डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा देशात गौरव सुरू असतानाच बदलापुरातील बाबासाहेबांचे स्मारक मात्र गेल्या चार वर्षांपासून पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहे. राज्य शासनाकडे निधीच्या मंजुरीसंबंधीचा प्रस्तावही गेल्या दीड वर्षांपासून पडून असल्याने बाबासाहेबांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीच्या दिवशीही त्यांचे स्मारक अर्धवट अवस्थेतच पाहावे लागणार आहे. यामागे शिवसेना भाजपमधील चढाओढ तर कारणीभूत नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे. काम रखडल्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत असतानाच शहरामध्ये डॉ. बाबासाहेब यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांचा नाराजीचा सूर काहीसा मावळल्याचे चित्र आहे.
बदलापूर पश्चिमेतील सोनिवलीजळील चार एकर परिसरात बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. यात उद्यान, वाचनालय, पुतळा, कारंजे आणि निवास व्यवस्थेचा समावेश असणार आहे. या स्मारकासाठी पाच कोटी ४५ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित होता. त्यापैकी ५० लाखांचा निधी राज्य सरकारच्या वैशिष्टय़पूर्ण निधीतून उपलब्ध झाला. कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेतही ठराव करण्यात आला असून त्यामध्ये स्मारकाचे काम पूर्ण करण्यावर एकमत झाले होते. फेब्रुवारी २०१२ मध्ये या स्मारकाचे काम सुरू झाले, त्याच वर्षी दहा टक्के काम पूर्ण होऊन स्मारकातील स्तूपाचा ढाचा बांधून तयार झाला. मात्र, त्यानंतर निधी अभावी स्मारकाचे काम रखडले. पुढील निधीच्या मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यानंतर हा प्रस्ताव जिल्हा साहाय्यक संचालक नगररचनाकर यांची मंजुरी घेऊन शासन दरबारी मंजुरीसाठी पाठवण्यात आला. मात्र, दीड वर्षांनंतरही शासनाकडून स्मारकासाठी निधी उपलब्ध होऊ शकलेला नाही. त्यामुळे स्मारकाचे काम सध्या रखडलेले असून मलमपट्टी म्हणून आता प्रवेशद्वाराला रंगरंगोटी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

महिला सबलीकरणासाठी डॉ. आंबेडकरांचे योगदान मोठे!
ठाणे : महिला स्त्री कामगारांना सवलती मिळाव्यात म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या काळातही अनेक प्रयत्न केले. स्त्रियांना प्रसुती रजा मिळणे, हे राष्ट्रहिताच्यादृष्टीने महत्त्वाचे असल्याचे आंबेडकरांनी सांगितले होते. इतकेच नव्हे तर काळाराम मंदिराच्या लढय़ातही महिलांची एक संघटना लढा देत होती. तसेच वडिलांच्या आधी आईला उत्तराधिकारी करायचा क्रांतिकारी निर्णयाचे विशेष श्रेय आंबेडकरांनाच द्यावे लागेल, असे वक्तव्य प्रा. अनिल भाबड यांनी बुधवारी ठाण्यात केले. जोशी बेडेकर महाविद्यालयातील कात्यायन सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
घटना तयार करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती, मात्र तरीही डॉ. आंबेडकर हे खऱ्या अर्थाने घटनेचे एकमेव शिल्पकार होते. तसेच धर्मातराच्या वेळेस आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि राष्ट्रावरील प्रेम त्यांनी कायम ठेवले, असेही ते म्हणाले. तेव्हा अर्थशास्त्रातील नोबेल असता तर पहिला मान त्यांना मिळाला असता असे उद्गार अमर्त्य सेन यांनी काढल्याचेही त्यांनी सांगितले.
या संदर्भात कुळगाव-बदलापूर पालिकेच्या शहर अभियंता प्रवीण कदम यांच्याशी संपर्क साधला असता, फेब्रुवारी महिन्यात पुन्हा प्रस्ताव शासनाकडे दिला असल्याचे त्यांनी सांगितले.