देकार्तचे झाड ज्ञानाचे फळ असलेल्या सामाजिक नीतीपासून सुरुवात करते आणि शेवटी मूळरूप असलेल्या ईश्वराकडे जाते. देकार्तचे झाड नीतीवर व समाजधारणेवर भर देते, तर श्रीकृष्णाचे झाड ज्ञानावर व मोक्षावर भर देते.   
‘‘अश्वत्थ: सर्ववृक्षाणां .. सिद्धानां कपिलो मुनि:’’ – ‘‘सर्व वृक्षांमध्ये अश्वथ मी..’’ योगेश्वर श्रीकृष्ण संभ्रमित अर्जुनाला उपदेश करतो (गीता १०.२६ विभूतियोग) आणि काही क्षणांनी, तो स्वत:च परम ईश्वर असल्याने आत्मरूपाचे गुह्य़ प्रगट करतो – ‘‘ऊध्र्वमूलमध: शाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् । छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् (गीता १५.१.. पुरुषोत्तम योग)   याचा अर्थ असा : मूळ (जे एक) वर आहे आणि शाखा (ज्या अनेक) खाली आहेत, जो अव्यय (कधीही नाश न पावणारा), छंदासि – म्हणजे वेद ही ज्याची पाने आहेत, असा हा अश्वत्थ वृक्ष जो जाणतो तो पुरुष (जीव) तोच खरा वेदवेत्ता होय.   
अश्वत्थ म्हणजे िपपळ. श्रुति-ग्रंथातून परमेश्वराचे येणारे अश्वत्थवृक्षरूपाचे हे वर्णन सांख्य दर्शनातील ‘प्रकृतीचा पसारा’ जोडून पूर्णत्वास पोहोचते. सृष्टीचा हा पसारा म्हणजेच अश्वत्थ वृक्ष. ‘‘क्षर आणि अक्षर यांच्या पलीकडे पुरुषोत्तम असतो, त्याला तू जाण! त्याची ‘भक्ती’ केल्याने जीवन कृतकृत्य होते. तसे, हे पार्था तू कर,’’ असे योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतो. पुढे श्रीकृष्ण या अध्यायात ब्रह्मवृक्षाचे सविस्तर वर्णन करतो. पुरुषोत्तम योगाच्या पहिल्या तीन श्लोकांत जणू सार आहे. त्यांचा विनोबांनी सोप्या मराठीत अर्थ सांगितला.
 खाली शाखा वरी मूळ नित्य अश्वत्थ बोलिला ।
ज्याच्या पानांमधे वेद जाणे तो वेद जाणतो ।। १।।
वरी हि शाखा फुटल्या तयास । ही भोग-पाने गुण-पुष्ट जेथे ।।
खाली हि मूळे निघती नवीन । दृढावली कर्म-बळे नृ-लोकी ।। २ ।।
ह्य़ाचे तसे रूप दिसे न येथे । भासे न शेंडा बुडखा न खांदा ।।
घेऊनि वैराग्य अभंग शस्त्र । तोडूनिया हा दृढ-मूल वृक्ष ।। ३ ।।
अफाट भारतीय विचारविश्वातील ज्ञानवृक्षाचे माहात्म्य अगाध आहे. सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त तो बोधिवृक्ष, जैन साहित्यातील चत्यवृक्ष हे ज्ञानवृक्ष मानले गेले. वैदिक साहित्यात मात्र अध्यात्माचे झाड दोन रीतीने आढळते. झाडाची उपमा सुस्पष्ट व निर्णायक रीतीने प्रथम श्रीमद्भागवतगीतेत येते आणि नंतर शुक्रनीतीमध्ये येते आणि ही उपमा निरंतर अनेक पद्धतीने भारतीय साहित्यविश्वात आणि विचारविश्वात येत राहाते.  
