रस्ते, पदपथ अडवून तसेच ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून उत्सवांचे मंडप उभारणाऱ्या मंडळांना मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने चाप बसल्याची चर्चा असतानाच ठाणे महापालिकेने मात्र, न्यायालयाच्या आदेशांना रीतसर बगल दिली आहे. ठाण्यातील गणेशोत्सव मंडळांना रस्त्याच्या रुंदीच्या एक चतुर्थाश आकाराच्या जागेत मंडप उभारण्याची परवानगी देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशांच्या पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिकेने उत्सवांना परवानगी देणाऱ्या सर्व नियमांचा नव्याने आढावा घेतला आहे. तसेच मंडप आणि स्टेज उभारणीसंदर्भात नवीन नियमही लागू करण्यात आले आहेत. मात्र, हे नियम आखताना रस्त्यांवर उत्सवांची आरास मांडणाऱ्या मंडळांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारीदेखील पालिकेने घेतली आहे. मागील वर्षी ज्या मंडळांना मंडप तसेच स्टेज उभारणीस मंजुरी दिली होती, त्या मंडळांना पुन्हा त्याच ठिकाणी अशी परवानगी दिली जाईल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. ही परवानगी देताना मंडपाचा आकार एकूण रस्त्याच्या एकचतुर्थाशपेक्षा कमी असावा, अशी अट घालण्यात आली आहे. मात्र, या अटीचा फायदा आणि अंमलबजावणी कितपत होईल, याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान, रस्त्याच्या कडेला मंडप टाकण्यास परवानगी दिली असली तरी यंदा वाहकतुकीस अडथळा होणार नाही, असा दावा महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने केला. २५ फुट रुंद रस्त्यावर जेमतेम ६ फुट रुंदीचा मंडप टाकता येणार आहे. त्यामुळे १८ फुटांचा रस्ता वाहतुकीस मोकळा असणार आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

टीएमटी बससाठी स्वतंत्र मार्गिका
रस्त्यांवर उत्सवांचे मंडप उभारल्याचा मोठा फटका ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या(टीएमटी) बससेवेला बसतो. अनेकदा एकाच ठिकाणी तासभर बस अडकून पडतात. ही कोंडी टाळण्यासाठी टीएमटीचे बसमार्ग असलेल्या रस्त्यांवर १२ फुट रुंदीची मार्गिका मोकळी सोडावी, असा नियम पालिकेने आखून दिला आहे. मात्र, रहदारीच्या रस्त्यावर बस आणि रिक्षांची मोठी गर्दी असते. त्यामुळे २५ ते ५० फुट रुंद रस्त्यावरही १२ फुट रुंद मार्गिका मोकळी ठेवून वाहतूक कोंडी टाळता येईल का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.