एक-एक ग्राहक पुन्हा जोडावा लागेल, गुंतवणूकदार, पुरवठादार इतकेच काय कंपनीच्या कर्मचाऱ्यांतही विश्वास जागवावा लागेल.. १०० वर्षांहून अधिक काळ व्यवसायाचा जम बसविलेल्या नेस्लेपुढील हे महाआव्हान आता ५५ वर्षीय सुरेश नारायणन यांच्यावर येऊन ठेपले आहे. दुसरीकडे खाद्यान्न क्षेत्रातील जगातील या सर्वात मोठय़ा कंपनीच्या भारतातील नवनियुक्त प्रमुखाला अन्न सुरक्षा प्राधिकरणाशी सुरू असलेल्या न्यायालयीन कज्जाची बाजूही सांभाळावी लागेल.
नेस्लेच्या भारताच्या बाजारातील उत्पादनांच्या ताफ्यातील सर्वाधिक लोकप्रिय मॅगी नूडल्सवरील ताज्या गंडांतराने संकटाच्या मालिकेचे रूप धारण करण्यापूर्वीच झालेल्या खांदेपालटातून नारायणन यांची भारताच्या कारभाराचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. नेस्लेच्या जागतिक पसाऱ्यातील एक जुनेजाणते अधिकारी असलेल्या नारायणन यांची नुकतीच एटिने बेनेट यांच्याजागी नेस्ले इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून घोषणा झाली. भारतीय बाजारपेठेच्या तुलनेत खूपच छोटय़ा असलेल्या फिलिपिन्सचा कारभार याआधी त्यांच्याकडे होता. मॅगी वादंगातून का होईना, तब्बल १७ वर्षांनंतर या स्विस कंपनीचा देशातील कारभार भारतीयाकडे आला आहे. नारायणन यांची नेस्लेतील कारकीर्द १९९९ पासून भारतातूनच सुरू झाली. २००१ सालापासून भारतातील अग्रणी ब्रॅण्ड म्हणून ‘नेसकॅफे’ ते ‘मॅगी’ या नेस्लेकडून सुरू झालेल्या महत्त्वाच्या संक्रमणाचे ते साक्षीदार राहिले आहेत. भारतीय ग्राहकांचे मानस आणि बाजारपेठेची नाडी अवगत असलेला माणूसच अशा समयी नेतृत्वस्थानी हवा. सरकारचे विविध विभाग, नियामक संस्था, स्वयंसेवी संस्था, देशभरातील कंपनीचे वितरक, पुरवठादार, कर्मचारी साऱ्यांना आपला वाटेल, त्यांच्याशी त्यांच्या भाषेत संवाद साधू शकणारे नेतृत्व म्हणून नारायणन यांच्याकडे पाहिले जात आहे.
नेस्ले इंडियाच्या एप्रिल ते जून तिमाहीच्या आर्थिक निकालांनी कंपनीपुढे किती मोठे संकट उभे ठाकले आहे याची चुणूक दिली आहे. ३० वर्षांतच पहिल्यांदाच कंपनीने या तिमाहीत तोटा नोंदविला. मॅगीसारखे प्रमुख उत्पादन बाजारात आणण्याला बंदीने कंपनीची विक्री २० टक्क्यांनी रोडावल्याचे आढळून आले. पण मॅगी पुन्हा बाजारात येईल आणि सर्व संकटेही दूर सरतील, असा नारायणन यांचा ठाम विश्वास आहे. किंबहुना याच कामगिरीसाठी भारताच्या कारभाराची धुरा त्यांच्याकडे सोपविण्याचा चाणाक्षपणा नेस्लेच्या जागतिक नेतृत्वाने दाखविला आहे.