खरं तर ‘प्रोसेसर’ हा संपूर्ण विषयच अतिशय तांत्रिक आणि गूढ वाटणारा आहे. प्रोसेसरच्या दुनियेतील ‘एन्व्हीडिया टीएग्रा २’, ‘क्वालकॉम स्नॅपड्रॅगन’, ‘टी ओमॅप’ अशी अवजड वाटणारी नावंच मुळात ग्राहकांना बुचकळय़ात पाडत असतात. त्यामुळेच  यंदाच्या ‘टेक इट’मधून ‘प्रोसेसर’बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न ..
स्मार्टफोनच्या वाढत्या मागणीसोबत त्यामध्ये विविध वैशिष्टय़पूर्ण बदल होत चालले आहेत. यापैकी वेग हा कंपनी आणि वापरकर्ते या दोघांसाठीही महत्त्वाचा बदल आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून खुल्या होणाऱ्या अ‍ॅप्सच्या अफाट विश्वात स्वैरसंचार करायचा असेल तर त्यासाठी वेगवान आणि मजबूत ‘प्रोसेसर’ आवश्यक आहेत. त्यामुळेच अलीकडे स्मार्टफोन खरेदी करताना ‘प्रोसेसर’ची क्षमता सर्वात आधी पाहिली जाते. कंपन्यांनाही ही गोष्ट माहीत असल्याने नवीन स्मार्टफोनची जाहिरात करताना ‘प्रोसेसर’च्या क्षमतेवरच प्रयत्नपूर्वक जोर दिला जातो. सिंगल कोअर, डय़ुअल, क्वाडकोअर, ऑक्टोकोअर असे अनेक प्रकारचे प्रोसेसर असलेले स्मार्टफोन बाजारात आहेत. ग्राहक खरेदी करताना जास्त ‘कोअर’च्या प्रोसेसरयुक्त स्मार्टफोनला पसंती देत असले, तरी ‘प्रोसेसर’ म्हणजे नेमकं काय, हे त्याला उमजत नाही.
खरं तर ‘प्रोसेसर’ हा संपूर्ण विषयच अतिशय तांत्रिक आणि गूढ वाटणारा आहे. प्रोसेसरच्या दुनियेतील ‘एन्व्हीडिया टीएग्रा २’, ‘क्वालकॉम स्नॅपड्रॅगन’, ‘टी ओमॅप’ अशी अवजड वाटणारी नावंच मुळात ग्राहकांना बुचकळय़ात पाडत असतात. त्यामुळेच  यंदाच्या ‘टेक इट’मधून ‘प्रोसेसर’बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
प्रोसेसर म्हणजे काय?
स्मार्टफोन हे आता केवळ संभाषण किंवा व्यक्तिगत नोंदीचे उपकरण उरलेले नाही. स्मार्टफोन म्हटलं की व्हीडिओ प्लेअर, म्युझिक प्लेअर, वेब ब्राउजिंग, गेमिंग, कॅमेरा, अ‍ॅप्स अशा अनेक गोष्टी येतात. या सर्व गोष्टी एकाच वेळी सक्षमपणे आणि वेगाने पार पाडण्याचे काम स्मार्टफोनच्या हार्डवेअरमधील यंत्रणा करत असते. या कामाच्या केंद्रस्थानी असतो, तो प्रोसेसर. ज्याप्रमाणे मानवाच्या शरीराच्या सर्व हालचाली मेंदूमधील क्रियाप्रक्रियांवर अवलंबून असतात. त्याचप्रमाणे स्मार्टफोनमधील सर्व प्रक्रिया प्रोसेसरवर अवलंबून असतात. या क्रिया घडवून आणण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व तांत्रिक जुळवण्या प्रोसेसरमार्फत पार पडत असतात. थोडक्यात प्रोसेसर हा स्मार्टफोनचा मेंदू आहे.
संगणकामध्येही ‘प्रोसेसर’च्या नियंत्रणाखालीच सर्व प्रोग्रॅम्स चालत असतात. पण स्मार्टफोन आणि संगणकातील प्रोसेसरमध्ये बराच फरक असतो. संगणकातील सर्व क्रियाप्रक्रिया पार पाडण्याचे काम ‘मदरबोर्ड’शी जोडली गेलेली सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (सीपीयू), ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट (जीपीयू), मेमरी, पेरीफेरियल बसेस यांची यंत्रणा करत असते. स्मार्टफोनमध्येही अशी यंत्रणा असते. मात्र त्यांचा पसारा संगणकाइतका मोठा नसतो. स्मार्टफोनच्या एकूण आकाराप्रमाणे त्यातील ‘प्रोसेसर’ ही एक छोटी ‘चिप’ असते. संगणकातील वरील सर्व यंत्रणा ही एकटी चिप हाताळत असते. तिला ‘सिस्टीम ऑफ अ चिप’ अर्थात ‘एसओसी’ असेही म्हणतात.
