मनमानी पद्धतीने भाडे आकारणे, प्रवाशांशी अरेरावी करणे, मीटर पद्धतीचा अवलंब करणे अशा रिक्षाचालकांच्या कृत्यामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, अंबरनाथ, बदलापूर अशा सर्वच शहरांतील नागरिक मेटाकुटीला आले आहेत. रिक्षाचालकांची मनमानी खपवून न घेणाऱ्या प्रवाशांशी असभ्य वर्तन किंवा मारहाण झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र, आता कल्याणमध्ये रिक्षाचालकांच्या मनमानीविरोधात जनमत तयार करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. महाविद्यालयीन तरुणांचा प्रामुख्याने सहभाग असलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या एका गटाने रिक्षाचालकांविरोधात असहकार आंदोलन करण्याचा निर्धार केला असून याच अंतर्गत येत्या २८ फेब्रुवारी रोजी रिक्षाने प्रवास न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरीकरणामुळे कल्याण शहर फोफावत चालले असून शहराच्या वेशीजवळील भागात आता मोठमोठी गृहसंकुले उभी राहत आहेत. या गृहसंकुलांत राहणाऱ्या नागरिकांना रेल्वे स्थानक किंवा शहरातील मध्यवर्ती भागात येण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची साधने पुरेशी नाहीत. केडीएमटीच्या बसगाडय़ांच्या फेऱ्यांत सातत्य नसल्याने प्रवाशांना रिक्षावरच अवलंबून राहावे लागते. मात्र, याचाच गैरफायदा घेत रिक्षाचालकांकडून मनमानी सुरू असते. शहरात मीटरची सक्ती नसल्याने रिक्षाचालक तोंडाला येईल ते भाडे सांगतात, याला आक्षेप घेणाऱ्या प्रवाशांशी अरेरावी केली जाते, अशा तक्रारी सातत्याने नागरिकांतून येत असतात.
या पाश्र्वभूमीवर शहरातील काही मंडळींनी सोशल मीडिया व ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या माध्यमातून रिक्षाविरोधात एल्गार पुकारला आहे. कल्याणमधील प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांचे दाखले देणारे संदेश ‘व्हॉट्सअ‍ॅप’द्वारे शहरभर पसरत आहेत. या संदेशात येत्या २८ फेब्रुवारी रोजी रिक्षाचालकांविरोधात असहकार आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवाशांनी रिक्षाचा प्रवास त्या दिवशी पूर्णपणे टाळावा व रिक्षाचालकांना प्रवाशांची किंमत दाखवून द्यावी, असे आवाहन करण्यात येत असून त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आंदोलकांचे आवाहन
रिक्षाप्रवाशांनी एका दिवसासाठी सर्व रिक्षांवर बहिष्कार घालण्याची वेळ आता आली आहे. येत्या २८ फेब्रुवारीला सर्वानी केडीएमटीच्या बसने प्रवास करावा. त्या दिवशी नेहमीपेक्षा दहा मिनिटे आधी घरातून निघा. पण बसनेच प्रवास करा. भाडे वाढवण्याची मागणी करून रिक्षाचालक वेळोवेळी बंद/संप पुकारत असतात. आता त्यांना जनतेच्या असहकाराची ताकदही दाखवून दिली पाहिजे.

रिक्षाचालकांविरोधातील तक्रारी
* लांबची भाडी नाकारणे किंवा मनमानी भाडे मागणे.
* वाहतूक विभागाने दिलेला गणवेश व बिल्ला नसणे.
* शेअर रिक्षासाठी चौथ्या सीटची सक्ती केली जाते.
* इलेक्ट्रॉनिक मीटरचा वापर होत नाही.
* कल्याण दीपक हॉटेल ते चिकणघर हायवे या दोन किमीच्या अंतरावरील प्रवासासाठी प्रवाशांकडून प्रत्येकी १३ रुपये घेतले जातात. म्हणजे एका वेळी रिक्षाचालकाला ५२ रुपये मिळतात. परंतु, हेच अंतर मीटरने गेल्यास २८ रुपयापेक्षा अधिक भाडे होत नाही.
* गेल्या महिन्यात इंधनाचे दर कमी होऊनही रिक्षाचे भाडे कमी झालेले नाही.
* कल्याण स्थानक परिसरातील रिक्षा तळावर थांबतच नाहीत.

वरिष्ठांकडे तक्रारी झाल्या, की वाहतूक विभाग तेवढय़ापुरती रिक्षाचालकांवर कारवाई करते. त्याचे पुढे काही होत नाही. कारवाईचा संकेत अगोदरचा रिक्षाचालकांना मिळतो. त्यामुळे उद्दाम रिक्षाचालक अगोदरच गायब असतात. यामध्ये नियमितपणे सेवा देणारा रिक्षाचालक भरडला जातो.    
– दिगंबर कुलकर्णी, प्रवासी

रेल्वे स्थानकाजवळील वाहनतळाजवळ कायमस्वरूपी वाहतूक पोलीस उभे राहिले, तर रिक्षाचालक मनमानी करणार नाहीत. आरटीओने रिक्षाचालकांच्या कागदपत्रांची नियमितपणे तपासणी करावी, म्हणजे रिक्षाचालकांवर दबाव टाकता येईल.     – योगेश पानसरे, प्रवासी