ठाकुर्ली येथील इमारत दुर्घटनेला आठवडाही उलटत नाही तोच मंगळवारी पहाटे ठाण्यात तीन मजली इमारत कोसळून १२ जण ठार झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत सात जण जबर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. कोसळलेल्या इमारतीचा समावेश ‘धोकादायक इमारती’मध्ये नव्हता. त्यामुळे इमारत धोकादायक ठरवण्याच्या प्रक्रियेतील त्रुटी पुन्हा एकदा उघड झाल्या आहेत. मालकांच्या कौटुंबिक वादातून या इमारतीचा पुनर्विकास रखडल्याची चर्चा असून या घटनेतील नेमके दोषी कोण याचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्याची तयारी ठाणे पोलिसांनी सुरू केली आहे.
ठाणे रेल्वेस्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नौपाडय़ातील बी केबिन परिसरातील कृष्णा निवास ही इमारत मंगळवारी पहाटे दोन वाजता अचानक कोसळली. १९६३ मध्ये उभारलेल्या या इमारतीत एकूण पाच कुटुंबे वास्तव्यास होती. हे सर्वजण इमारतीत भाडेकरू म्हणून राहात होते. ५२ वर्षांच्या या इमारतीचे प्लास्टर सोमवार सायंकाळपासूनच निखळण्यास सुरुवात झाली होती. मात्र, ही धोक्याची घंटा रहिवाशांच्या लक्षात आली नाही. मंगळवारी पहाटे इमारत अचानक कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले. इमारत कोसळण्याच्या आवाजाने परिसरातील रहिवासी जागे झाले. त्यांनी तातडाने मदतकार्य सुरू केले. ठाणे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम व त्यांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलानेही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या दोन्ही पथकांनी ढिगारा उपसून त्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. अरविंद नेने (८०) यांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले. दरम्यान, मुंबईहून राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे (एनडीआरएफ) जवानही घटनास्थळी दाखल झाले. या सर्व बचाव पथकांनी अथक परिश्रम घेत ढिगाऱ्याखालून १२ मृतदेह बाहेर काढले. तर सात जणांना जबर जखमी अवस्थेत बाहेर काढले.

पुनर्विकास रखडला
ठाणे शहरातील ३० वर्षांपेक्षा जुन्या अधिकृत इमारतींच्या पुनर्विकासासाठी अतिरिक्त चटईक्षेत्र देण्याची तरतूद महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीत आहे. त्यानुसार या इमारतीचा पुनर्विकास होणे अपेक्षित होते. मात्र, इमारत मालकांच्या वादातून हा विकास रखडल्याची चर्चा असून यासंबंधी अधिकृत दुजोरा मात्र कुणी दिलेला नाही. यासंबंधी इमारत मालक असलेल्या पाटील कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
दुबई-अमेरिकेहून आले, अन्..
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सुबराव भट यांची मुलगी रश्मी दुबईहून आली होती. ती या दुर्घटनेची बळी ठरली. तर अन्य रहिवासी अरुण सावंत यांचा मुलगा भाचीच्या वाढदिवसासाठी खास अमेरिकेहून आला होता. त्याचाही करुण अंत झाला.
नव्या घरात जीव रमेना म्हणून..
कृष्णा निवासात हयात घालवलेले अरुण सावंत निवृत्तीनंतर लोढा संकुलात रहावयास गेले होते. मात्र, तिथे मन रमत नसल्याने पुन्हा ते कृष्णा निवासात वास्तव्याला आले. काळच त्यांना येथे घेऊन आल्याची चर्चा उपस्थितांत होती. दरम्यान, तळमजल्यावर काही दिवसांपूर्वी बांधकाम सुरू होते. त्यास आक्षेप घेतल्याने ते थांबवण्यात आले होते.