एखादाच स्टीव्ह जॉब्ज अथवा बिल गेट्स यांसारख्या ‘नायकां’मुळे संगणक आज हाताळण्यास सोपे झाले हे खरे, पण संगणक-क्रांती काही एकटय़ादुकटय़ा नायकांमुळे किंवा ‘संशोधकां’मुळे झालेली नाही. हे कार्य सांघिकच होते. अर्थात किस्से, कहाण्या असे रंजक स्वरूप असलेल्या या पुस्तकात माणसांच्या गोष्टी आहेत; पण त्यांच्या भोवतीची वलये इथे अधिक स्पष्ट होतात..
‘अ‍ॅपल’चे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांच्या मृत्यूच्या सुमारास प्रसिद्ध झालेल्या चरित्राची विक्री अफाट झाली आणि या पुस्तकाचे लेखक वॉल्टर आयझ्ॉक्सन हे चरित्रकार म्हणून मोठय़ा वाचकसमूहाला माहीत झाले. टाइम साप्ताहिकाचे पत्रकार म्हणून अनेक वर्षे त्यांनी काम केले आणि आजही ते संपादक आहेत. स्टीव्ह जॉब्जचे चरित्र लिहिताना त्यांनी अनेक वेळा त्याची भेट घेतली. इंग्रजीत त्याला ऑथोराइज्ड बायोग्राफी म्हणतात तसे ते चरित्र होते, म्हणजे चरित्रनायकाच्याच सहकार्याने लिहिलेले. त्या पुस्तकामध्ये व्हॉल्व्ह (म्हणजेच इलेक्ट्रॉनचा प्रवाह केवळ एकाच दिशेने नेणारे काचेचे उपकरण)पासून चिपपर्यंत झालेला डिजिटल क्रांतीचा प्रवास नोंदवण्यात आला होता. साहजिकच पुढल्या पुस्तकात संगणन प्रक्रिया ते आजचे इंटरनेट इथवरच्या प्रवासाची गाथा नोंदवण्याचा मोह त्यांना झाला आणि त्यातूनच ‘इनोव्हेटर्स’ हे पुस्तक साकारले. नावाप्रमाणेच या क्रांतीत सहभागी असणाऱ्या बहुतेक सर्वाची चरित्रे या जाडजूड पुस्तकात क्रमाक्रमाने येतात. पण सुरुवातीलाच भिडते-भेटते ती लॉर्ड बायरनची कविता. ही कविता बायरनने ज्या स्वत:च्या मुलीला उद्देशून लिहिली, ती अ‍ॅडा लवलेस पुढे गणिती कशी बनली आणि गणित करण्याच्या यंत्राची कल्पना करणाऱ्या चार्ल्स बॅबेजशी मत्री कशी झाली याच्या किश्शाने पुस्तकाची सुरुवात होते!
ही सुरुवातीची पाने आपल्याला रसाळ आणि चित्ताकर्षक काही वाचायला देणार आहेत हे आश्वासन देतात आणि पुढे ते पूर्णही करतात. संगणकाचे सुरुवातीचे रूप म्हणजे ‘अ‍ॅनालॉग कॉम्प्युटर’.. हा शब्द आजच्या काळात विचित्र वाटेल; पण ‘अ‍ॅनालॉग कम्प्युटिंग’ म्हणजे पूर्णत: यांत्रिक रचना वापरून गणिती समस्या सोडवणे. तिथून आजच्या (डिजिटल) कॉम्प्युटपर्यंत जाताना अ‍ॅलन टय़ुिरग, हॉवर्ड आयकेन आणि व्हॉन न्यूमॉन यांचा सहभाग काय होता हे ते सुरुवातीला सांगताना म्हणतात, ‘युद्धे नेहमीच विज्ञानाला गती देतात. संगणक, आण्विक ताकद, रडार, इंटरनेट यांसारखे अनेक तांत्रिक प्रगतीतले टप्पे गाठायला लष्कराने मदत केली आहे.’
दुसऱ्या महायुद्धादरम्यान १९४१ मध्ये जॉन मॉकले आणि जे प्रेस्पर ईकर्ट या दोन वैज्ञानिकांना पेनसिलव्हानिया राज्य विद्यापीठ आणि अमेरिकी सैन्य यांनी तोफांच्या ‘फायिरग अँगल सेटिंग्ज’संबंधीची पुस्तिका तयार करायला सांगितली. तोफेचा कोन किती असल्यास कसा मारा होतो आणि बाह्य़घटक निरनिराळे असणार हे लक्षात घेतल्यास या कोनांमध्ये काही फरक पडणार का? किती? हे काम केवळ अत्यंत अवजड आणि वेळकाढू अशा डिफ्रेंशिअस इक्वेशनच्या वेळकाढू गणितानेच साध्य होणार होते. यासाठी एम.आय.टी.मध्ये एक यंत्र बनवले गेले होते. त्यावर एकशे सत्तर माणसे राबत होती आणि याच प्रकल्पात काम करणाऱ्या स्त्रियांना ‘कम्प्युटर’ (गणनकर्त्यां) असे म्हटले जात होते. प्रामुख्याने या काळात गणिताचा अभ्यास करणाऱ्या महिलांची मोठय़ा प्रमाणावर भरती करण्यात आली. याच सुमारास मॉकलेने लिहिलेल्या एका निबंधात निर्वात पोकळीचा वापर करून इलेक्ट्रॉनच्या वेगवान प्रवाहाने ‘गणनाचा वेग’ कसा वाढवता येईल, याचे सूतोवाच करण्यात आले होते. मॉकले आणि ईकर्टने पाहिलेले हे स्वप्न म्हणजेच डिजिटल कॉम्प्युटरची संकल्पना होय. १९४३ च्या एप्रिलमध्ये अमेरिकी सैन्याने या कल्पनेला हिरवा सिग्नल दिला आणि इनियाक या संगणकाच्या बांधणीला सुरुवात झाली. आजचे संगणक शून्य आणि एक यावर आधारित असलेली दुविध (बायनरी) प्रणाली वापरतात, तर इनियाक दशमान पद्धत वापरत असे. जून १९४४ मध्ये हा संगणक तयार झाल्यावर त्यावर साधे गुणाकार करण्यात आले आणि एक वर्षभरात त्यांनी असा संगणक तयार केला, जो एका सेकंदात पाच हजार बेरजा आणि वजाबाकी करीत असे आणि तो हजार फूट लांब आणि पाचशे फूट उंच होता. त्याचे वजन तीस टन होते आणि त्यात १७,४६८ व्हॅक्युम टय़ूब जोडल्या होत्या.
