वृत्तछायाचित्रकारांनी नेहमीच कॅमेऱ्याचा वापर करताना स्वयंचलित विधीऐवजी (ऑटो मोड) हस्तचलीत विधीचा (मॅन्युअली) वापर करावा. तरच, छायाचित्रकारांना भविष्यातील स्पर्धेला सामोरे जाता येणार आहे, असे मोलाचे मार्गदर्शन ज्येष्ठ छायाचित्रकार अँजेलो डिसिल्व्हा यांनी येथे केले.

जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्यावतीने वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आले आहे. ठाणेकर नागरिकांसाठी २० ऑगस्टपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.

वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून काम करताना ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या छायाचित्रकारांनी काढलेल्या ‘हटके’ आणि उत्कृष्ट छायाचित्रांचे प्रदर्शन सध्या गडकरी रंगायतनमध्ये सुरु आहे. खास करून ठाण्यातील छायाचित्रकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे याकरिता जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून ठाण्यातील वृत्तपत्रात काम करणाऱ्या छायाचित्रकारांनी काढलेली छायाचित्रे या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत.

ही, छायाचित्रे पहिल्यानंतर ज्येष्ठ छायाचित्रकार अँजेलो डिसिल्व्हा यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तर या उपक्रमाचे ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी देखील स्वागत केले.