माध्यमिक शाळेपासूनच लैंगिक शिक्षण देण्याची व्यवस्था जगातील अनेक देशांमध्ये सुरू असताना, भारतासारख्या देशात सत्तेत असलेल्यांनाच त्याचे महत्त्व पटू नये, हे आक्रित म्हणावे की भोळसटपणा की मूर्खपणा, असा प्रश्न कुणालाही पडेल. विशेषत: भारतातील सुमारे १५ हजार मुलांच्या मुलाखतीवर आधारित जो नवा पाहणी अहवाल प्रकाशात आला आहे, तो पाहिल्यावर तर देशातील प्रत्येकाचे डोळे उघडायला हवेत. लैंगिकता हा जर प्रत्येकाच्या जगण्याचा अविभाज्य भाग असेल, तर त्याबाबत कोणत्याही प्रकारच्या विकृत कल्पनांना अजिबात थारा असता कामा नये. परंतु हा शब्द जरी उच्चारला तरीही गुळमट तोंडे करणारी भगव्या कफनीतील माणसे सत्तेत निर्णय प्रक्रियेत सहभागी असतील, तर या प्रश्नाने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याशिवाय त्यांचे डोळे उघडणार नाहीत. खरे तर सध्याची स्थितीच भयावह म्हणावी अशी. पण त्याकडे दुर्लक्ष करण्याएवढा निर्बुद्धपणा अंगी जोपासल्यावर या प्रश्नाची तड लागणे ही महाकर्मकठीण गोष्ट. वयाच्या विशीच्या आतच लैंगिक अनुभव घेतलेल्या मुलांची टक्केवारी ३० एवढी असेल, तर हा प्रश्न गंभीर नाही, असे म्हणण्याचे धाडस कोण करील? याच वयोगटातील किमान १७ टक्के मुलीही अशा अनुभवाला सामोऱ्या जात असतील, तर हा विषय अधिक काळजीने हाताळायला हवा, हे तरी लक्षात येण्यास हरकत नाही. असा अनुभव घेतलेल्या मुलांचे सरासरी वय १३.७२ तर मुलींचे वय १४.०९ असे आहे, असे या पाहणीवरून आढळून आले आहे. सर्वात धोकादायक बाब म्हणजे या वयात लैंगिक विकाराने घेरल्याचे प्रमाण खरोखरीच काळजी करण्यासारखे आहे. देशातील जर चार टक्के मुले आणि मुली अशा विकाराने ग्रस्त असतील, तर या प्रश्नाकडे अधिक समंजसपणे पाहायला हवे. सामाजिक माध्यमे, चित्रवाणी, नियतकालिके, इंटरनेट यांसारखी माध्यमे जर प्रत्येक मुलाच्या हाती असलेल्या मोबाइलमध्ये सामावलेली असतील, तर त्याचा उपयोग विकृतपणे होण्याची शक्यता अधिक. सध्याच्या सरकारने त्यावर शोधलेला उपाय म्हणजे इंटरनेटवर असलेल्या कामुक संकेतस्थळांवर बंदी घालण्याचा. कोणत्याही प्रकारची बंदी घातल्याने सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटतील, हा भाबडेपणा झाला. उलट असे प्रश्न अधिक तीव्र रूप धारण करतात. विशिष्ट वयात मुलांना लैंगिकतेबद्दल शास्त्रशुद्ध माहिती देणे आवश्यक आहे, त्यामुळे विविध माध्यमांमध्ये असलेल्या विकृतीशी सामना करण्याएवढी समज तरी निर्माण होऊ शकते. अज्ञानापोटी निर्माण होणारे कुतूहल शमवणे हा मूलभूत मानवी स्वभाव असतो. नेमके हेच या पाहणीतूनही आढळून आले आहे. विवाहापूर्वी लैंगिक सुख मिळवणाऱ्यांमध्ये मुलांची संख्या अधिक म्हणजे १५ ते २२ टक्के एवढी आहे. मुलींमध्ये हेच प्रमाण १ ते ६ टक्के एवढे आहे. अज्ञानापोटी विकृती येते आणि त्यातून असाध्य रोगांनी पछाडले जाते. सहजसुलभ मानवी प्रेरणांचे दमन करून त्या उफाळण्याची शक्यता अधिक असते, हे सूत्र लक्षात घेऊन योग्य वेळी मुलामुलींना लैंगिकतेबद्दल योग्य ती माहिती दिल्यास त्यातून उद्भवणारी आरोग्यविषयक चिंता दूर होण्यास मदत होऊ शकेल. लैंगिक शिक्षणाची टर उडवण्यात धन्यता मानणारे सगळे जण स्वत:चेच उदाहरण देत असतात. परंतु त्यांना परिसरात सध्या काय घडते आहे, याचे भान नसते. आधीच नाना विकृतींमुळे भारतात लैंगिकतेशी निगडित एड्ससारख्या रोगांनी थैमान घातले असताना, लहान वयातच लैंगिक शिक्षण देणे म्हणूनच अत्यावश्यक आहे.

private schools within one km of govt schools not obligated to have rte seats
वर्गभेद निर्माण करणारा शिक्षण हक्क!
Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
Simran Thorat first woman merchant navy officer
शिक्षणासाठी पालकांनी जमीन विकली, पुण्याच्या सिमरन थोरातने मर्चंट नेव्ही क्षेत्रात मिळला ‘हा’ बहुमान