ज्ञानेश्वरीत पंधराव्या अध्यायात पहिली ओवी ते २६५ व्या ओवीपर्यंत अश्वत्थाचे आध्यात्मिक वर्णन आहे. लोकमान्य टिळकांनी (१८५६-१९२०) निरूपण करताना श्रीकृष्णाच्या अश्वत्थमाला ब्रह्मवृक्ष आणि संसारवृक्ष म्हटले असून ते एकच आहेत, असे निवेदन केले. हा अश्वत्थ विचार कुठून कसा आला याची सविस्तर माहिती लोकमान्य देतात.     
वृक्षाची दुसरी उपमा आढळते ती शुक्रनीतीमध्ये. आचार्य कौटिल्याने राज्याची सात अंगे मानली. स्वामी (राजा), अमात्य, जनपद, दुर्ग, कोष, दंड आणि मित्र यांना सप्तांगे किंवा सप्तप्रकृती म्हणतात. थोडय़ाफार फरकाने शुक्र (शुक्राचार्य?), मनु, भीष्म यांनी हेच घटक मान्य केले आहेत. शुक्राने त्यांची तुलना मानवी शरीराशी केली आहे. त्याचबरोबर शुक्राने अन्यत्र राज्याला वृक्षाची उपमा दिली आहे. (राज्य वृक्षस्य नृपतिर्मूलं स्कंधाश्च मंत्रिण: शाखा: सेनाधिपा: सेना: पल्लवा: कुसुमानि च // प्रजा: फलानि भूभागा बीजं भूमि प्रकाल्पिता – शुक्रनीति  ५/१२  ..). म्हणजे ‘‘राज्य हा एक वृक्ष आहे, असे कल्पिले तर, राजा हा त्याचे मूळ, मंत्री हा बुंधा, सेनापती- फांद्या, सन्य ही पाने व फुले, प्रजा हे फळ आणि भूभाग ही जमीन.  
आता, आपल्यापुढील समकालीन समस्या आहे ती या अश्वत्थवृक्ष आणि राज्यवृक्ष या दोन ज्ञानवृक्षांतील कोणते झाड स्वीकारायचे? श्रीकृष्णाचे झाड स्वीकारायचा प्रश्न उरला नाही. तो परंपरेने दिला आहे. त्या झाडाच्या पानांच्या गर्दीत (वैदिक संस्कृतीत) शुक्राचार्याच्या झाडाचे, राज्यवृक्षाचे मूळच उखडले गेले. कुणालाही ते आठवत नाही. ते राज्यशास्त्राचा अभ्यास विषय नाही. लोकांमध्ये ते पसरलेच नाही. त्याचे पुनरुज्जीवन करायचे का?    
देकार्तने मांडलेली ज्ञानवृक्षाची संकल्पना आपण भारतीय तत्त्वज्ञान समजावून घेण्यासाठी उपयोगात आणता येईल का? श्रीकृष्णाचे झाड पाने, शाखांपासून (वेद्ज्ञानापासून) सुरुवात करते आणि अंतिम टोकाला जाऊन मोक्ष पावते. देकार्तचे झाड ज्ञानाचे फळ असलेल्या सामाजिक नीतीपासून सुरुवात करते आणि शेवटी मूळरूप असलेल्या ईश्वराकडे जाते. देकार्तचे झाड नीतीवर व समाजधारणेवर भर देते, तर श्रीकृष्णाचे झाड ज्ञानावर व मोक्षावर भर देते.    
देकार्तच्या भाषेत, भारतीय ज्ञानवृक्षाची मुळे म्हणजे भारतीय सत्ताशास्त्र. ते वैदिक उपनिषदे, बौद्ध त्रिपिटके व आगम ग्रंथ आणि जैन सिद्धांत अथवा ‘आगम ग्रंथांनी समृद्ध आहे. प्राचीन भारतात काहीएक विज्ञान होतेच. तेव्हा, त्यांना या वृक्षाचा बुंधा मानता तर त्यांनी समाजात कोणती फलरूपी नीती विकसित केली? जे मुळात आहे ते फळात का उतरले नाही?   