‘एसओसी’मध्ये सर्वात महत्त्वाचा घटक ‘सीपीयू’ असतो. स्मार्टफोनची ऑपरेटिंग सिस्टीम, टच स्क्रीन अशा सर्व गोष्टींची हाताळणी या ‘सीपीयू’च्या माध्यमातून होत असते. बहुतांश सर्वच स्मार्टफोन कंपन्या एकाच प्रकारच्या सीपीयू डिझाइनचा वापर करतात. ‘एआरएम’ नावाची कंपनी हे डिझाइन तयार करते. प्रोसेसरबद्दल सांगताना ८०० मेगाहार्ट्झ (एमएचझेड) किंवा १ गिगाहार्ट्झ (जीएचझेड) असे म्हटले जाते, ती सीपीयूची वेगक्षमता आहे. ‘सिंगल कोअर’ म्हणजे एकच सीपीयू केंद्रस्थानी (कोअर) असलेला प्रोसेसर. त्याप्रमाणे डय़ुअल कोअर म्हणजे दोन सीपीयू कोअर असलेला प्रोसेसर.
‘एसओसी’मधील दुसरा महत्त्वाचा घटक ‘जीपीयू’ असतो. स्मार्टफोनच्या दृश्यात्मक (ग्राफिकल) बाबी हाताळणीचे काम ‘जीपीयू’मार्फत केले जाते. वेबपेजेस, गेम्स, व्हिडीओ या गोष्टी चांगल्या प्रकारे पार पडण्यासाठी ‘जीपीयू’ महत्त्वाची भूमिका बजावतो. काही स्मार्टफोनमध्ये ही प्रक्रिया पार पाडण्याचे काम प्रोसेसरमधील ‘सीपीयू’च करतो. मात्र त्यामुळे ‘सीपीयू’वरील प्रक्रियेचा ताण वाढतो आणि गेम्स किंवा वेब ब्राउजिंग करताना अपेक्षित दृश्यात्मकता दिसत नाही. त्यामुळे ‘जीपीयू’ असणारा प्रोसेसर अधिक महत्त्वपूर्ण आहे. चांगल्या दर्जाच्या ‘जीपीयू’मुळे केवळ दृश्यात्मकताच वाढत नाही, तर स्मार्टफोनची बॅटरीही दीर्घकाळ चालते.
‘एसओसी’मध्ये काही ‘सबप्रोसेसर’देखील असतात. हे ‘सबप्रोसेसर’ व्हिडीओ, कॅमेरा, ऑडिओ या गोष्टी सांभाळत असतात. याशिवाय काही स्मार्टफोनमध्ये ब्लूटुथ, वायफाय,  जीपीएस, थ्रीजी/फोरजी या गोष्टींसाठीही ‘सबप्रोसेसर’ असतात.
प्रत्येक ‘प्रोसेसर’ वेगळा असतो
प्रत्येक प्रोसेसरची क्रियाप्रक्रिया त्यातील सीपीयूच्या वेगावर ठरत असते. पण सीपीयूचा वेग सारखा असलेले दोन प्रोसेसर सारख्याच वेगाने काम करतील, याची खात्री देता येत नाही. एक गिगाहार्ट्झ प्रोसेसर क्षमता असलेल्या दोन स्मार्टफोनची कार्यक्षमता वेगवेगळी असू शकते. कारण प्रोसेसर बनवणाऱ्या वेगवेगळय़ा कंपन्या आपापल्या पद्धतीने ‘चिप’ तयार करत असतात.
आजघडीला स्मार्टफोनला प्रोसेसर पुरवणाऱ्या चार कंपन्या आघाडीवर आहेत. एन्व्हीडिया, क्वालकॉम, टेक्सास इन्स्ट्रमेंट आणि सॅमसंग या त्या चार कंपन्या आहेत. या चारही कंपन्यांना ‘सीपीयू डिझाइन’ पुरवणारी कंपनी मात्र एकच आहे- ‘एआरएम’. मात्र तरीही या चारही कंपन्यांच्या समान वेगाच्या प्रोसेसरची कार्यक्षमता समान नसते. याचे कारण यापैकी काही कंपन्या ‘एआरएम’कडून थेट ‘सीपीयू डिझाइन’ घेतात. तर काही कंपन्या ‘एआरएम’कडून ‘सीपीयू डिझाइन’चा आराखडा मिळवतात व त्यावर आधारित डिझाइन बनवतात. ही तफावत ‘प्रोसेसर’ची कार्यक्षमता कमीअधिक करू शकते. उदाहरणच द्यायचे झाले, तर ‘क्वालकॉम’च्या प्रोसेसरमध्ये ‘एआरएम’कडून आराखडा घेऊन स्वत: डिझाइन केलेले ‘सीपीयू’ असतात. त्यामुळे या कंपनीचे काही ‘डय़ुअल कोअर’ प्रोसेसर अन्य कंपन्यांच्या प्रोसेसरपेक्षा अधिक वेग देतात.
