हृदयाचा मार्ग हा पोटातून जातो, असं म्हटलं जातं. त्यामुळेच प्रसंग कोणताही असो, एखाद्या व्यक्तीला खूश करायचं असेल तर त्याच्या आवडीचा पदार्थ बनवला जातो. ‘व्हॅलेंटाइन डे’ हा तर हृदय जिंकण्याचाच दिवस! त्यामुळे आपल्या जोडीदाराचं मन जिंकायचं असेल तर त्याच्यासाठी काही तरी वेगळं आणि चविष्ट बनवायचा विचार प्रत्येकीच्याच मनात येत असतो. अशा वेळी नवीन आणि वेगळं काय बनवायचं, असा प्रश्न पडत असेल तर कोरम मॉलच्यावतीने आयोजित पाककला प्रशिक्षण शिबिराला नक्की भेट द्या. या शिबिरात हृदयाच्या आकाराचे वेगवेगळ्या चवींचे पॅटिस, मॉझेरिला चीज हार्ट्स, मिनी पाय, कॉटेज चीज सॉटे असे नावीन्यपूर्ण पदार्थ शिकवण्यात येणार आहेत. अर्थात ही कार्यशाळा ‘व्हॅलेंटाइन डे’च्या नंतर होणार असली तरी प्रेमाला कुठे अमुक एकच दिवस असतो? आपल्या जोडीदाराचं मन खूश होत असेल तर कोणताही दिवस ‘व्हॅलेंटाइन डे’च असतो, नाही का?
’ कधी- बुधवार, १७ फेब्रवारी, वेळ- दुपारी ३ ते रात्री ८.
’ कुठे- कॉरम मॉल, मंगल पांडे रोड, पूर्व द्रुतगती मार्गाजवळ, ठाणे (प.).

‘आम्ही दोघे आणि आमची आव्हाने’
ठाणे जिल्ह्य़ातील बेकायदा बांधकामे, अवैध रेती उपसा, भिवंडीतील बेकायदा गोदामे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय झालेल्या ठाण्याच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांचा दिनक्रम अतिशय व्यस्त असतो. त्यांचे पती उद्योजक आशुतोष पंडित हेही आपल्या कामांत व्यग्र असतात. अशा वेळी एकमेकांना वेळ देता येत नाही, कुटुंबाला वेळ देता येत नाही असे विचार मनात येत असतात. तर सार्वजनिक जीवनातल्या जबाबदाऱ्या, वैयक्तिक कामे यांचे आव्हान असतेच. अशा वेळी हे दोघे एकमेकांना कसे समजून घेतात, कुटुंबाची घडी कशी व्यवस्थित ठेवतात, हे जाणून घेण्याची संधी डोंबिवलीकरांना सुभेदार वाडा कट्टाने मिळवून दिली आहे. ‘आम्ही दोघे आणि आमची आव्हाने’ या विषयावर अश्विनी जोशी आणि आशुतोष पंडित यांचे व्याख्यान होणार आहे.
’ कधी- शनिवार, १३ फेब्रुवारी, वेळ- सायंकाळी ६ वाजता.
’ कुठे- सुभेदारवाडा हायस्कूल, गांधी चौक, कल्याण (प.).

खावा, कोकण आपलाच असा!
फणसाची भाजी, घावन घाटलं, काळ्या वाटाण्याची उसळ, डाळिंबी उसळ, फुरका मारून खाण्यात येणारी आमटी, कढी असे भोजनातील अनेक पदार्थ आता फक्त ऐकण्यापुरते राहिले आहेत. नोकरी, व्यवसायानिमित्त कोकणातून मुंबईत वास्तव्यास आलेल्या चाकरमान्यांच्या जिभेवरून गावाकडच्या अस्सल कोकणी भोजनाची चव कधीच जात नाही. पण सध्याच्या धावपळीच्या आणि झटपट स्वयंपाकाच्या दिवसांत साग्रसंगीत कोकणी थाळी चाखायला मिळणं, जरा कठीणच झालं आहे. हा सगळा विचार करून डोंबिवलीतील श्रीयोग डायनिंग हॉलतर्फे ११ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी या कालावधीत कोकण महोत्सवाचे आयोजन केले आहे. डोंबिवली पूर्व भागातील रामनगरमधील बोडस सभागृहाजवळील श्रीयोग डायनिंग हॉलमध्ये दुपारी १२ ते दुपारी अडीच, रात्री ८ ते साडेदहा वाजेपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा महोत्सव आयोजित केला जातो.
’ कधी- ११ ते २१ फेब्रुवारी, वेळ- दुपारी १२ ते रात्री ८.
’ कुठे- श्रीयोग डायनिंग हॉल, बोडस सभागृहाजवळ, डोंबिवली (पू.).

