार याचे सविस्तर विवेचन आले आहे. शिवाय उत्तर कर्नाटक मुंबई इलाख्याचा भाग होते. सीमेवरील प्रदेश असल्याने सर्वसाधारणपणे कानडी व मराठी या दोन्ही भाषा येथे बोलल्या जायच्या. शिक्षणासाठी पण मराठी प्रदेश जवळ पडायचा. या कारणामुळे सांस्कृतिक दृष्टय़ाही मराठी व कानडीत भगिनीभाव जास्त होता. याचा पुस्तकात उल्लेख नाही. तिकडून आलेले सर्वच गायक मराठी उत्तम बोलायचे व बोलतात.
अंबाबाईनी त्याच्यासाठी हिंदुस्थानी संगीत शिकवणाऱ्या गुरूचा शोध सुरू केला. तो रामभाऊ कुंदगोळकर उर्फ सवाई गंधर्व यांच्यापाशी येऊन थांबला. या गुरूंकडून त्यांना किराना घराण्याच्या गायकीचे प्रशिक्षण मिळाले. या शिक्षणाचे दीपाने चांगले वर्णन केले आहे. त्या रोज हुबळीहून कुंदगोळला आगगाडीने यायच्या व संध्याकाळी परत जायच्या. त्याकाळी त्यांचे सहाध्यायी होते भीमसेन जोशी. भीमसेन गुरुगृही राहूनच गाणे शिकत होते. त्याकाळच्या रीतीप्रमाणे त्यांना घरची कामे बरीच करावी लागायची व गाणे कानावर पडले ते रियाज करून लक्षात ठेवावे लागायचे. गंगुबाईना उशीर झाल्यास भीमसेन मोठय़ा आनंदाने त्यांना स्टेशनपर्यंत पोचावायचे. रस्त्यात गाण्यावरीलच गप्पा व गंगुबाई नवीन काही शिकल्या असल्याची दोघांची उजळणी यामुळे त्यांच्यात भावबहिणीचे नाते तयार झाले व शेवटपर्यंत दोघांनी ते टिकवले. सुरवातीला सवाई गंधर्व गाण्याच्या दौऱ्यावर बरेच असायचे. गंगुबाईवर कुटुंबाची जबाबदारी खूपच होती. स्त्रियांनी गाणे गाऊन कमवायचे व घरातल्या पुरुषांनी त्यांच्या सहाय्यकाची भूमिका पार पाडायची अशी रीत होती. प्रथम गंगुबाईचे मामा व ते वारल्यावर त्यांच्या मोठय़ा मुलाने ही भूमिका पार पाडली. स्वत:ची तीन मुले व मामाने कुटुंब यासाठी पैसे कमावणे भाग होते. त्यांच्या यजमानांची वा त्यांच्या वडिलांची यात काहीच मदत वा भूमिका नव्हती. त्यांची ती धडपड व त्यामुळे करावे लागलेले कष्ट तसेच तडजोडी याचे चांगले चित्रण दीपाने केले आहे. त्यांचे मामा काय वा त्यांचा मुलगा यांच्याशी गंगुबाईचे संबंध परस्परावलंबीताचे होते. या नात्याने वर्णन सहृदयतेने केलेले आहे. विशेष मुलगा शिकलेला असून आईच्या गरजेपोटी त्याला ही भूमिका निभवावी लागली. तेच कृष्णा या त्यांच्या मुलीबद्दल म्हणता येईल. त्यांना गंगुबाईकडून मिळालेल्या वागणुकीबद्दल लेखिकेचा सूर किंचित टीकात्मक लागला आहे व तो गैर आहे असे वाटत नाही. आधी आजारी म्हणून व मग तंबोला घेऊन मागे साथ करताना मायलेकी कायम बरोबर असायच्या. त्यांच्या मैफिली ऐकताना, कृष्णाचा सुरेल आवाज व तयारी बघता वाटायचे की यांचे स्वतंत्र गायन ऐकायला मिळावे. आजारी म्हणून त्यांना कधी पद्धतशीर तालीम मिळाली नाही. आईचे ऐकतच त्या शिकल्या व साथ करत गेल्या. त्यांच्या लग्नाचेही प्रयत्न, ‘तिला झेपणार नाही, तिला मुलाबाळांचे करणे जमणार नाही’ या सबबीवर टाळले गेले. दीपाचे म्हणणे की याबद्दल तिला कधी विचारलेच नाही की तिला काय हवय! तिचा स्वतंत्र कार्यक्रम ठरवण्यासाठी लोक आले तर त्या म्हणाल्या, ‘माझ्या बरोबर ती येईलच की!’ पुस्तक त्या वेळची सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन लिहिले आहे व सांस्कृतिक इतिहासात चांगली भर पडली आहे हे नक्की.
थ्री एसेज कलेक्टीवने, नेहमीप्रमाणे अपार मेहनत घेऊन हे पुस्तक तयार केले आहे. म्हणजे निर्दोष छपाई. उत्तम कागद व संदर्भाला आवश्यक ते फोटोग्राफ्स. व्यवसाय करताना पण पुस्तकांविषयी वाटणारे प्रेम व विषयाबद्दलची आस्था कळून येते.

* अ लाईफ इन थ्री ऑक्टेव्ह्ज : अ म्युझिकल जर्नी ऑफ गंगुबाई हनगल.
लेखिका :  दीपा गणेश
प्रकाशक : थ्री एसेज कलेक्टिव्ह, गुडगांव
पृष्ठे : २२० किंमत  ६०० रु.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?