‘डय़ुअल कोअर’च्या पुढे
स्मार्टफोनवरील क्रियाप्रक्रिया जितक्या वाढत जात आहेत, तितक्याच वेगाने वाढीव क्षमतेचे प्रोसेसर तयार होऊ लागले आहेत. हे समीकरण उलटही करता येईल. म्हणजेच, वाढत्या क्षमतेच्या प्रोसेसरमुळे स्मार्टफोनवरील क्रियाप्रक्रिया अधिकाधिक वाढत आहेत. ‘डय़ुअल कोअर’ प्रोसेसरमुळे स्मार्टफोनला ‘थ्रीडी’ आणि ‘एचडी व्हिडीओ’ चालवण्याचे बळ मिळाले आहे. डय़ुअल कोअर प्रोसेसरमध्ये दोन सीपीयू असतात. यापैकी एक सीपीयू एक गिगाहार्ट्झ आणि दुसरा १.२ गिगाहार्ट्झ क्षमतेचा असतो. ‘सिंगल कोअर’ प्रोसेसर सर्व क्रियाप्रक्रिया घडवून आणण्यासाठी जास्त बॅटरी खेचतो. तर डय़ुअल कोअर प्रोसेसरमध्ये कामांची विभागणी होत असल्याने बॅटरी खर्च होण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे ‘मल्टीटास्किंग’ अर्थात एकाच वेळी दोन किंवा अधिक प्रोग्रॅम्स हाताळणे शक्य होते.
‘क्वाडकोअर’चा जमाना
प्रोसेसरची क्षमता दिवसेंदिवस वाढत आहे आणि भविष्यातही ती वाढत जाईल. स्मार्टफोनच्या माध्यमातून वापरकर्त्यांना अनेक गोष्टी तळहातावर करण्याइतक्या सोप्या झाल्या आहेत. दिवसेंदिवस या गोष्टींमध्ये भर पडत आहे. साहजिकच जितक्या जास्त क्रियाप्रक्रिया तितक्या जास्त क्षमतेचे प्रोसेसर लागणार आहेत. त्यामुळे आता क्वाडकोअर प्रोसेसरचा जमाना येऊ लागला आहे. ‘क्वाडकोअर’मध्ये एकाच वेळी चार सीपीयू केंद्रस्थानी राहून स्मार्टफोनची यंत्रणा चालवत असतात. त्यामुळे फोनची कार्यक्षमता वाढते. क्वाडकोअरमुळे स्मार्टफोनचे ‘स्क्रीन रेझोल्युशन’ अधिक चांगले करता येते, फोटो किंवा अ‍ॅप्स लगेच कार्यान्वित होतात, गेम्स खेळण्याचा आनंद द्विगुणीत होतो. त्यामुळे सर्वच प्रोसेसर बनवणाऱ्या कंपन्या आता ‘क्वाडकोअर’च्या निर्मितीवर भर देत आहेत.
प्रोसेसर हा संगणकातील मेंदू आहे, असे म्हणतात. हा मेंदू जितका ‘तल्लख’ होईल, तितके स्मार्टफोनचे ‘अवयव’ अधिक चांगल्या क्षमतेने काम करतील. एकीकडे स्मार्टफोनचा ‘मेंदू’ दिवसेंदिवस तल्लख होत आहे. मात्र स्मार्टफोनवरील अ‍ॅप्स अजूनही ‘सिंगल कोअर’ किंवा ‘डय़ुअल कोअर’ प्रोसेसरशी अनुरूप असलेलेच आहेत. थोडक्यात स्मार्टफोनवरील ‘अ‍ॅप्स’ना ‘क्वाडकोअर’चा खरा फायदा अजूनही उचलता आलेला नाही. तो उचलण्याचा प्रयत्न हे ‘अ‍ॅप्स’ करतील, तेव्हा आपले जग अधिक ‘स्मार्ट’ झाले असेल!
– आसिफ बागवान
asif.bagwan@expressindia.com