पाश्चिमात्य नृत्यकलेचा आविष्कार
ठाणे फेस्टिव्हल हा केवळ पारंपरिक कलेचा आविष्कार नसुन यंदा येथे पाश्चिमात्य नृत्य प्रकार, संगीत, व्यायाम यांसारख्या अनेक कलांची आगळीवेगळी पर्वणी ठाणेकरांसाठी आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवार, १२ फेब्रुवारी रोजी सायं ५ ते ६ या वेळेत बिटबॉक्सिंग बॅटल हा पाश्चिमात्य कला प्रकार सादर होणार आहे. रात्री ८ ते १० या वेळेत स्ट्रीट डान्स स्पर्धा आणि सुप्रसिद्ध कवयित्री रेश्मा कारखानीस यांचा ‘मी शून्य’ हा कवितांचा कार्यक्रम या वेळी येणार आहेत. यामध्ये हिप हॉप, बी बॉइंग, सालसा यांसारख्या विविध पाश्चिमात्य नृत्य कला सादर होणार आहेत. शनिवार, १३ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता ‘इनग्मॅटिक मिस्ट’ हा बॅण्ड पारंपरिक संगीत व पाश्चिमात्य संगीताची पर्वणी तसेच सायंकाळी ७ वाजता ‘मेलोडी फ्रन्ट’ हा बॅण्ड त्यांचे विविध कलाविष्कार या वेळी येथे सादर करणार आहेत. अ‍ॅरोबिक, झुम्बा, कराटे, योगा यांसारख्या व्यायामांची जनजागृती करण्यासाठी १२ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत सकाळी ६ ते १० या वेळेत ‘फिटनेस स्ट्रीट’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच या महोत्सावामध्ये सेल्फीप्रेमींसाठी काही विण्टेज कारचे प्रदर्शन मांडण्यात आले असून आपली सेल्फी काढण्याची हौस येथे पूर्ण करू शकता.
’ कधी- १२ ते १४ फेब्रुवारी.
’ कुठे- ९० फिट रोड, पारसिक नगर, कळवा.

लावणीचा शास्त्रशुद्ध प्रयोग
ठुमरी, टप्पा, दादरा यांच्या अभ्यासपूर्ण रचनेतून लावणीचा जन्म झाला. पूर्वी बैठकीची असलेली लावणी कथ्थक नृत्याचा आधार घेऊन नृत्यरूपात अवतरली. रसिकांमध्ये लावणी हा नृत्यप्रकार लोकप्रिय ठरला. अनेक रसिकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या लावणी या लोककलेलाही शास्त्राची आणि कथ्थक नृत्याची जोड आहे. या शास्त्रशुद्ध लावणीचा प्रयोग लावणी चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. मुक्ता जोशी यांच्या नृत्यधारा संस्थेच्या ज्येष्ठ विद्यार्थिनींतर्फे साक्षी प्रॉडक्शन निर्मित कथ्थक नृत्य तसेच नर्तनरंग आणि कथा लावणीची अदा कथ्थकची लावणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कथ्थक नृत्य आणि लावणी याचे एकत्रित सादरीकरण रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.
’ कधी- शनिवार, २० फेब्रुवारी, वेळ- रात्री ८.३० वाजता.
’ कुठे- आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण (प.).

