भावगीतांच्या प्रवासात एका गुणी गायिकेने मोजकी गीते गायली, परंतु ती गीते लोकप्रिय झाली. गायनाचा उत्तम शास्त्रीय पाया आणि गोड गळा यामुळे ती गायिका श्रोत्यांच्या मनात ठसली. गायिका या नात्याने तिचे योगदान महत्त्वाचे ठरले. काही गीते गायली आणि ही गायिका प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहिली. याची कारणे सर्वसाधारणपणे ठाऊक नसतात. पण मनातली हुरहुर कायम राहते. फक्त रेडिओवर भावगीते ऐकायला मिळण्याच्या काळात या गायिकेच्या गीतांनी रसिकांचे कान-मन तृप्त केले. ध्वनिमुद्रिका विकत घेऊन गाणे ऐकण्याइतकी आर्थिक परिस्थिती नसण्याचा तो काळ. मग रेडिओने ते काम चोखपणे केले आणि एकापेक्षा एक सरस भावगीतांची आपल्या मनातील चित्रे रंगवायला सुरुवात केली. असा विलक्षण प्रभावी स्वर असलेली ही गायिका म्हणजे- कुंदा बोकील. त्यांनी गायलेल्या मोजक्या गीतांमधील ‘सरताज’ भावगीत म्हणजे- ‘निळा सावळा नाथ तशी ही निळी सावळी रात..’

गीतकार गंगाधर महांबरे आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांनी केलेले ‘निळा सावळा नाथ’ हे गीत पिढय़ान् पिढय़ा बांधून ठेवणारे झाले. गीत, संगीत आणि स्वर यांचा त्रिवेणी संगमच जणू! उत्तम शब्द व उत्तम स्वर एकत्र आले, की हा परिणाम होणारच. आजही हे गीत ऐकताना आपण त्यात अडकतो आणि आवडीने पुन्हा तीन-चार वेळा हे गीत ऐकतो. गाणे ऐकल्यानंतरच्या परिणामातून बाहेर पडणे कठीण जाते, असा आनंदाचा क्षण येतो. कित्येकांनी हे गीत असंख्य वेळा गुणगुणले असेल, गायले असेल. ‘मी काही गायक किंवा गायिका नाही, माझ्या आनंदासाठी गातो/गाते’ असे म्हणणाऱ्यांनीसुद्धा हे गीत अनेकवेळा गायले आहे. कुणी शब्दाच्या मोहात पडतो, कुणाला स्वररचना वेगळी वाटते, तर कुणाला गायिकेचा आवाज आवडतो. तिघांनी मिळून एका लोकप्रिय भावगीताचा महाल उभा केला, हे नक्की. त्या गीतातल्या ‘माहौल’मध्ये आपण रमतो, आनंदाने रेंगाळतो. हेच या भावगीताचे यश आहे. आजी-आई-नात या तिन्ही पिढय़ांनी हे गीत आवडीने गायले आहे.

Shekhar Suman Emotional Post
“रात्रभर मी त्याच्या मृतदेहाजवळ…”, ११ वर्षांच्या मुलाच्या निधनाचा तो प्रसंग सांगताना शेखर सुमन भावूक
amitabh bachchan marathi news, amitabh bachchan lata mangeshkar marathi news
लतादीदींच्या स्वरात मधाची गोडी, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या भावना
colors marathi this serial will go off air
‘कलर्स मराठी’वरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! कलाकार भावुक, २ वर्षे गाजवलं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…

मूळचे बडोद्याचे श्रीनिवास खळे आपल्यातल्या कलागुणांचे चीज व्हावे म्हणून मुंबईत आले. त्यांच्या मनात एक विश्वास होता- ‘एक दिवस माझाही येणार आहे’, आणि मुंबापुरी माणसातील गुणांची कदर नेहमीच करते.

