रामेश्वरममध्ये चिरविश्रांती घेणारे दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे यापुढेही जिथं नक्की भेटत राहतील, प्रेरणा देत राहतील, अशी जागा म्हणजे त्यांनी लिहिलेली पुस्तकं.. ही पुस्तकं कशी आहेत, हे थोडक्यात सांगतानाच पुस्तकांतून दिसणारे कलाम कसे होते, याचाही हा वेध..

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम.. हे नाव घेतलं की प्रेरणा जागृत होते, मनात देशाभिमान उफाळून येतो, ‘स्वप्नं पाहायची असतात आणि ती उघडय़ा डोळ्यांनी जगायची असतात’ यावर विश्वास बसतो, उत्तुंगतेला स्पर्श करण्यासाठी कोणत्याही विशेष कौटुंबिक पाश्र्वभूमीची गरज नसते हे कळतं, धर्म-अध्यात्म, विज्ञान आणि संस्कृती यांमधील समान धागा दिसतो, निवडलेल्या पेशात-प्रोफेशनमध्ये आपण कर्तृत्व कसं गाजवायचं याची दिशा सापडते.. पण हे सगळं झालं कशामुळे? त्याचं मूळ दिसतं, ते डॉ. कलाम यांच्या लेखनातून.. स्वत: डॉ. कलाम यांनी लिहिलेल्या विविध पुस्तकांमधून, विचारांमधून आपल्यापुढे एक ‘भारतरत्न’ उभे राहते, राहील!
परिवर्तन ही जगातील एकमेव शाश्वत गोष्ट आहे. डॉ. कलाम यांना परिवर्तनाची तीव्र ओढ होती. त्यांच्यासमोर असलेली परिस्थिती एका ‘स्वप्निल दूरदृष्टीने’ बदलण्याचा त्यांचा प्रयत्न लेखनातून प्रतििबबित होतो. ‘थॉटस् फॉर चेंज’, ‘मॅनिफेस्टो फॉर चेंज’, ‘उद्दिष्ट तीन अब्ज’ या पुस्तकांमधून कलामांनी परिवर्तन म्हणजे काय, त्यासाठी लागणारी दृष्टी म्हणजे काय, चौकटीच्या बाहेर जाऊन विचार कसा करायचा, सर्जनशीलता म्हणजे काय, याची मांडणी केली. वयाने ज्येष्ठ असताना केलेल्या या लेखनातून त्यांचा तरुणाईवरचा विश्वास दिसून येतो. देशाच्या विकास प्रक्रियेत तरुणाईच्या ऊर्जेला योग्य दिशेने वळवणे हा परिवर्तनाचा खरा जाहीरनामा आहे, असे ते मांडतात; पण त्यांचे खरे वेगळेपण ते ज्या पद्धतीने राष्ट्रीय समस्यांवर उपाय सुचवितात, त्यात आहे. भारतातील विविध भागांना दिलेल्या आपल्या भेटींदरम्यान तेथील लोकांनी स्थानिक स्तरावरील समस्यांवर कशी मात केली ते कलाम यांनी चाणाक्षपणे टिपले आणि नंतर आपल्या पुस्तकांमधून त्या त्या उदाहरणांद्वारे त्यांनी जागतिक समस्यांवर कशी मात करता येईल, याची दिशा आखून दिली. कलाम यांच्या लेखनातून, सूक्ष्माच्या विचारातून स्थूलावर उपाययोजना सुचविणारा द्रष्टा अणुशास्त्रज्ञही पुढे येतो.
संवेदनशील कवी
सामान्यपणे कवी म्हटलं की यमक, वृत्त, कल्पनाविलास, शब्दांचे- अन्वय आणि अर्थाचे खेळ अशी आपल्या मनातील प्रतिमा असते. त्या अर्थाने आणि निकषांवर डॉ. कलाम यांच्या कविता ‘काव्य’ ठरतीलच असं नाही. ‘साँग्ज ऑफ लाइफ’, ‘इन्डॉमिनेबल स्पिरिट’ आणि ‘यू आर युनिक’ या कलामांच्या तीन पुस्तकांमध्ये त्यांच्या कविता वाचायला मिळतात; पण तरीही कलाम यांच्या प्रत्येक शब्दाला वजन असते. हे येतं कुठून?
‘प्रज्वलित मन हा पृथ्वीवरील
पृथ्वीबाहय़ वातावरणातील
तसंच पृथ्वीच्या पोटातील
कोणत्याही साधनापेक्षा..
