भरधाव दुचाकींचा सुळसुळाट; दुचाकीच्या धडकेत दोघांना दुखापत
ठाणे येथील उपवन तलाव परिसरातील रस्त्यांवर पुन्हा एकदा दुचाकीस्वारांचा धुमाकूळ सुरू झाला आहे. सोमवारी रात्री अशाच एका भरधाव दुचाकीच्या धडकेत या परिसरात फेरफटका मारण्यासाठी आलेल्या दाम्पत्याला दुखापत झाली. मध्यंतरी या भागात भरधाव वेगाने दुचाकी चालविणाऱ्या दुचाकीस्वारांच्या मुसक्या वाहतूक पोलिसांनी आवळल्या होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी पुन्हा एकदा दुचाकीस्वारांचा उपद्रव सुरू झाला आहे.
येऊर जंगलाच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गरम्य उपवन परिसरात सकाळ-संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या ठाणेकरांची संख्या मोठी आहे. या भागात फारशी रहदारी नसल्याने नागरिकांसाठी हे एक निवांतपणाचे ठिकाण आहे. मात्र, या निवांतपणाचाच गैरफायदा घेत रात्री नऊनंतर येथे बाइकस्वारांचा धुमाकूळ सुरू होतो. या ठिकाणी वेगाने बाइक चालवणे, बाइकवरून कसरती करणे, शर्यती लावणे, असे उद्योग सुरू असतात. काही महिन्यांपूर्वी उपवनमधील बाइकस्वारांच्या उपद्रवाचे वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनीही कडक कारवाई केली होती. येथील पोलिसांची गस्तही वाढवण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून येथे पुन्हा एकदा दुचाकीस्वारांच्या टोळय़ा फिरू लागल्या आहेत.
सोमवारी रात्री एक दाम्पत्य आपल्या दुचाकीवरून उपवन तलाव परिसरात फिरण्यासाठी आले असताना महापौर बंगल्यापासून काही अंतरावरच एका भरधाव मोटारसायकलने त्यांच्या दुचाकीस पाठीमागून धडक दिली. या अपघातात सदर दाम्पत्यास किरकोळ दुखापत झाली, तर धडक देणारे बाइकस्वार जागेवरून पसार झाले. शुक्रवारी रात्रीचा अपघात पाहून नागरिकांच्या उरात धडकी भरली होती. उपवन तलाव परिसराचा दुचाकीस्वारांनी ताबा घेतला असून त्यांच्या अचाट कसरती जिवावर बेतू शकतात. त्यामुळे सकाळ, सायंकाळी आणि रात्रीच्या जेवणानंतर फेरफटका मारणे आता असुरक्षित वाटत असल्याच्या प्रतिक्रिया तेथील नागरिकांकडून देण्यात आल्या.

नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन
उपवन तलाव परिसरात अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले असून त्यांच्यामार्फत अशा दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात येते. तिथे नेमलेले अधिकारी-कर्मचारी डय़ुटी संपल्यानंतर निघून जातात. त्या संधीचा फायदा घेऊन दुचाकीस्वार पुन्हा रस्त्यावर येतात, असा दावा ठाणे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी केला आहे. अशा दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यासाठी आता व्हॉटसअ‍ॅप क्रमांक सुरू करण्यात येणार असून त्याच्या माध्यमातून नागरिकांना अशा दुचाकीस्वारांचे व्हिडीओ पाठवता येऊ शकतात. त्याआधारे संबंधित दुचाकीस्वारावर कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय, आमदार निधीच्या माध्यमातून लवकरच उपवन परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून हे कॅमेरे वाहतूक नियंत्रण कक्षाशी जोडण्यात येणार आहेत, असेही करंदीकर यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक
८८७९११८८११
७०३९००३८६६