वैज्ञानिक प्रयोग, सामाजिक कार्य आणि पुरस्कारांची प्रदर्शनी

विद्या प्रसारक मंडळाच्या बा. ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालयात एका आगळ्यावेगळ्या भव्य प्रदर्शनाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. राष्ट्रीय मूल्यांकन समिती (नॅक) भेटीच्या वेळी संस्थेच्या थोरले बाजीराव पेशवे या प्रशस्त सभागृहामध्ये महाविद्यालयातील पदवी विद्यार्थ्यांनी विविध दालनांमधून आपल्या वैज्ञानिक प्रज्ञेचा व कौशल्याचा आणि गेल्या पाच वर्षांत केलेल्या शैक्षणिक सामाजिक जनजागृतीचा लेखाजोखा पाहुण्यांसमोर सादर केला.
यामध्ये विविध विज्ञानशाखेतून वेगवेगळ्या विषयांवरील प्रकल्प सादर करण्यात आले. ज्यामध्ये भौतिकशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी वीज चमकताना व पडताना नेमके काय होते याचा टेबलवरील घडणारा छोटेखानी प्रयोग, तसेच प्रकाशाच्या प्रभेतून एखादी खरी वाटण्याइतपत आभासी प्रतिभा उभी केली. तसेच सर्वच सावल्या कृष्ण असतात हे सत्य विविध रंगीबेरंगी सावल्यांतून सर्वासमोर आणले. रसायनशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी रंगविरहित द्रावणातून फक्त ढवळल्यास रंगीबेरंगी दिसणारा परिणाम सादर केला. प्राणीशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी प्राचीन काळापासून चालणाऱ्या मासेमारीच्या पद्धतींचे व त्यावेळच्या जहाजांचे प्रत्यक्ष मॉडेल उभे केले आणि उपस्थितांना बुचकळ्यात पाडले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजनेचेही येथे एक दालन होते. या दालनामध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या समाजोपयोगी कामांचा आढावा घेण्यात आला. त्यात महारक्तदान शिबीर, जागतिक एड्स दिन, युवा दिन, एनर्जी ऑडिट, वृक्षारोपण, ग्राहक चळवळ, सायबर गुन्हे संदर्भातील जनजागृती इ. प्रकल्पांतील कृतीचित्रे व मिळालेले पुरस्कार इत्यादींची मांडणी करण्यात आली होती.
आजीवन व निरंतन शिक्षण विभागाच्या विविध योजनेतून म्हणजे टाकाऊतून टिकाऊ, कमवा व शिका, अंतर्गत पॉट मेकिंग, चॉकलेट मेकिंग, विविध कुटीरोद्योग व लघुउद्योग यातून विद्यार्थ्यांना शिकता शिकता कमविण्याची संधी उपलब्ध कशी करून देता येते, याचे प्रत्यक्ष दर्शन घडविले. त्याचप्रमाणे वनस्पतीशास्त्र विभागाने चिमण्यांचा व तत्सम पक्ष्यांचा सांभाळ कसा करावा याचे सोदाहरण प्रात्यक्षिक दाखविले व टाकाऊतून टिकाऊचा नवीन संदर्भ लोकांना दाखवून दिला. यावेळी ‘जागर जाणिवांचा अभियान’दालन सगळ्यांचे लक्ष वेधत होते. महाविद्यालयातील सर्जनशीलपणे काम करणारी समिती यामध्ये विविध सामाजिक प्रश्न, स्त्री चळवळ, स्त्री भ्रूणहत्या, हुंडा, अन्याय अत्याचार इ. ज्वलंत विषयावरील जनजागरण मोहिमांची छायाचित्रे व तीन वर्षांच्या कामाचा कोलाज एकत्रपणे सादर केला. यामध्ये विविध सामाजिक प्रश्न व त्यावरील उपायांचा ऊहापोह करणारा चित्रमय प्रवास दाखविण्यात आला होता. निरनिराळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळालेली पारितोषिके पुरस्कार व महाराष्ट्र शासनाचा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार ठेवण्यात आला होता. राष्ट्रीय छात्र सेना विभागानेही आपले जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील शिबिरातील नैपुण्य येथे दाखविले. तसेच महाविद्यालयातील परिसरातील रोमांचकारी कारनामे यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केले. या सर्वच प्रदर्शन व सादरीकरणाची संकल्पना महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. माधुरी पेजावर यांची होती. उपप्राचार्य, संख्याशास्त्र, तंत्रज्ञान विभाग इतर ज्ञानशाखांचे प्राध्यापक व समन्वयकांनी हे प्रदर्शन यशस्वी केले.
संकलन- श्रीकांत सावंत, शलाका सरफरे

