पेशाने अर्थशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या इल्हम तोथी यांना जानेवारी २०१४ पासून कोणत्याही आरोपाविना डांबून ठेवणाऱ्या चीन सरकारने, अखेर त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करून बुधवारपासून खटलाही सुरू केला; परंतु आता तरी त्यांना न्याय मिळणार म्हणून हायसे वाटण्याची सोय चीनने ठेवलेली नाही, कारण त्यांच्यावर आरोप आहे तो देशद्रोहाचा, देशविघातक कारवायांना प्रोत्साहन देण्याचा. या आरोपाबद्दल त्यांना देहदंडदेखील होऊ शकतो. ह्यूमन राइट्स वॉचसारख्या संस्था किंवा ‘पेन’ ही लेखकांची आंतरराष्ट्रीय संघटना यांना हे आरोप अजिबात पटलेले नाहीत आणि चीनचे सरकार प्रथमपासूनच प्रा. तोथी यांच्याबाबत दडपशाहीची भूमिका घेते आहे, असे अनेक पाश्चात्त्य विद्वानांनी यापूर्वीही म्हटलेले आहेच.
 प्रा. तोथी यांच्यावर जो आरोप केला गेला, त्यासाठी आजवर हवाला दिला जात होता तो त्यांच्या तथाकथित ‘प्रक्षोभक’ लिखाणाचा. विगुर आणि चिनी भाषांत झालेल्या या लिखाणाची इंग्रजी भाषांतरे आज उपलब्ध आहेत आणि ती वाचल्यास, कोणत्याही लोकशाही देशातील वृत्तपत्रात इतपत टीका करणारे लिखाण सहज होऊ शकते, असे विचारी व्यक्तींचे मत होईल. उदाहरणार्थ, तियानान्मेन चौकातील चिरडशाहीनंतर ‘आता सरकारनेच पुन्हा मागे वळून पाहावे आणि लोक रस्त्यावर का उतरले हेही जाणून घ्यावे’ असे लिहिणाऱ्या प्रा. तोथी यांनी ‘माझे आईबाप, माझी भाषा आणि संस्कृती मला प्रिय असणारच’ आणि ‘विविध संस्कृतींची माणसे चिनी असू शकतात, हे जाणून सरकारने एकसमानीकरण थांबवायला हवे,’ असे विगुरांच्या लढय़ासंदर्भात लिहिले आहे. काही अतिरेकी विगुर लोक ज्या ‘पूर्व तुर्कस्तान’चा पुकारा करतात त्याला अजिबात धूप न घालता, ‘यांच्याशीही सरकारने चर्चा केली पाहिजे’ असे प्रा. तोथी यांनी लिहिले होते. हे सारे बीजिंगमध्ये राहून आणि ज्या मिंझू विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्राचे उच्चशिक्षण घेतले तेथेच पुढे प्राध्यापकी करताना त्यांनी लिहिले. विगुर प्रश्न उफाळल्यानंतर, या समूहाबाबत चिनी आणि विगुर भाषांत चर्चा घडवण्यासाठी २००६ साली त्यांनी विगुरऑनलाइन नावाचे संकेतस्थळ उघडले. ते सरकारने बंद पाडले. मग २०१३च्या फेब्रुवारीत त्यांना अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठातील नोकरी चालून आली आणि मुलीलाही अमेरिकेतच शिकण्यासाठी प्रवेश मिळाला, तेव्हा ऐन विमानतळावरून प्रा. तोथी यांना मागे फिरवण्याचा प्रकार चिनी अधिकाऱ्यांनी केला होता. जानेवारी २०१४ मध्ये त्यांना डांबण्यात आल्यानंतर, ‘विगुरांचा शत्रुवंश’ समजल्या जाणाऱ्या हान वंशीय कैद्यांमध्ये त्यांना ठेवण्याची युक्ती तुरुंगाधिकाऱ्यांनी वापरली. या सहकैद्यांच्या तक्रारींवर विसंबून, प्रा. तोथी यांना पायबेडय़ाही ठोकण्यात आल्या. हे सारे कमी म्हणून आता टोकाचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.