मृत्यूनंतरच्या सगळ्या कर्मकांडांशी त्या त्या भौगोलिक परिसरातील संस्कृती आणि त्यातील रूढींचा अतिशय जवळचा संबंध असतो. एरवीच्या जगण्यात सतत नवनव्या कल्पनांना जवळ करणारा समाजही याबाबत मात्र नेहमीच हळवा असल्याचे दिसते. आयुष्यभर प्रगतशील म्हणवून घेणाऱ्यालाही मृत्यूनंतर मात्र या रूढींच्या कचाटय़ातून सुटता येत नाही. त्यामुळेच देहदानाची चळवळ वाढण्यासाठी अनेकांना प्रचंड कष्ट उपसावे लागतात किंवा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाने विकसित झालेल्या विद्युतदाहिनीच्या वापरासाठी प्रचार करावा लागतो. भारतासारख्या रूढिप्रिय देशात होणारी झाडांची कत्तल जर मृतदेहांच्या विल्हेवाटीसाठी उपयोगात येत असेल, तर हा देश कोणत्याच पातळीवर खऱ्या अर्थाने प्रगत झाला आहे, असे म्हणता येणार नाही. देशात वर्षांकाठी होणाऱ्या सुमारे सव्वा तीन कोटी मृत्यूंपैकी बहुतेकांना लाकूड आणि गोवऱ्या यांच्या साह्य़ाने जाळले जाते. गेल्या काही वर्षांत विद्युतदाहिनी आणि डिझेलवर चालणारी दाहिनी उपलब्ध झाली, तरी अद्याप अनेकांच्या मनात रूढीचे संकट उभे राहते. सतीश आळेकर यांच्या ‘महानिर्वाण’ नाटकातील नायकाच्या वडिलांनी मृत्यूनंतर नव्या स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत स्वत:ला जाळून घेण्यास कडाडून विरोध केला. काळ बदलल्याची भावना फक्त मुलाच्या मनात आणि त्याचे वडील मात्र अजूनही जुन्यापुराण्या गोष्टींत अडकलेले. आंघोळीसाठी बंबात घालण्यासाठीची बंबफोड मिळणाऱ्या लाकडाच्या आणि कोळशाच्या वखारी शहरातून दिसेनाशा झाल्या, कारण घरोघरी गीझर किंवा हीटरसारखी उपकरणे दिसू लागली. पाटा-वरवंटय़ाच्या जागी मिक्सर आले आणि पोळपाटाच्या जागेवर ‘रोटी मेकर’ आले.  गॅस सिलेंडर पुरेशा प्रमाणात आणि स्वस्त मिळावेत, यासाठी याच समाजाने आंदोलनाचाही पवित्रा घेतला, पण मृत्यूचा विषय आला की मात्र हाच समाज त्या रूढीच्या कचाटय़ातून सुटता सुटत नाही; हे वास्तव विदारकच म्हटले पाहिजे आणि ते वाराणसीत गंगेच्या काठी होणारी मृतदेहांची परवड पाहिल्यानंतरही कुणाच्याही लक्षात येऊ शकेल. विज्ञानाने झाडांचे माणसाच्या जगण्याशी असलेले नाते उलगडले. शंभर-दोनशे वर्षांच्या काळानंतर पूर्ण वाढ झालेले वृक्ष हे माणसाचे जगणे सर्वार्थाने सुसह्य़ करण्यासाठी उपयोगाचे असतात, याचे ज्ञान झाल्यानंतर उत्तराखंडात सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली झाडे वाचवण्यासाठी ‘चिपको आंदोलन’ सुरू झाले. कागदनिर्मितीसाठी प्रचंड प्रमाणात झाडे कापावी लागत असल्याने त्या क्षेत्रात नवे संशोधन झाले. फर्निचर आणि गृहसजावटीच्या प्रांतात लाकडाला पर्याय म्हणून शेकडो नवे पर्याय उभे राहिले. तरीही मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी विद्युतदाहिनीचा पर्याय स्वीकारण्याबाबत मात्र समाज काचकूच करतो आहे. वैज्ञानिकदृष्टय़ा मृतदेहाला जाळून टाकणे ही सर्वात पर्यावरणपूरक गोष्ट असली, तरी त्यासाठी पर्यावरणाचे संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या झाडांचाच बळी जाणे, हे काही पर्यावरणपूरक ठरू शकत नाही. मोठय़ा शहरांमधील स्मशानभूमीत अशा विद्युतदाहिन्या उभ्या केल्या, तरी त्याचा म्हणावा असा वापर होताना दिसत नाही. एकीकडे पर्यावरणाचे संरक्षण आणि दुसरीकडे रूढी-परंपरा यांच्या कचाटय़ात मृत्यूनंतरची परिस्थिती सापडल्याचे हे चित्र सामाजिक प्रयत्नातूनच बदलावे लागणार आहे. देहदानासारख्या अतिशय उपयुक्त आणि मानवी समूहाच्या प्रगतीचे कारण ठरणाऱ्या व्यवस्थेबाबतही समाज या द्विधा स्थितीमुळेच अनास्था दाखवतो, हे तर आणखीनच दुर्दैवी आहे. झाडांची कत्तल करून संस्कृती आणि परंपरा टिकवल्याचे समाधान मिळवायचे, की झाडांचे रक्षण करून नव्या कल्पना स्वीकारायच्या याचा विचार तातडीने करण्याची वेळ आता आली आहे.