करारातील सर्व नियम धाब्यावर बसवून ठाणे क्लबमधील ठेकेदाराने चालवलेल्या नफेखोरीविरोधात मनसेपासून सर्व विरोधी पक्ष सत्ताधारी शिवसेनेवर आगपाखड करत असताना स्वच्छ प्रतिमेचा आव आणणाऱ्या भाजपने मात्र, या मुद्दय़ावर सोयीस्कर मौन बाळगले आहे. राज्यातील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेवर टीका न करण्याची राजकीय अपरिहार्यता याचे एक कारण बोलले जात असले तरी ठाणे महापालिकेतील स्थायी समितीचे सभापतीपद मिळण्याच्या शक्यतेनेच भाजपने ‘ठाणे क्लब’बाबत अळीमिळी गुपचिळी धोरण अंगिकारल्याचे दिसत आहे.
 विधानसभा निवडणुकीनंतर ठाण्यातील तीन प्रभागांत झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने शिवसेनेविरोधात उमेदवार उभे करायचे नाहीत, असा निर्णय घेतला होता. महापालिकेत सत्ता स्थापन करताना या दोन्ही पक्षांत झालेल्या करारानुसार एक वर्ष स्थायी समिती सभापतीपद भाजपला देण्यात येईल, असे ठरले होते. मात्र, आघाडी आणि युतीमधील सत्तासंघर्षांत गेल्या वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या पदाची बक्षिसी देण्याशिवाय शिवसेनेपुढे दुसरा पर्याय उरला नाही. त्यामुळे भाजपच्या गोटात नाराजीचे सूर व्यक्त होत होते. मात्र, पोटनिवडणुकीत केलेल्या मदतीच्या मोबदल्यात यंदाचे स्थायी समिती सभापतीपद भाजपला देण्याचा शब्द पालकमंत्री एकनाथ िशदे यांनी स्थानिक नेत्यांना देऊ केला आहे. स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त झाल्याने उर्वरित सदस्यांची निवड करण्यासाठी मंगळवारी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदस्यांच्या निवडीनंतर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात स्थायी समिती सभापतीपदासाठी निवड होणार आहे.
महापालिकेतील पक्षीय संख्याबळ पहाता स्थायी समितीमध्ये भाजपचा अवघा एक सदस्य निवडून जाणार असला तरी पालकमंत्र्यांनी दिलेल्या शब्दानुसार स्थायी समितीचे सभापतीपद आपल्याला मिळणार या विचाराने पक्षातील स्थानिक नेत्यांना आतापासूनच गुदगुल्या होऊ लागल्या आहेत. आमदार संजय केळकर यांचे कट्टर समर्थक संजय वाघुले हे या पदासाठी प्रमुख दावेदार आहेत. अशा वेळी ‘ठाणे क्लब’च्या ठेकेदाराविरोधात भूमिका घेऊन शिवसेनेला दुखावणे जड जाईल, या विचाराने भाजपच्या नेत्यांनी मौन बाळगल्याची चर्चा आहे. या प्रश्नावर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेतली असताना भाजपचे नगरसेवक मात्र शांत बसून असल्याचे चित्र गेल्या आठवडय़ात झालेल्या सर्वसाधारण सभेत दिसले. स्थायी समिती सभापतीपदाचा हातातोंडाशी आलेला घास सुटू नये, यासाठी तर हे मौन नाही ना, असा सवालही उपस्थित होत आहे.

‘अवाजवी शुल्क अमान्य’
भाजपचे ठाण्यातील आमदार संजय केळकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘ठाणे क्लब’बाबत मौन बाळगल्याचा आरोप फेटाळला. ‘ठाणे क्लबच्या मुद्दय़ावर आमची भूमिका ठाणेकरांच्या हिताच्या बाजूने असून ती यापूर्वीच आयुक्तांना कळवली आहे. महापालिकेने बांधलेल्या तरणतलावाच्या सदस्य शुल्काचे दर वाढविले जात असतील तर ते आम्हाला मान्य नाही. ही वास्तू मुळात महापालिकेने चालवायला हवी, अशी भाजपची भूमिका आहे,’ असे ते म्हणाले.
जयेश सामंत, ठाणे</strong>