अतिशय बिकट परिस्थितीतून मार्गक्रमण करणाऱ्या भारतीय नौदलाची धुरा अखेर ५० दिवसांनंतर ज्येष्ठतेच्या क्रमवारीत द्वितीय स्थानावर असणाऱ्या व्हाईस अ‍ॅडमिरल रॉबिन के. धोवन यांच्याकडे सोपविण्यात आली. नौदलातील अपघातांच्या मालिकेची जबाबदारी स्वीकारून  फेब्रुवारी महिन्यात अ‍ॅडमिरल डी. के. जोशी यांनी नौदलप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून या पदावर कोणाची नियुक्ती होईल याविषयी कुतूहल होते.
ज्येष्ठतेच्या क्रमवारीत नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल शेखर सिन्हा अव्वल स्थानावर होते. ज्येष्ठतेच्या निकषानुसार या पदावर त्यांची नियुक्ती होणार असल्याचे मानले जात होते. परंतु पश्चिम विभागाचे नेतृत्व करताना सिन्हा यांच्या कारकिर्दीत सर्वाधिक अपघात झाले. अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारणारे डी. के. जोशी यांचा राजीनामा संरक्षण मंत्रालयाने स्वीकारला होता. असे असताना अपघातातील त्या मालिकांशी निगडित सिन्हा यांच्याकडे नौदलप्रमुखपदाची जबाबदारी दिल्यास जोशी यांच्या राजीनाम्याला अर्थच राहिला नसता. या मुद्दय़ाचा प्रकर्षांने विचार करून ज्येष्ठता यादीत द्वितीय स्थानी असणाऱ्या रॉबिन धोवन यांच्या नियुक्तीला समितीने हिरवा कंदील दाखविला. धोवन हे नौदलाचे २२वे प्रमुख ठरले.
अ‍ॅडमिरल धोवन यांनी आपल्या ४० वर्षांच्या सेवाकाळात नौदलातील अनेक महत्त्वपूर्ण विभागांची जबाबदारी सांभाळली आहे. नौकानयन आणि दिशादर्शक तज्ज्ञ म्हणून त्यांची खास ओळख. नवी दिल्लीच्या ‘नॅशनल डिफेन्स अकॅडमी’, ‘डिफेन्स सव्‍‌र्हिस स्टाफ कॉलेज’ आणि अमेरिकेच्या ‘नेव्हल वॉर कॉलेज’मधून धोवन यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले. १ जानेवारी १९७५ रोजी नौदलात दाखल झाल्यावर त्यांनी विभागीय मुख्यालये आणि प्रशासकीय कामांची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. पश्चिम विभागात आयएनएस खुक्री, आयएनएस रणजीत, आयएनएस दिल्ली या आघाडीवरील युद्धनौकांवर मुख्य अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. लंडनमधील भारतीय दूतावासात नौदल सल्लागार म्हणूनही ते कार्यरत होते. नौदलाच्या पूर्व विभागात ‘फ्लॅग ऑफिसर’ आणि विशाखापट्टणमच्या विभागीय मुख्यालयात ‘कमांडिंग इन स्टाफ’ म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे.
नौदल उपप्रमुख तसेच मुख्यालयात धोरण व योजना विभागात त्यांनी वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. सिन्हा यांच्याऐवजी ज्येष्ठता यादीतील दुसऱ्या क्रमांकावरील धोवन यांची नौदलप्रमुखपदी नियुक्ती झाल्यामुळे इतर अधिकाऱ्यांच्या क्रमवारीतही बदल होईल. नौकानयन आणि दिशादर्शन क्षेत्रात वाकबगार असणाऱ्या धोवन यांच्यासमोर नौदलाचे सारथ्य करण्याचे आव्हान आहे.