सर्वात सामथ्र्यवान स्रोत असतो
मी ज्ञानदीप तेवत ठेवीन
विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी’
‘युवा गीत’ या त्यांच्या कवितेतील हे (मराठीत ‘अदम्य जिद्द’ या नावाने भाषांतरित झालेल्या पुस्तकातील) शब्द ते स्वत: जगले, हे आपल्याला दिसून येतं. ‘इन्डॉमिटेबल स्पिरिट’मधील मूळ इंग्रजी ओळी ..
With Courage in my mind,
Indomitable Spirit engulfed me,
With Indomitable Spirit in mind and action,
I regained lost confidence,
I can win, win and win.
Strength came back to me, overpowered the sea wave
I reached the destination, my Mission.
..वाचल्यानंतर लक्षात येतं, की त्यांच्या कवितेतील प्रत्येक शब्दाला त्यांनी जीवनाचं मोल दिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या कविता चतन्यदायी वाटतात. कवितेतील शब्द निरागस, एखाद्या लहान मुलाच्या जगण्यातील प्रसंगांतून आलेले वाटावेत इतके साधे म्हणून ते आपले वाटतात. त्याच वेळी आपल्या आयुष्यातील अशा प्रसंगांना प्रतिसाद देताना आपण अडखळलो होतो, मग हे कसे काय पुढे सरकू शकले, या प्रश्नाला त्यांच्या कवितेतून उत्तरंही मिळत जातात. संवेदनशीलतेने त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याकडे पाहिलं, त्याच्या आयुष्यातील चतन्य हरविल्याच्या भावनेला टिपलं आणि हे चित्र बदललं तर मन प्रज्वलित होऊ शकेल हे ओळखलं.. कवी कलाम कवितेतून पुढे येतात ते असे.

environment, elections, nations,
चारशे कोटी विसरभोळे?
How Sudha Murthy cope with menopause
“एकदिवस अचानक मला मुलांची आठवण आली अन् रडू आले”; सुधा मूर्ती यांनी सांगितला मेनोपॉजदरम्यान अनुभवलेला प्रसंग
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
Gajanan Kirtikar
शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकरांनी सुनावले; म्हणाले, “भाजपाला जनतेचा भक्कम पाठिंबा, ईडीचे प्रयोग थांबवले पाहिजे”

एक अद्वैती विचारवंत
‘टìनग पॉइंट्स’ आणि ‘माय जर्नी’ ही डॉ. कलाम यांची आत्मचरित्रपर पुस्तके म्हणता येतील. आपल्या आयुष्याला घाटदार वळणे देणारे प्रसंग त्यांनी यामध्ये लिहिले आहेत. जातिवंत वैज्ञानिक असलेल्या कलामांना तत्त्वज्ञान आणि विविध धर्मामधील मूलतत्त्वांचं विशेष आकर्षण होतं. विज्ञान आणि अध्यात्म हे माझ्या जीवनाचे दोन अखंड प्रेरक स्रोत आहेत, असं त्यांनी या पुस्तकांत लिहिलं आहे आणि खरोखरीच त्यांच्या ‘अग्निपंख’ या पहिल्या आत्मचरित्रातून आणि त्यानंतर लिहिलेल्या या दोन पुस्तकांतून पुढे येणारे कलाम असतात, अद्वैत तत्त्वज्ञान मांडणारे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीला आवश्यक असलेली नीतिमत्तेची चौकट आध्यात्मिक बठकीतून येते, अध्यात्मासाठी अनिवार्य असणारी चिकित्सक वृत्ती विज्ञाननिष्ठेतून येते ही त्यांनी सातत्याने केलेली मांडणी. ‘गायडिंग सोल्स’ आणि ‘ट्रान्सेन्डन्स’ या दोन पुस्तकांमधूनही त्यांचे लिखाण साक्षीभावनेने जगणं म्हणजे काय याचं विवेचन करतं. ‘जगाला अहंकाराच्या सीमांमधून मुक्त करण्यासाठी लिही कलाम’, या आदेशातून हे लिखाण केल्याचं ते सांगतात आणि म्हणून ते अद्वैती विचारवंत वाटतात.