‘निळा सावळा नाथ, तशी ही निळी सावळी रात

कोडे पडते तुला शोधिता कृष्णा अंधारात।

तुडवुनी वन, धुंडुनी नंदनवन

शोधुनी झाले अवघे त्रिभुवन

एक न उरले गोपीचे घर, हाकेच्या टप्प्यात।

नील जळी यमुनेच्या साची,

होडी सोडिली मी देहाची

गवसलास ना, परि तू कान्हा, लाटांच्या रासात।’

सतारीच्या पीसने गाण्याची सुरुवात आहे. त्या म्यूझिक पीसला पुढे बासरी व व्हायोलिन ही वाद्ये मिळाली आहेत. आरंभीचा हा म्यूझिक पीस बऱ्यापैकी मोठा पीस आहे. या गीताचे दोनच अंतरे आहेत, पण दोन्ही अंतऱ्यांची चाल वेगवेगळी आहे. पहिल्या अंतऱ्याची सुरुवात वरच्या सुरावर आहे, तर दुसरा अंतरा हा मंद्र सप्तकातील सुराकडे जातो. पहिल्या अंतऱ्याचा म्यूझिक पीस हा आरंभीच्या पीसपेक्षा लहान, तर दुसऱ्या अंतऱ्यापूर्वीचा पीस हा पहिल्यापेक्षा कमी जागेचा दिसतो. मुखडय़ाच्या पहिल्या ओळीतील ‘सावळी’ व ‘रात’ या शब्दांच्या स्वररचनेत ‘संगीतकार खळे’ दिसतात. तसेच मुखडा व अंतरा पूर्ण होताना ‘अंधारात, टप्प्यात, रासात’ या शब्दांतील सांगीतिक जागा ‘खास’ खळे साहेबांच्याच! ‘कृष्णा अंधारात’, ‘हाकेच्या टप्प्यात’ आणि ‘लाटांच्या रासात’ या दोन शब्दांचे उच्चारण करताना त्या दोन शब्दांच्या मधे गायिकेने श्वासाची जागा दाखविली आहे. हे गीत म्हणताना ती श्वास घेण्याची जागा लक्षात घ्यावीच लागेल. ती जागा एखाद्या सेकंदाची असेल तरीही महत्त्वाची आहे. खळेसाहेब व गायिका कुंदा बोकील या दोघांना ‘सलाम’ आहे.

याही स्वररचनेमध्ये लयीचा अनोखा अंदाज आहे. ते लयतत्त्व गायिका कुंदा बोकील यांनी समर्थपणे सांभाळले आहे. त्यातील भान हे शब्दापलीकडचे आहे आणि स्वरापलीकडचे अव्यक्तसुद्धा आहे. खळेसाहेब जेव्हा त्यांच्या चाली स्वत: गाऊन दाखवत त्या वेळी ‘लय’ हा त्यांच्या चालीचा आत्मा आहे, हे जाणवायचे. ‘सरींवर सरी’ या कार्यक्रमाच्या शतकमहोत्सवी प्रयोगात गाण्यासाठी खळेसाहेबांनी बा. भ. बोरकरांच्या ‘सरीवर सरी आल्या गं’ या सुप्रसिद्ध कवितेला चाल बांधली. मला व लोकप्रिय गायिका मृदुला दाढे-जोशी हिला ही चाल त्यांनी शिकविली. ही चाल त्यांच्याकडून शिकताना आम्ही दोन्ही गायक, संगीत संयोजक गिरीश प्रभू, तबलावादक संदीप मयेकर आम्ही सर्व अवाक् झालो होतो. त्यांचा गाण्यामागचा खोल विचार, लय हे सारे उच्चप्रतीचा आनंद देणारे होते. ललित संगीतात ‘श्रीनिवास खळे घराणे’ म्हणजे काय याचा अनुभव आम्ही घेतला.

