भाजपप्रणीत मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांमधून केवळ जय-पराजय पाहणारा आणि त्यावर आधारित निष्कर्षांनाच प्राधान्य देणारा अन्वयार्थ काढण्यात आला. तो एका अर्थाने योग्यच आहे; परंतु निवडणूक आणि तिचे निकाल हा राजकारणाच्या संदर्भात केवळ पाण्यावरला हिमनग ठरावा, इतकी राजकीय बहुविधता प्रत्यक्षात असू शकते..  या बहुविधतेचा प्रत्यय राजधानी दिल्लीतील दोन विद्यापीठांच्या निवडणुकीत याच आठवडय़ात आला. वैचारिकतचे शक्तिपीठ मानले जाणारे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) व केंद्रीय राजकारणाच्या प्रभावाखालील दिल्ली विद्यापीठ येथे जय-पराजयाच्या पलीकडे जाणारी विद्यार्थी निवडणूक पार पडली. केंद्रातला राजकीय प्रवाह प्रमाण मानणारे दिल्ली विद्यापीठ आहे, तर जेएनयूमध्ये वैचारिक कट्टरतेचा संघर्ष! दिल्ली विद्यापीठात चारही पदे जिंकणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांनी नाकारले; पण याचा अर्थ रा. स्व.  संघप्रणीत अभाविपचा विचार जेएनयूच्या विद्यार्थी मतदारांनी नाकारला असा होत नाही. जेएनयूमध्ये विजय मिळवणाऱ्या ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनला (एआयएसए) नक्षलवादाचे कोण आकर्षण. एआयएसए ही मूळचीच मार्क्‍स-लेनिनवादी कम्युनिस्ट पक्षप्रणीत संघटना. अभाविपइतके एआयएसएचे राजकीयीकरण झालेले नाही. त्यामुळे जेएनयूवर लाल निशाण फडकवण्यात एआयएसएला यश आले. जेएनयूमध्ये राजकीय मुद्दय़ांपेक्षा वैचारिक कट्टरतेला जास्त महत्त्व असते; पण गतवर्षीच्या तुलनेत एएसआयएची पाचशे ते सहाशे मते घटली. याचे महत्त्वाचे कारण राष्ट्रीय स्तरावरील ‘विकासशील’ हिंदुत्ववादाचा उदय. पददलित, महिला, अल्पसंख्याकांना विकास हवा असतो. त्यासाठी प्रस्थापितांविरोधात आवाज उठवणाऱ्यांच्या पाठीशी हा समुदाय उभा राहतो, हा इतिहास झाला.. पण आता ही परिस्थिती आहे का? विकासाची भाषा बोलल्यास ‘सामाजिक अभियांत्रिकी’ बदलू शकते. त्याचेच दृश्य परिणाम जेएनयूमध्ये अभाविपला मिळालेल्या मतांमध्ये आहेत. एआयएसआयव्यतिरिक्त एसएफआय, लेफ्ट प्रोग्रेसिव्ह फ्रंट या डाव्या विचारांनी भारलेल्या संघटनाही जेएनयूच्या मैदानात होत्या; पण निकालांत दुसऱ्या क्रमांकावर अभाविप, तर काँग्रेसप्रणीत एनएसयूआयचा अस्तित्वासाठी लढा, असे चित्र दिसून आले. राजकारणात डावी विचारसरणी कशीबशी तग धरून दिसत असताना हा ‘मध्यममार्गी उजवा’ विचार जोर धरू पाहत आहे.  याउलट, केंद्रातील सत्तासंघर्ष दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीमध्ये दिसतो. अभाविपने चारही जागांवर यश मिळवले, तर एनएसयूआय संघटना दुसऱ्या क्रमांकावर राहिली. जेएनयूच्या बंदिस्त कॅम्पसमध्ये सक्रिय असलेल्या एएसएआयने दिल्ली विद्यापीठाच्या खुल्या कँपसमध्ये झालेल्या निवडणुकीत स्वत:चे दखलपात्र अस्तित्व दाखवून दिले. जेएनयूमध्ये एकूण मतदार सात ते आठ हजार. त्यांपैकी अडीचेक हजार मतदान होते. दिल्ली विद्यापीठातील अडीच लाख मतदारांपैकी ७० ते ८० हजार जणांनी मतदान केले. त्यामुळे दिल्ली विद्यापीठाची निवडणूक ‘मास’ (जन), तर जेएनयूची निवडणूक वैचारिक क्लास (वर्ग) दर्शवणारी आहे. या दोन्ही विद्यापीठांतील विद्यार्थी निवडणुकांतून प्रत्यक्ष राजकारणात ना केंद्रातील सत्ताधारी भाजपला फरक पडला, ना विरोधातील काँग्रेसला; परंतु मतपेटीतून वैचारिक संघर्ष करणाऱ्या जेएनयूची दखल मात्र सर्वच पातळ्यांवर घेतली जाते. निवडणूक, प्रचार, मतदार, मतदानाच्या पलीकडे जाणारी ही निवडणूक आहे; भारतीय लोकशाहीची वैचारिक बहुविधता दर्शवणारी. यातूनच लोकशाही सकस, तर मतदार समृद्ध होतात.. एरवी निवडणुका होतच असतात!