संत परंपरेने, भक्ती संप्रदायांनी कितीही भगवत भक्तीचा महिमा सांगताना आध्यात्मिक समता, बंधुता, िलगभेदाविरुद्ध आवाज उठवला तरी या साऱ्या शोषक व्यवस्था का टिकून राहिल्या? भारतीयांनी यंत्रे किती शोधली, अभियांत्रिकी किती शोधली, ती समग्र समाजासाठी किती उपयोगात आणली हा शोधाचा, संशोधनाचा विषय आहे; पण प्राचीन भारतीय विचारवंतांनी (आधुनिक भाषेत मांडावयाचे तर ‘सामाजिक अभियांत्रिकांनी’) भारतीय समाजाचे रूपांतर वर्णजातीिलगभेदाच्या अभेद्य दैवी यंत्रात करण्यात मात्र दिग्विजय मिळविला आहे, असे अतिशय मार्मिक निरीक्षण भारतीय तत्त्ववेत्ते प्रो. सुरेंद्र बारिलगे नोंदवितात.     
भारतीय संस्कृतीचे अत्यंत उच्च दर्जाचे आध्यात्मिक विचार आणि नीच दर्जाच्या राजकीय व सामाजिक आचाराकडे भावनिकदृष्टय़ा न पाहता, फुले-आंबेडकर-शाहू किंवा अन्य कुणी मार्क्‍सवादी, समाजवादी, अन्य भूतदयावादी माणूस ज्या अभिनिवेशाने पाहू इच्छील त्याहीपेक्षा तर्ककठोरदृष्टीची नितांत गरज आहे. उच्च विचारांचे रूपांतर नीच आचारात का होते, याची समीक्षा तुकोबांच्या ‘बुडती हे जन न देखवे डोळा। येतो कळवळा म्हणउनि।’ या कारुण्यप्रीतीने झाले पाहिजे.  
महर्षी शुक्राचार्यानी प्रजा हे राज्याचे म्हणजे राज्यव्यवस्थेचे फळ म्हटले आहे. भारतात या फळाची प्रतवारी काय दर्जाची आहे? स्वरूप पाहिले तर प्रजेला जी काही ‘फळे भोगावी’ लागतात, त्यामुळे त्यांना ‘‘हेचि फळ काय मम तपाला!’’ म्हणायची वेळ येते. विद्यमान राज्यकर्त्यांनी आणि त्यांच्या नोकरशाहीने या फळांच्या शोषणाची अशी काही यंत्रणा उभी केली आहे की ही सारी फळे रसहीन, बेचव झाली आहेत. एवढेच नव्हे तर ही प्रजा एकमेकांनाच ओरबाडत आहे. ती श्रीकृष्णाचेही ऐकत नाही आणि संतांचेही ऐकत नाही. एवढा उद्धटपणा आला कुठून?  
अिहसेचा विकास हाच संस्कृतीचा विकास असतो. पशु-पक्ष्यासह मानवी आईवडील अिहसक नसते तर मानवी समाजाची किंवा सजीवांची वाढच झाली नसती, असे दामोदर कोसंबी म्हणतात. मग भारतीय समाजातील ही अिहसा गेली कुठे? भारतीय समाज दिवसेंदिवस अगदी डी.जे. लावून परमेश्वराच्या साक्षीने िहसक का होत चालला आहे? आम्ही सारे ओरबाडसंस्कृतीचे पाईक का होत आहोत? राज्यकर्त्यांमधील प्रजेचे प्रेम गेले कुठे? नेमके काय चुकले? कुठे चुकले? दुरुस्ती कोण, कधी करणार? श्रीकृष्णाने झाड लावले खरे, पण.. पुढे काय?     
*लेखक संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.

 

Devendra Fadnavis, Ajit Pawar & Eknath Shinde Astrology
शिंदे, पवार, फडणवीसांना ‘या’ अंकाचा धागा ठेवतो जोडून; २०२४ मध्ये मात्र येईल ‘हा’ अडथळा, ज्योतिषी काय सांगतात?
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात
nirmala sitaraman
उलटा चष्मा: पैसे नसलेल्या अर्थमंत्री