गायिका कुंदा बोकील यांचा जन्मसुद्धा बडोद्याचाच. त्यांचे शालेय शिक्षण अहमदाबाद येथे झाले. कुंदाताईंना शाळेतल्या प्रत्येक कार्यक्रमात गाण्याची संधी मिळत गेली. वडिलांच्या नोकरीतील बदलीमुळे हे कुटुंब इंदूर येथे आले. इंदूरच्या संगीत विद्यालयाचे मुख्याध्यापक पंतवैद्य यांच्याकडे कुंदाताईंना शास्त्रीय गायन शिकण्याची संधी मिळाली. पुढील काळात गुरू महावीर प्रसाद यांच्याकडे त्या गजलगायकीचे तंत्र शिकल्या. १९५५ साली, म्हणजे कुंदाताईंच्या वयाच्या सोळाव्या वर्षी इंदूर आकाशवाणीने त्यांच्या गायनाचा पहिला कार्यक्रम केला. दिल्लीच्या अखिल भारतीय सुगम गायन स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक त्यांना राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते मिळाले. पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी मुंबईतील रुपारेल महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यामुळे मुंबईत आल्यावर आकाशवाणीसाठी गाण्याची संधी मिळाली. ‘भावसरगम’ या सुप्रसिद्ध कार्यक्रमातील कुंदा बोकील यांची गीते लोकप्रिय झाली. आकाशवाणीच्या दिल्ली, जम्मू, श्रीनगर, लखनौ, जयपूर, नागपूर या केंद्रांवरही गाण्याची संधी मिळाली. कुंदाताईंनी केवळ मराठीच नाही, तर गुजराथी, पंजाबी, कोकणी भाषेतील गीतेही गायली. खळेसाहेबांनी एच.एम.व्ही. कंपनीसाठी केलेली आणि कुंदा बोकील यांनी गायलेली ‘शाळा सुटली पाटी फुटली’ आणि ‘गम्माडी गम्मत जम्माडी जम्मत ये गं ये सांगते कानात’ ही गीतेसुद्धा लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. त्या काळात गंगाधर दांडेकर यांचे ‘संगीत पुनर्मीलन’ हे नाटक मुंबईतील साहित्य संघात सादर झाले होते. ‘गीत शाकुंतल’ या विषयावर आधारित ती कलाकृती. त्याचे संगीत प्रभाकर पंडित यांनी केले होते. त्यात स्नेहल भाटकर, शरद जांभेकर यांच्यासह कुंदाताईंनी गायलेली गाणी होती. त्यातील कुंदाताईंच्या गीतांना रसिकांची पसंती मिळाली. कुंदाताईंचा चित्रकलेचा पैलू हा फार कमी लोकांना माहिती आहे. बांद्रा स्कूल ऑफ आर्ट्समध्ये त्यांनी या विषयाचे रीतसर शिक्षण घेतले. निसर्गचित्रे, पोट्र्रेट्स हे त्यांच्या आवडीचे.

कुंदा बोकील यांचा भावगीत गायनावर स्वतंत्र विचार आहे. त्या सांगत : ‘भावगीत गायन ही स्वतंत्र आणि नाजूक, तशीच अवघड कला आहे. त्यासाठी शास्त्रीय संगीताचा पाया हवाच. आवाज जितका लवचीक तितकाच स्पष्ट हवा. चोरटय़ा आवाजात गाणे म्हणजे भावगीत हा गैरसमज आहे. साडेतीन- चार मिनिटांच्या भावगीतात स्वर, शब्द, भावना या मुख्य गोष्टींसाठी आवाजावर ताबा असावाच लागतो.’