‘प्रवाही प्रेम’ चित्र, कलांचे प्रदर्शन
‘आर्ट निर्वाण’तर्फे प्रेमाचे विविध आविष्कार पाहण्याची सुसंधी रसिकांना मिळणार आहे. प्रवाही प्रेम (फ्लूड लव्ह) द्वारे विविध कलाकारांच्या कुंचल्यातून साकारलेली देव देवतांची रूपे पाहायला मिळणार आहेत. यामध्ये चित्रकार अलिसन पिंटो, अमित जळवी, अशोक राठोड, बाबूभाई मिस्त्री, मीना राघवन, सुधा मोहन, दीपक विनोद, प्रकाश गुप्ता, गौरी मुरली, ईशानी पिंपळखरे, ज्योती शर्मा, लेस्ली पिंटो, ममता व्होरा, परुल मेहता, सलोनी पारिख, सुरेश कोंढाळकर, डॉ. वैशाली दास यांच्या चित्रांचा समावेश आहे.
’ कधी : १३ ते १९ फेब्रुवारी
’ कुठे : आर्ट गेट गॅलरी, छेडा सदन, चर्चगेट

‘जर्नी ऑफ संतूर’मध्ये शास्त्रीय संगीत-जॅझचा मिलाफ
मुंबईतील संगीत दर्दी रसिकांना एक अनोखी अशी मेजवानी अनुभवण्याची संधी मिळणार आहे. ‘जर्नी ऑफ संतूर’ या कार्यक्रमात ऊर्जाभारे संगीत रंग भरणार असून भारतीय शास्त्रीय संगीत ते नवीन दमाच्या जॅझची ही संकल्पना युवा संतूर कलाकार राहुल शर्मा यांनी राबविली आहे. मुकुंदराज देव (तबला), अविनाश चंद्रचूड (की-बोर्ड), विनायक पॉल (ड्रम), अमित पुजार (गिटार) आणि आय.डी. राव (सॅक्साफोन) हे कलाकार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
‘जर्नी ऑफ संतूर’ला बनियान ट्रीचे पाठबळ असून या आयोजनातून उभ्या राहणाऱ्या निधीतील काही भाग ‘स्वागत आश्रम चॅरिटेबल ट्रस्ट’ला जाणार आहे.
‘बॉम्बे म्युझिक सर्कल’ ही प्रतिष्ठित आणि लोकप्रिय अशी भारतीय संगीत परिषद असून तिची स्थापना हंसराज शर्मा यांनी १९७०च्या दशकात केली. त्यांचे संगीताप्रति असलेले प्रेम आणि समर्पण यातून हा उपक्रम आकाराला येत गेला आणि आज तो यशस्वी मानला जातो. या क्षेत्रात आणि संगीतप्रेमींमध्ये तो बहुप्रतीक्षित म्हणूनही गणला जातो. हे आयोजन ‘बॉम्बे म्युझिक सर्कल’शी अगदी सुरुवातीपासून जोडल्या गेलेल्या द्रष्टय़ा नायकांना तसेच सर्व संगीतप्रेमींना समर्पित आहे. गतवर्षी २४ जानेवारी २०१५ रोजी तब्बल ३२ वर्षांनंतर ‘बॉम्बे म्युझिक सर्कल’ने संस्था पुनर्जीवित केली. नेहरू सेंटर येथे पंडित शिवकुमार शर्मा यांच्या कार्यक्रमाच्या आयोजनातून हे पुनर्जीवन केले गेले. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि भरगच्च गर्दी झाली होती. शर्मा यांना या कार्यक्रमात रसिकांनी उभे राहून अभिवादन केले, असे बॉम्बे म्युजिक सर्कलचे प्रवर्तक विशाल शर्मा यांनी नमूद केले.
‘जर्नी ऑफ संतूर’मध्ये संतूरचा एक वाद्य म्हणून जम्मू-काश्मीरपासून नागरी भागात आणि त्यानंतर जागतिक पातळीवर झालेला प्रवास अधोरेखित होणार आहे. हे सादरीकरण अगदी वेगळे आणि अभूतपूर्व असणार आहे, असे त्यांनी सांगितले.
राहुल शर्मा यांनी भारतीय शास्त्रीय संगीत आणि फ्युजन वर्ल्ड म्युझिक क्षेत्रात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. गेल्या १५ वर्षांमध्ये त्यांनी तब्बल ६० आल्बम प्रकाशित केले आहेत. या युवा कलाकाराने संगीत क्षेत्रामध्ये अनेक प्रयोग केले आहेत. त्यांनी १०० तारी संतूर वेगवेगळ्या प्रकारांमध्ये म्हणजे शास्त्रीय संगीत ते नवीन जमान्याची फ्युजन/इलेक्ट्रॉनिया अशा प्रकारांमध्ये सादर केली आहे.
या कार्यक्रमाच्या प्रवेशिका नेहरू सेंटर येथे कार्यक्रमाच्या दिवशी उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क- २४९६४६८०
’ कधी : १२ फेब्रुवारी २०१६, सायं. ७ वा.
’ कुठे : नेहरू सेंटर, वरळी

