दंगली होतात तेव्हा त्या घडवून आणण्यात ज्यांना रस असतो ते आपापले हितसंबंध साधून घेतात आणि नामानिराळे होतात. पण त्यामध्ये होरपळतो तो आपल्या रोजच्या लढाया जीव खाऊन लढणारा, जगण्यातल्या लहानसहान गोष्टींमध्ये आनंद मिळवणारा, रोजीरोटीशी बांधलेला सामान्य माणूस. दंगलीनंतर त्याचं काय होतं, दंगलीत गमावलेले प्रियजन, गमावलेला एखादा अवयव, गमावलेलं स्वास्थ्य या सगळ्याशी झगडताना त्याच्या आयुष्याची गाडी रुळावर येते का, की कधीच येत नाही?
बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्यानंतर १९९२-९३ मध्ये मुंबईत झालेल्या दंगलींनंतर त्यात होरपळलेल्या सामान्य लोकांचं काय झालं, या प्रश्नाने अस्वस्थ झालेल्या इंग्रजीतील पत्रकार मीना मेनन यांनी या विषयाचा अभ्यास केला. व्यवसायाचा भाग म्हणून त्यांनी दंगल कव्हर केली होती. त्यानंतर दंगलींनंतर काय, याचा अभ्यास करण्यासाठी त्यांना फेलोशिप मिळाली. त्याअंतर्गत त्या सतत २००७ ते २००९ या काळात दंगलग्रस्तांना, दंगलीशी संबंधित राजकीय नेत्यांना भेटत होत्या. १९९२-९३ चीच दंगल नव्हे, तर त्याआधी मुंबईत झालेल्या जातीय दंगलींचाही त्यांनी अभ्यास केला. त्याचेच ‘रायट्स अँड आफ्टर इन मुंबई  – क्रोनिकल्स ऑफ ट्रथ अँड रिकन्सेलिएशन’ हे पुस्तक, हा आजवर मुंबईत झालेल्या सर्व दंगलींचा दस्तावेज आहे.
श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालानुसार १९९२-९३ च्या मुंबईतील  दंगलीत जमावाच्या हिंसाचारात तसंच पोलीस गोळीबारात ९०० माणसं मारली गेली. त्यांच्यापैकी ५७५ मुस्लीम होते. २७५ हिंदू होते. ७५ जणांची ओळख पटली नाही आणि पाच जण इतर धर्माचे होते. २०३६ माणसं जखमी झाली. त्यांच्यापैकी १,१०५ मुस्लीम होते आणि ८९३ हिंदू. हजारो माणसांना आपापली घरं सोडून रिलीफ कॅम्पमध्ये जाऊन राहावं लागलं. नंतर हीच माणसं शहरातून विस्थापित होऊन ठाण्याजवळ मुंब्रा, मीरा रोडला नयानगर इथं कायमची राहायला गेली. हिंदू-मुस्लिमांचे हे घेट्टो नंतर कायमचं वास्तव बनलं.  मुंबईचा कास्मोपॉलिटन धागा या १९९२-९३ च्या दंगलींपासून खऱ्या अर्थाने उसवला गेला.
अर्थात मुंबईतल्या हिंदू-मुस्लीम संघर्षांचा इतिहास सुरू होतो, १८८७ पासून. तेव्हाच्या मुंबई प्रांतात गोसंरक्षणासाठी हिंदूंच्या चळवळी, संघटन सुरू झालं. त्याचा तणाव वाढत जाऊन १८९३ मध्ये दंगली झाल्या.  मोहरमच्या वेळी काठियावाड इथं मुस्लीम जमावाने हिंसक होऊन हिंदूू देवळाची तोडफोड केली. ही बातमी मुंबईतल्या हिंदू कट्टरतावाद्यांपर्यंत पोहोचताच त्यांनी सरकारकडे गायींच्याच नव्हे तर बोकड आणि मेंढय़ांच्या कत्तली रोखण्याची जोरदार मागणी केली. याचा परिणाम म्हणून मुस्लीम कट्टरतावाद्यांनी त्यांच्या समाजामध्ये आपला धर्म धोक्यात असल्याची बतावणी सुरू केली. मशिदी आणि मंदिरांच्या जागांच्या मालकीवरूनही १९०० मध्ये तीव्र दंगली झाल्या.
