बदलापूरच्या ऐतिहासिक बालमित्र गणेशोत्सव संघाचा आदर्श

सार्वजनिक गणेशोत्सव म्हटले की २४ तास चालणारे ध्वनिक्षेपक, रस्ता अडवणारा भला मोठा मंडप, वर्गणीसाठी होणारी जबरदस्ती, डॉल्बी डीजेचा धुमाकूळ आणि बीभत्स नाच आणि विसर्जनाचे बदलते स्वरूप असे चित्र आपल्यासमोर येते. ध्वनिक्षेपकाशिवाय तर सार्वजनिक गणेशोत्सव पूर्ण होऊच शकत नाही, अशीच काहीशी भावना आजच्या मंडळांची झालेली दिसते. मात्र गेल्या शंभर वर्षांपासून ध्वनिक्षेपकाशिवाय समाजाभिमुख कार्यक्रम घेत बदलापूरच्या बालमित्र गणेशोत्सव संघाने एक आगळावेगळा गणेशोत्सव साजरा करत मोठा आदर्श निर्माण केला आहे.

गेल्या काही वर्षांत सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप बदलत चालले आहे. लोकमान्य टिळकांनी ज्या उदात्त हेतूने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता, तो हेतू अनेक मंडळे पाहताना फोल ठरल्याची भावना निर्माण होते. मात्र टिळकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत १९१७ मध्ये सुरू झालेल्या बालमित्र गणेशोत्सव संघाने बदलापुरातच नव्हे तर महाराष्ट्रात आगळ्यावेगळ्या गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धतीने एक नवा आदर्श घातला आहे. आजचा सार्वजनिक गणेशोत्सव ध्वनिक्षेपकाशिवाय पूर्णच होत नाही. मात्र गेली शंभर वर्षे एकदाही बालमित्र गणेशोत्सव संघाने ध्वनिक्षेपक वा ध्वनिप्रदूषण होईल अशी उपकरणे वापरली नाहीत. सुरुवातीपासूनच अगदी साधेपणाने, संघाच्या सदस्यांकडून सजावट करून, छोटी मूर्ती आणि सदस्यांच्याच सहभागातून कार्यक्रम करून गणेशोत्सवाचा खर्च कमी करण्यात मंडळाने यश मिळवले आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षांत संघाने सजावटीसाठीचे मखर विकत घेतले आहे, असे सुधीर ओक सांगतात. त्यामुळे कोटय़वधींचा खर्च करून गणेशोत्सवासारख्या सणाचे बाजारू रूप समोर आणणाऱ्या मंडळांपुढे हा एक मोठा आदर्श आहे. संघाने सुरुवातीपासून समाजाचे प्रबोधन, विद्यार्थी विकास आणि त्यांना एक जबाबदार नागरिक बनवण्याच्या हेतूने कार्यक्रमांची आखणी आणि त्यांची अंमलबजावणी केली. आजही पाठांतर, वक्तृत्व, निबंध, चित्रकला, नाटय़ सादरीकरण अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच उपक्रमातून आज बदलापुरात श्रीराम केळकर, विघ्नेश जोशी, अविनाश जोशी, श्रुती गोखले यांसारखी व्यक्तिमत्त्वे उदयास आली आहेत. एकाच वेळी संस्कृती आणि धर्माशी जोडून ठेवत दुसरीकडे महाराष्ट्र विज्ञान परिषदेच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनाचे धडे दिले जातात, असे विकास ओक यांनी सांगितले.

गेल्या शंभर वर्षांत गणेशोत्सवाचे ठिकाण अनेकदा बदलले आहे. सध्या वसंत ओक यांच्या वाडय़ात गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. विसर्जनाची पद्धतही साधीच असून ताशाच्या वापर विसर्जनावेळी केला जातो. गुलालाशिवाय विसर्जन मिरवणूक निघते, तर हातात मूर्ती घेऊन साधेपणाने विसर्जन केले जाते. त्यामुळे गणेशोत्सवाचा कुणालाही त्रास न होता उत्सव आनंदाने साजरा होतो. त्यामुळे डॉल्बीशिवायही विसर्जन होऊ  शकते, हेही संघाने सिद्ध केले आहे.

सध्याच्या स्पर्धेच्या युगात गणेश मंडळांतील स्पर्धा ही टोकाची होऊन उत्सवाला बाजारू स्वरूप आले आहे. या परिस्थितीतही बालमित्र गणेशोत्सव संघाच्या माध्यमातून टिळकांच्या गणेशोत्सवाच्या हेतूला कोठेही धक्का न लावता शंभर वर्षे सातत्यपूर्ण उत्सव साजरा केल्याने संघाने एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.