लष्करी परीक्षा पेपरफुटीत अडकलेल्या विद्यार्थ्यांची भावना

‘दुपारी परीक्षा केंद्राकडे निघालो होतो. अचानक एका दुचाकीस्वाराने मला अडवून ‘सैन्य भरतीचा पेपर हवा असेल तर दीड लाख रुपये दे’, असे विचारले. पेपर हवा असेल तर दहावी-बारावी निकालाच्या सत्यप्रती आपल्याकडे देण्याची मागणीही त्याने केली. मीही मोहात पडून त्याला सत्यप्रती दिल्या आणि थोडय़ा वेळात पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले..’ बिहारमधून सैन्य भरतीसाठी आलेल्या विक्रमकुमारचे अश्रू अनावर होत होते. लष्करात भरती होण्यासाठी प्रश्नपत्रिका खरेदी करण्यासाठी निघालेल्या विक्रमसारख्या अनेक मुलांना पोलीस चौकशीला तोंड द्यावे लागले.

[jwplayer SsOh4X07]

मोहाच्या बळी पडल्याने होत्याचे नव्हते झाल्याचा अनुभव घेतलेली अशी अनेक तरुण मुले आता ‘तेलही गेले आणि तूपही’ अशा अवस्थेत पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात विमनस्क अवस्थेत बसली होती. विक्रमप्रमाणेच परराज्यातून आलेल्या २० ते २५ जणांची यात फसगत झाली. या सर्वाची चौकशी ठाणे पोलिसांकडून मंगळवारी करण्यात येत होती. अशाच प्रकारची घटना उत्तर प्रदेशमधील मेनपूर या जिल्ह्य़ातून पुण्यात परीक्षा देण्यास आलेल्या १९ वर्षीय दिलीप कुमार यादव याच्यासोबत घडली. महाराष्ट्रात सैन्य भरती असल्याचे मित्रांकडून समजल्यानंतर दिलीप त्यांच्यासोबत पुण्याला आला. पण येथेही अचानक एका व्यक्तीने त्यांना गाठले आणि परीक्षेची प्रश्नपत्रिका देण्याचे आमिष दाखवले. त्याने मागितलेले एक लाख रुपये नसल्याने दिलीपने आपल्या निकालाच्या सत्यप्रती त्याच्याकडे ‘गहाण’ ठेवल्या. पण ही घटना घडताच, काही वेळात पोलीस तिथे आले आणि दिलीपला त्यांनी ताब्यात घेतले. आपल्यावर गुदरलेला हा प्रसंग सांगताना दिलीप ओक्साबोक्शी रडत होता. अशा पद्धतीने बीड येथील एका १८ वर्षीय मुलाचीही फसवणूक झाली. वडील लष्कराचे निवृत्त अधिकारी. लष्करात भरती होऊ नको, तिथे खूप वाईट वागणूक दिली जाते असे अनेकवेळा त्यांनी सांगितले. मात्र वडिलांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून या तरुणाने लष्करात भरतीसाठी अर्ज केला, पण या पेपरफुटीच्या प्रकरणानंतर त्याचा भ्रमनिरास झाला.

[jwplayer KxgDFb6T]