‘‘पाकिस्तानचा संघ बांगलादेशविरुद्ध दणदणीत विजयानिशी दुसरी लढत खेळतो आहे. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत हरलेल्या भारतीय संघावर मायदेशात होणाऱ्या विश्वचषकातील आव्हान टिकवण्याची टांगती तलवार आहे. त्यामुळेच पाकिस्तानपेक्षा अधिक दडपण या सामन्याचे भारतावर आहे,’’ असे मत पाकिस्तानचे प्रशिक्षक वकार युनूस यांनी व्यक्त केले आहे. ‘‘विश्वचषकातील इतिहास जरी भारताच्या साथीने असला तरी या वेळी पाकिस्तानी संघ अधिक आत्मविश्वासाने खेळेल आणि आम्ही इतिहास बदलू,’’ असे युनूसने सांगितले. खेळपट्टीबाबत ते पुढे म्हणाले, ‘‘भारतातील मैदानांवर फिरकीची भूमिका महत्त्वाची असणार याची सर्वच संघांना जाणीव आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्यात किमान दोन फिरकी गोलंदाजांसह संघ खेळत आहेत. आमच्याकडे जगातील सर्वोत्तम वेगवान मारा आहे. याबाबतीत आम्ही भारतापेक्षा सरस आहोत.’’