‘निळा सावळा नाथ’ हे गीतकार गंगाधर महांबरे यांच्या असंख्य लोकप्रिय गीतांपैकी एक गीत आहे. महांबरेंचे बालपण मालवण परिसरातले. १९३१ चा तो काळ. त्या वेळी मालवण हे रत्नागिरी जिल्ह्य़ात होते. त्यांचे मूळ घराणे गोमांतकातील म्हापसा या गावचे. हे घराणे मूळचे बारदेशकर सारस्वत. गंगाधररावांचे वडील मालवणच्या ‘अनंत शिवाजी टोपीवाला’ या शाळेत शिक्षक होते. निसर्गरम्य वेंगुर्ला हे गंगाधर यांचे आजोळ. त्यांचे बालपण निसर्गाच्या सान्निध्यात समृद्ध झाले. मालवणच्या मेढे परिसरातील घराच्या माडीवर अण्णासाहेब आचरेकरांचा संगीत क्लास होता. त्यामुळे काही चिजा लहानपणीच मुखोद्गत झाल्या. मुरलीधरच्या मंदिरात गायनाची संधी मिळाली. मालवणी राष्ट्रसेवा दलाच्या शाखेमधील कलापथकात वाद्ये हाताळायला मिळाली. त्या काळात मालवणला येणाऱ्या संगीत नाटक मंडळींशी परिचय झाला. मो. ग. रांगणेकर, ज्योत्स्ना भोळे यांच्या भेटी झाल्या. पुढील काळात मुंबईत आल्यावर गंगाधर यांच्या वडिलांनी दादरच्या प्रसिद्ध बालमोहन विद्यामंदिरात नोकरी केली. या काळात गंगाधर महांबरे यांच्या थोरा-मोठय़ांशी भेटीगाठी झाल्या. मा. विनायक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पु. भा. भावे, प्रबोधनकार ठाकरे, स्वातंत्र्यवीर सावरकर, मामा वरेरकर, सत्यजित रे, गदिमा, मंगेशकर कुटुंबीय.. या भेटींमुळे गंगाधरांची मानसिक जडणघडण झाली. काही काळ त्यांनी एलफिन्स्टन महाविद्यालयात ग्रंथपालाची नोकरी केली. तो अनुभव पुढे फिल्म इन्स्टिटय़ूट (पुणे), किलरेस्कर कंपनीचे ग्रंथालय, ऑटोमोटिव्ह रिसर्च या ठिकाणी उपयोगी ठरला.

गजानन काशिनाथ रायकर आणि गंगाधर महांबरे या दोघांनी मिळून १९६५ ते १९६८ या काळात मराठी संगीत नाटकातील २०५ पदांचे संकलन- संपादन केले. महांबरे यांनी गीतकार, लेखक, संपादक, अनुवादक, कोशकार, ग्रंथपाल असे बहुपेडी काम केले. त्यांनी ‘द्वंद्वगीत’ या शब्दाऐवजी ‘युगुलगीत’ हा शब्द रूढ केला. माडगूळकरांच्या गीत रामायणाच्या धर्तीवर ‘गीत गौतम’ लिहिले. ‘जय जगदीश हरे’ हे संगीत नाटक लिहिले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांचा भावानुवाद केला. ‘संगीत देवदूत’, ‘संतांची कृपा’ ही नाटके लिहिली. सैगलप्रेमींसाठी सैगलचे चरित्र लिहिले. काही वर्षांपूर्वी पुण्यामध्ये मी सादर केलेल्या ‘बाबुल मोरा’ या सैगलगीतांच्या कार्यक्रमाला गंगाधर महांबरे व त्यांच्या पत्नी अरुंधती यांनी उपस्थित राहून मला आशीर्वाद दिले. ‘रे जीवना रोज तुझे गीत गावे, जसे शक्य होईल तसे मी जगावे’ ही त्यांची जीवनदृष्टी होती. नाशिकच्या प्रा. शैलजा माधवराव पाटील यांनी महांबरे यांच्या कलाक्षेत्रातील योगदानावर ‘डॉक्टरेट’ केली आहे.

गंगाधर महांबरे यांचे बारा कवितासंग्रह, बारा नाटक-नाटिका, दोन कथासंग्रह, सहा ललित लेखसंग्रह, पाच चरित्रे, तीन अनुवाद, एक समीक्षा लेखसंग्रह, सहा संगीतविषयक ग्रंथ, सात चित्रपट रसग्रहण ग्रंथ असे सर्जनशीलतेचे व्यापक योगदान पाहून कविश्रेष्ठ ग. दि. माडगूळकर म्हणाले..

‘‘जय’ नाद निनादती अंबरे

जय जय गंगाधर महांबरे..’

विनायक जोशी vinayakpjoshi@yahoo.com