द्रष्टा-कृतिप्रवण नेता
‘व्हिजन’, ‘क्रिएटिव्हिटी’ आणि ‘इनोव्हेशन’.. डॉ. कलाम यांची पुस्तकं किंवा त्यांची व्याख्यानं यांच्यात सातत्याने येणाऱ्या या तीन संकल्पना. त्या योगायोगाने आलेल्या नाहीत, तर नेतृत्व कसं असावं, नेतृत्व समाजाला- देशाला दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका कशा निभावतं आणि ऊर्जेने भारलेल्या तरुणाईला आव्हानांना सामोरं जाण्यासाठी कसं भाग पाडायचं याचं विवेचन डॉ. कलाम आपल्या पुस्तकांमधून शास्त्रीय पद्धतीने करतात. ‘इंडिया-२०२०’, ‘बियाँड २०२०’, ‘माझ्या स्वप्नातील भारत’ यांसारख्या पुस्तकांमधून ते नेमकं हे साधतात. माझ्या हाताला काम हवं आहे, मी शिक्षक आहे- पत्रकार आहे- खेळाडू आहे- समाजसेवक आहे, पण नेमकं काय करू तेच कळत नाही अशी काहीशी अवस्था झालेल्या तरुणाईला ते आपल्या पुस्तकातून मंत्र देतात. हा मंत्र आध्यात्मिक नाही, तर थेट स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक यांच्या कृतिप्रवणतेला चालना देणारा आहे. नेत्याला भविष्य कसं असू शकेल याची कल्पना करता यायला हवी, त्याच्याकडे त्या कल्पनेला सत्यात उतरविण्यासाठी लागणारी टप्पेनिहाय मांडणी करता यायला हवी आणि आपल्या कल्पनांचा चिकाटीने पाठपुरावा करण्याचं धाडसही हवं, ही त्रिसूत्री कलाम यांनी अनेकदा मांडली आहे. त्यांच्या पुस्तकांतून त्यामुळेच पुढे येतो तो एक द्रष्टा आणि कर्मावर श्रद्धा असलेला नेता.
माणसाचं माणूसपण हळवेपणात आहे, भावनिक होण्यात आहे, चुकण्यात आहे, मित्रांच्या-कुटुंबीयांच्या सहवासाच्या त्याला असलेल्या ओढीत आहे, थकव्यात आहे, गळून पडण्यात आहे, पुन्हा भरारी घेण्यातही आहे, स्वप्नं पाहण्यात आहे, पशुपक्ष्यांवर प्रेम करण्यात आहे, अभिमानात आहे.. डॉ. कलाम यांचे लेखन आपल्याला त्यांचे माणूस म्हणून असलेले असे सारे कंगोरे दाखवते. ‘‘अखेर एक माणूसच तर होता तोही, सामान्य माणसासारख्या चुका त्यानेही केल्या; पण सामान्य माणूस जे कबूल करायला बिचकतो ते याने जगजाहीर केलं,’’ असं बाबा आमटेंनी महात्मा गांधींविषयी लिहिलं आहे. लेखक कलाम यांना हे वर्णन तंतोतंत लागू पडतं.
डॉ. कलाम यांचं समग्र लेखन वाचताना त्यांची माणूस म्हणून होत गेलेली व्यापक जाणीव आपल्याला स्तिमित करते. त्यांनी सुरुवातीला लिहिलेलं ‘ऑन द विंग्ज ऑफ फायर’ (मराठीत ‘अग्निपंख’) किमान काही जणांना तरी त्यातील तांत्रिक शब्दप्रणालीमुळे समजण्यासाठी अवघड गेलं होतं, पण त्यानंतर येत गेलेलं प्रत्येक पुस्तक किमान दहावी झालेल्या कोणत्याही मुलापासून ते जर्जर वृद्धापर्यंत कोणालाही सहज वाचता येऊ शकेल असं होतं. त्यातील भाषा, प्रसंग, तक्ते आणि दाखले आपल्या दैनंदिन जगण्यातील होते. सुचविलेले उपाय कोणत्याही आíथक, सामाजिक पाश्र्वभूमीच्या व्यक्तीला सहजसाध्य होते. मोठय़ा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अनेक लहान-लहान पावलंही अचूक पडावी लागतात. उच्चविद्याविभूषित अवकाशशास्त्रज्ञ असलेल्या डॉ. कलाम यांच्यातील लेखक अशी पावलं अचूकपणे टाकण्यासाठी पाऊलवाट आखून देतो. म्हणूनच हे लेखन वाचताना कलाम आपल्यापुढे कधी तत्त्वज्ञ, कधी शास्त्रज्ञ, कधी विश्लेषक, कधी सर्जनशील कवी, कधी हळव्या मनाचा माणूस, कधी परखड नेता, कधी कर्तव्यनिष्ठ राष्ट्रपती, तर कधी जिज्ञासू विद्यार्थी म्हणून येत राहतात, पण हे तुकडे नव्हेत, ते एकजिनसी व्यक्तिमत्त्व आहे, हेही उमगतं.
swarsanwaad@gmail.com