भारतीय संगीताचा ‘गेट वे’
गेट वे ऑफ इंडिया हे मुंबईला भेट देणाऱ्या सर्वासाठीच आवडते ठिकाण आहे. आपल्या देशाच्या इतिहासाचे ते एक प्रतीक आहे. अशा या ठिकाणी बेगम परवीन सुलताना यांच्या शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला टाटा कॅपिटल आणि श्रीनुज यांचे साहाय्य लाभले आहे. मुंबईसारख्या शहरामधील नोकरदार वर्ग व्यस्त असल्याने त्यांना संगीताचा आनंद घेता येत नाही. तो सतत तणावात, धकाधकीचे आयुष्य जगत असतो. यातून काही प्रमाणात का होईना मनाला शांती देण्याचे कार्य संगीत करते. मागील २००२ सालापासून यावर उपाय म्हणून किशोरी आमोणकर, पंडित जसराज, पंडित हरिप्रसाद चौरासिया, शिवकुमार शर्मा यांच्यासह इतर अनेक नामवंत गायकांच्या मैफल भरविण्याचे काम केले जाते. असाच कार्यक्रम ‘मेक इन इंडिया’च्या पाश्र्वभूमीवर घेण्यात येत असून बेगम परवीन सुल्ताना या गायन करणार आहेत. पंचम निषाद क्रिएटीव्ह प्रा. लि.कडून याचे आयोजन करण्यात आले आहे. मोफत प्रवेशिका रिदम हाऊस, महाराष्ट्र वॉच कंपनी, दादर (पू) येथे उपलब्ध आहेत.
’ कधी : १४ फेब्रुवारी, सकाळी ६.३० वाजता.
’ कुठे : गेट वे ऑफ इंडिया

सनईच्या सूरांची स्वरांशी जुगलबंदी
लग्नाच्या मंडपात शहनाई किंवा सनईचे सूर आपण नेहमीच ऐकतो. पण याच शहनाई वादन आजकाल कमी झालेले जाणवत असतानाच ज्येष्ठ सनई वादक पंडित शैलेश भागवत आणि आग्रा घराण्याचे ख्यातनाम गायक पंडित जी. जी. जोशी यांच्या जुगलबंदीचा कार्यक्रम रविवार, १४ फेब्रुवारी रोजी सहयोग मंदिर येथे होणार आहे. संगीतप्रेमी मंडळ कळवा, ठाणे यांच्या वतीने एम. एन. दातीर यांच्या आठवणी स्मरणार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामुळे सनई आणि शास्त्रीय संगीताची जुगलबंदी ऐकण्याची दुर्मीळ संधी ठाणेकरांना मिळणार आहे. या वेळी पंडित कालिनाथ मिश्रा तबल्याची आणि प्रकाश चिटणीस संवादिनीची साथ देणार आहेत.
’ कधी- रविवार, १४ फेब्रुवारी, सायंकाळी ६ वाजता.
’ कुठे- दुसरा मजला, सहयोग मंदिर, नौपाडा, ठाणे (प.).

शास्त्रीय गायनाची मैफल
सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक समीर अभ्यंकर यांच्या सुमधुर आवाजाची पर्वणी डोंबिवलीकरांना लागोपाठ दोन दिवस अनुभवता येणार आहे. सदाशिव अ‍ॅकॅडमी ऑफ म्युझिकतर्फे त्यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या वेळी विनायक नाईक त्यांना तबल्यावर तर मकरंद कुंडले संवादिनीवर साथ करतील.
’ कधी- १३ व १४ फेब्रुवारी, वेळ- सायंकाळी ७ वाजता.
’ कुठे- पेंढारकर सभागृह, टिळकनगर शाळा, डोंबिवली (पूर्व).