पोखरणच्या रस्ता रुंदीकरणासाठी पालिकेचाच सपाटा; पुनरेपणाचे दावे फोल

बडय़ा बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पांच्या आड येणारी झाडे पाडण्यास मुक्तहस्ते परवानगी देणाऱ्या ठाणे महापालिकेने आता स्वत:च ठाण्याच्या निसर्गसंपदेवर कुऱ्हाड चालवण्यास सुरुवात केली आहे. घनदाट झाडे आणि हिरवाईसाठी ओळखल्या जाणाऱ्या येऊर, गावंड बाग तसेच पोखरण रस्ता क्रमांक दोन येथील रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी तब्बल १४०० झाडे भुईसपाट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. विशेष म्हणजे, नौपाडा, भास्कर कॉलनी, मीनाताई ठाकरे चौक परिसरातील अशाच बहारदार वृक्षांवर उड्डाणपुल उभारणीच्या निमित्ताने घाला घातला जात असून या ठिकाणी उड्डाणपुलाच्या खरच आवश्यकता होती का, असा सवालही उजाड झालेला हा परिसर पाहून उपस्थित केला जात आहे.

ठाणे शहरात बडय़ा बिल्डरांना त्यांच्या मोठय़ा प्रकल्पांसाठी हिरवा गालिचा घालताना हजारोंच्या संख्येने वृक्षांच्या तोडीसाठी वृक्ष प्राधिकरण समितीकडून परवानगी देण्यात येते. मुंबईस्थित एका मोठय़ा बिल्डरला यापूर्वी देण्यात आलेली अशा स्वरूपाची परवानगी वादात सापडली असताना पुन्हा एकदा शेकडो वृक्षांच्या कतलीचे प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणापुढे पाठविले जात आहेत. महापालिका प्रशासनातील एक वरिष्ठ अधिकारी हे प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी भलताच आग्रही असल्याचे बोलले जाते. असे असताना रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली आणखी १४०० वृक्षांच्या कतलीचा नवा प्रस्ताव येत्या २२ एप्रिल रोजी घेण्यात येणाऱ्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीपुढे ठेवण्यात आला आहे. कॅडबरी जंक्शन ते शास्त्रीनगर नाका या पोखरण रस्ता क्रमांक एकच्या रुंदीकरणासाठी यापूर्वी १२०० दुर्मीळ वृक्षांवर पोकलेन चालविण्यात आला आहे. या वृक्षांचे पुनरेपणही वादात सापडले आहे. असे असताना शास्त्रीनगर नाका ते येऊर रस्त्यापर्यंतची १९१, तर येऊर रस्ता ते गावंड बाग रस्ता नाक्यापर्यंतची २३५ झाडे अशाच पद्धतीने कापली जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात रौनक पार्क ते माजीवडा या पोखरण रस्ता क्रमांक २ च्या रुंदीकरणात बाधित होत असलेल्या ९३५ झाडांवर पोकलेन चालविले जाणार आहे. या सगळ्या वृक्षांचे पुनरेपण केले जाईल असा दावा उद्यान विभागामार्फत केला जात असला तरी तो पोकळ असल्याचे यापूर्वीचा अनुभव सांगतो, असा टोला वृक्ष प्राधिकरण समितीमधील एका ज्येष्ठ सदस्याने लगाविला. या प्रकरणी महापालिकेच्या उद्यान विभागाचे उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही होऊ शकला नाही.

बिल्डरांचे चांगभले

पोखरण रस्ता क्रमांक एकचे रुंदीकरण करत असताना रस्त्यालगत असलेल्या कंपन्यांना विकास हस्तांतरण हक्क प्रदान करण्यात आले आहे. महापालिका प्रशासन कितीही दावा करत असला तरी यामुळे शहरातील ठरावीक बिल्डरांचे होत असलेले चांगभले पर्यावरणप्रेमींच्या नजरेतून सुटलेले नाही. पोखरण रस्ता क्रमांक एकच्या रुंदीकरणात शहरातील एक बडा वास्तुविशारद जातीने लक्ष ठेवून असल्याची चर्चाही आहे.