त्यानंतरच्या काळात मुंबईत घडलेल्या सर्वजातीय दंगलींचा तपशीलवार आढावा मेनन यांनी घेतला आहे. त्यामधून लक्षात येतं की देशाच्या इतर भागांत हिंदू मुस्लिमांच्या संदर्भात तणावपूर्ण घटना घडल्या तरी त्याचे पडसाद मुंबईत उमटत. यातूनच फाळणीची कल्पना पुढे आली. फाळणीनंतर हे तणाव वाढतच गेले.
लेखिकेच्या मते, या दंगलींनी मुंबईतल्या मुस्लीम समाजासमोर अस्तित्वाचा प्रश्न उभा केला. कारण त्या काळात शिवसेनेने मुस्लिमांना असंच वागवलं पाहिजे, अशी एक विचारधारा पसरवली होती. मात्र हे समज हेतुपूर्वक पसरवणाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही. दंगलींनंतरही जातीय मतभेद मिटवण्यासाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत, असंही निरीक्षण मेनन यांनी नोंदवलं आहे. सगळेच मुस्लीम दहशतवादी असतात, त्यामुळे मुस्लिमांबद्दल सहानुभूती बाळगण्याचं काहीच कारण नाही, असाही एक समज त्यांना आढळून आला. या सगळ्यामुळे त्यानंतरच्या काळात छोटीशी घटना घडली तरी मुस्लिमांना लगेच एखादं पत्रक काढून निषेध करण्याची, आपण देशप्रेमी आहोत हे बिंबवण्याची गरज वाटते आहे, हेही लेखिकेने अधोरेखित केले आहे.
गेल्या शंभर वर्षांत मुंबई प्रचंड बदलली. लोखसंख्येचा स्फोट तिने पेलला. दंगलींनंतरचे घेट्टो पचवले. आता ती आणखी वेगाने बदलते आहे. या बदलाच्या प्रक्रियेत गरिबांना सामावून घेतले जाणार नाही, कारण मुंबईचा ताबा बिल्डरांनी घेतला आहे. मुस्लिमांना या बदलाच्या प्रक्रियेत जागाच नाही, कारण सगळ्यांचीच मनं दुभंगलेली आहेत आणि हे आता मुंबईचं वास्तव आहे, असं लेखिका म्हणते.

फ्रंट शेल्फ
टॉप  ५ फिक्शन
बेस्ट केप्ट सिक्रेट : जेफ्री आर्चर, पाने : ४००३५० रुपये.
द ओथ ऑफ द वायुपुत्राज् : अमिष त्रिपाठी, पाने : ६००३५० रुपये.
द बॅट : जो नेस्बो, पाने : ३८४५९९ रुपये.
हाऊ टू गेट फिल्दी रिच इन रायझिंग एशिया : मोहसिन हमीद,
पाने : २४०४९९ रुपये.
अ गिफ्ट ऑफ होप : डॅनिअल स्टील, पाने : १४४६९९ रुपये.

टॉप  ५ नॉन-फिक्शन
लीन इन : शेरील सँडबर्ग, पाने : २५६४९९ रुपये.
यंग टायटन : मायकेल शेल्डन, पाने : ४००६९९ रुपये.
द ओरिजीन्स ऑफ सेक्स : फरामाझ दाभोईवाला, पाने : ४८४४९९ रुपये.
मॅनेजमेंट इन टेन वर्ड्स : टेरी लिची, पाने : ३३६४५० रुपये.
ग्लोबल टिल्ट : राम चरण, पाने : ३२०६९९ रुपये.
सौजन्य : किताबखाना, फोर्ट, मुंबई.