‘टोटल’ या फ्रेंच तेलकंपनीचे प्रमुख (सीईओ) ही ख्रिस्तोफ द मार्गेरी यांची ओळख फक्त २०१२ पासून होती. पण रशियातील विमानतळावर मंगळवारच्या (२१ ऑक्टो.) पहाटे झालेल्या अपघाती मृत्यूनंतर ‘तेलविश्वातील वादळी व्यक्तिमत्त्व’ ही त्यांची आद्य ओळख कायम राहणार की ‘तेलक्षेत्रातील जागतिक मुत्सद्दी’ असा सकारात्मक लेप त्यांच्या वर्णनास मिळणार, एवढाच प्रश्न आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील हे वादळीपण प्रथम लक्षात आले १९९५ नंतर, त्यांनी ‘टोटल’चे पश्चिम आशियातील प्रमुख म्हणून काम करण्यास सुरुवात केली तेव्हा. तोवर अरबांकडील तेलावर अमेरिकेची आणि काही प्रमाणात ब्रिटनची पकड होती. ती ढिली करण्याचे प्रयत्न ख्रिस्तोफ यांनी केले. इतके की, आजघडीला पाश्चात्त्य तेलकंपन्यांमध्ये ‘टोटल’चा क्रमांक चौथा लागतो. इराणशी १९९५-९६ मध्ये त्यांनी केलेले तेलकरार वादग्रस्त ठरवण्याचे राजकारण अमेरिकेने केले होते, तेव्हापासून ख्रिस्तोफ यांच्या नावाचा दबदबा सुरू झाला.
तेलक्षेत्रात आपापले व्यावसायिक संबंध राजकारणाच्या पडद्याआडच राहून जपायचे आणि त्यासाठी आडून-आडूनच राजकीय निर्णय करवून घ्यायचे, ही अमेरिकी तेलकंपन्यांच्या धुरिणांची पद्धत ख्रिस्तोफ यांनी नाकारली. इराकमधील तेलविहिरींच्या १९९७ मधील करारासाठी त्यांनी बडय़ा इराकी राजकारणी व नोकरशहांना तब्बल दोन अब्ज लाच दिल्याचा आरोप २००७ साली झाला. त्यापायी ‘टोटल’ या कंपनीला या विहिरींच्या मूळ अमेरिकी नियंत्रकांकडे ३९ कोटी ८० लाख रुपयांचा दंडही भरावा लागला, पण ख्रिस्तोफ यांच्यावर वैयक्तिक दोषारोप झाला नाही. तोही त्याच वर्षी (२००७) आणि इराकबाबतच झाला, परंतु हा त्यांनी इराकमधील ‘तेलाच्या बदल्यात अन्न’ कार्यक्रमात गैरव्यवहार केल्याचा होता. त्यातून ते सहीसलामत सुटले. एवढे सारे होऊनही त्यांची प्रतिमा फार मलिन झाली नाही; त्यामागे निव्वळ जनसंपर्काचे यश नसून ख्रिस्तोफ यांच्या भूमिका अत्यंत व्यवसायनिष्ठ होत्या, हे कारण होते. युक्रेनमध्ये रशियाची घुसखोरी सुरू असतानाही ‘युरोपने तेलक्षेत्रात रशियाची भागीदारी तोडू नये’ हा आग्रह त्यांनी जपला.  ‘नव्या बर्लिनभिंती उभारायच्यात का आपण?’ हा त्यांचा सवाल तर भल्याभल्यांना गप्प करणारा ठरला. त्यांच्या ब्रशाळ मिशांप्रमाणेच उग्र, पण बुद्धिमान असे हे व्यक्तिमत्त्व होते.
 ‘इकोल सुपेरिउर द कॉमर्स’मधून एमबीए झालेले ख्रिस्तोफ, केवळ ‘घराजवळच या कंपनीचे मुख्यालय आहे, हे बरे!’ एवढय़ाच विचाराने १९७४ साली ‘टोटल’ तेलकंपनीत शिकाऊ अधिकारी म्हणून लागले होते. अन्य क्षेत्रांत ‘चांगली संधी’ त्यांनी शोधली असती, तर जगाचा तेल-नकाशा कदाचित बदलला नसता!