गाव कुपोषणमुक्त करण्यासाठी खर्डी महाविद्यालयाचे प्रयत्न
‘एनएसएस’चा अनोखा उपक्रम
ठाणे : जीवनदीप संस्थेच्या खर्डी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या वतीने ‘कुपोषणमुक्त अभियान’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे ‘कसारा’ येथे सकस आहार वाटप कार्यक्रमाद्वारे उद्घाटन करण्यात आले. खर्डी परिसर हा विशेषत: ग्रामीण भागात मोडत असल्याने येथे वस्त्या, पाडय़ांची संख्या अधिक आहे. त्यामधील दुर्गम भागांमध्ये कुपोषित बालकांची संख्याही वाढत आहे. रा.से.यो.च्या गटाने अशी एकूण वीस कुपोषित बालके दत्तक घेतली. त्यांच्या कुपोषणमुक्तीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व अंगणवाडी सेविका यांच्या साहाय्याने पुढील वाटचाल सुरू आहे. सध्या आपल्या देशात कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे.म्हणून या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन केले गेले आहे, असे संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांनी यावेळी सांगितले. या अभियानासाठी प्रमुख अतिथी म्हणून शहापूर परिसरातील उद्योजक मनोज विशे हे उपस्थित होते. त्यांनी यावेली रा.से.यो.च्या सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले व येथील सर्व मातांना कुपोषणमुक्तीसाठी प्रयत्न करा, असे अवाहनही केले. यावेळी सरपंच सुभाष मोडक , प्रा.पी.डी.पाटील, अंगणवाडी सेविका व मदतनीस, प्राध्यापक वर्ग व स्वंयसेवक उपस्थित होते. येथील सर्व कुपोषित बालकांना सकस आहार मिळवून देण्यासाठी येथील सर्व नागरिक प्रयत्नशील राहतील, अशी शपथ घेण्यात आली. काही महिन्यांमध्ये हे गाव कुपोषणमुक्त व्हावे अशी आशा सर्व कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली.
ग्रंथोत्सव २०१५ – नाते जोडू या पुस्तकांशी

ठाणे : डॉ. व्ही .एन. बेडेकर व्यवस्थापन अभ्यास संस्थेतर्फे ग्रंथांचे महत्त्व आणि वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने येथील पाणिनी सभागृहात दोनदिवसीय ‘ग्रंथोत्सव’ २०१५ चे आयोजन करण्यात आले होते. डॉ. व्ही एन ब्रीम्सचे ग्रंथपाल संजय सपकाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि डॉ.नितीन जोशी यांनी या कार्यक्रमाबद्दल आपले मनोगत व्यक्त करून प्रमुख पाहुण्यांचे व सर्व उपस्थितांचे स्वागत केले. या प्रदर्शनाचे उद्घाटन जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शकुंतला सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. ‘ग्रंथालय हा प्रत्येक महाविद्यालयाचा आत्मा असतो आणि ग्रंथ-पुस्तक वाचणे हा प्रत्येक विद्यार्थी आणि शिक्षकांचा धर्म असला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. उद्घाटनपर भाषणात ग्रंथ आणि ग्रंथालयाचे महत्त्व विशद करताना त्या बोलत होत्या. तसेच विद्यार्थ्यांनी पुस्तकाची रोज किमान दोन तरी पाने वाचली पाहिजेत असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. या प्रदर्शनामध्ये इंग्रजी, मराठी भाषेतील व्यवस्थापन अभ्यासक्रमाशी संबंधित विपणन व्यवस्थापन, प्रचालन व्यवस्थापन, वित्त व्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापन, संघटन व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापन, ज्ञान व्यवस्थापन, व्यक्तिमत्त्व विकास व मार्गदर्शन इत्यादी विषयांची तसेच व्यवस्थापन क्षेत्रात आवश्यक असणाऱ्या व विषयाला पूरक अशा विविध विषयांच्या पुस्तकांचा समावेश होता. यामध्ये पीअर्सन एज्युकेशन, पीएचआय लर्निग, एमसी ग्रॉ हिल इंडिया, एस. चांद, विले इंडिया, जैको, विकास, एएमएसीओएम, सीनॅज लर्निग, एचबीआर प्रेम, हार्पर कॉलिन्स, ऑक्सफोर्ड आदी प्रसिद्ध प्रकाशकांच्या पुस्तकांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांनी पुस्तकांच्या सान्निध्यात रमावे नवी कोरी पुस्तके त्यांना हाताळायला मिळावीत आणि वाचनाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी व त्या अनुषंगाने संस्थेतील शैक्षणिक वातावरण निर्मितीस साथ मिळावी, विद्यार्थी तसेच सर्वच वाचकांना मान्यवर, प्रसिद्ध अशा विविध लेखकांच्या नवनवीन कलाकृतींची माहिती मिळावी या उद्देशाने आयोजित केलेल्या या प्रदर्शनाला ज्ञानद्वीप महाविद्यालय संकुलातील अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी भेट दिली व कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.