एकदा संगणक निर्माण झाल्यानंतर त्याला आदेश देण्यासाठी प्रणाली लिहिणे आवश्यक होते. प्रामुख्याने या क्षेत्रात स्त्रियांनी काम केले. नौदलातील ग्रेस हॉपर या गणितज्ञ महिलेसह अन्य गणितज्ञ महिलांकडे होते. ग्रेस ही ‘मार्क-१’ या संगणकावर काम करीत असे.. आयझ्ॉक्सन लिहितात, ‘तिने दिलेला प्रोग्राम टेपद्वारे यंत्रात घालताना तिचे सहकारी प्रार्थना करणारी सतरंजी अंथरत आणि पूर्वेकडे हात करून देवाची प्रार्थना करीत’. या संगणकाला साइन लॉग यांसारखे पुढचे गणिती टप्पे भरवण्यात आले आता त्यापुढची कठीण कामगिरी होती ती काचेच्या व्हॉल्व्हना सुटसुटीत पर्याय शोधण्याची. हा पर्याय बेल लॅबने शोधला आणि त्याला ट्रांझिस्टर हे नाव पडले. या क्रांतिकारी शोधाची घोषणा ४ ऑक्टोबर १९५७ या दिवशी करण्यात आली.. तेव्हा तिची थोरवी न कळल्याने न्यूयॉर्क टाइम्सने ती त्रेचाळिसाव्या पानावर टाकली! ट्रांझिस्टरमुळे जगड्व्याळ संगणक यंत्रणा सोपी सुटसुटीत झाली. तरीही १०० ट्रांझिस्टर असलेल्या सíकटमध्ये हजार वायर्स जोडलेल्या असत, अर्थात त्यामुळे त्याची अचूकता कमी होत असे. जॅक किलबी या प्रतिभावंत वैज्ञानिकाने सिलिकॉनच्या एका तुकडय़ात अनेक ट्रांझिस्टर असलेली रचना करण्याची कल्पना मांडली आणि ती पूर्तीला नेली आणि ऑसिलेटरसाठी लागणारे भलेमोठे सíकट एका छोटय़ा तुकडय़ाच्या आकारात सप्टेंबर १९५८ मध्ये गोवून दाखवली.
स्टीव्ह जॉब्जसारख्या प्रतिभावंताने केलेला पर्सनल कॉम्प्युटर ते आयफोनपर्यंतचा प्रवास पुस्तकाच्या पुढील प्रकरणांत पुन्हा येतो आणि इंटरनेट, वेब २, गुगलसारखी इंजिन्स, विविध विद्यापीठे, लॅबोरेटरीज, शेकडो शास्त्रज्ञ आणि संबंधित- उपयोजित क्षेत्रांतील मंडळी या साऱ्यांची कामगिरी पुस्तकात छोटय़ा-मोठय़ा रूपात येते.
अठराव्या शतकापर्यंतचे विज्ञानातील शोध आणि २० व्या शतकातील डिजिटल क्रांती यातील मोठा फरक असा की, एखादा लुई पाश्चर किंवा आयझ्ॉक न्यूटन एकेकटय़ाने  प्रयोगशाळेत संशोधन करीत. उलट डिजिटल क्रांती ही प्रामुख्याने कायमच सांघिक कार्य(टीमवर्क) होते. कारण जो सिद्धांत मांडतो त्याला संबंधित यंत्रणा हाताळता येतेच असे नाही. त्यामुळे यंत्रणा माहीत असणाऱ्यांचे सहकार्य घ्यावेच लागते. त्यासोबत खुले बौद्धिक वातावरण, पशाचा सढळ ओघ, नव्या कल्पनांचे स्वागत करायची तयारी, सद्धांतिक कामाची आवड असणाऱ्यांना सरकारने उपयुक्त कामाला जोडून देणे आणि हवे ते सहकार्य देणे आणि या साऱ्यांना व्यापून उरणारी २४ तास झोकून देऊन काम करण्याची तयारी या साऱ्यामुळे डिजिटल क्रांती इथपर्यंत पोहोचली असे पुस्तक वाचून नक्की म्हणता येते.
 अनेक ठिकाणी लेखक रटाळ गोष्टीतही पेटंटसाठीच्या मारामाऱ्या आणि व्यक्तिगत किस्से घालून मजकूर रंजक करतो. पुस्तकाचा दोष एकच म्हणता येईल की, ते याच सुमारास युरोप आणि इतर ठिकाणी काय समांतर प्रयत्न सुरू होते याची नोंद लेखक घेत नाही. पण आपण इथवर कसे आलो हे समजण्यासाठी हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे.
इनोव्हेटर्स –  वॉल्टर आयझॅक्सन
सायमन अँड शूस्टर
पाने : ५४२, किंमत : ७९९ रुपये.