रस्त्यावर, इमारतीच्या आवारात फटाक्यांवर बंदी

वेळी-अवेळी सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडून सर्वसामान्य नागरिकांचा रसभंग करणाऱ्यांना आवर घालण्यासाठी ठाणे पोलिसांनी एका अधिसूचनेद्वारे आचारसंहिता जारी केली आहे. त्याअन्वये रस्त्यावर, इमारतीच्या आवारात अथवा इमारतीपासून ५० फुटांच्या आत फटाके फोडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच रात्री दहा ते सकाळी ६ दरम्यान मोठे आवाज करणारे फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच धोकादायक ठरणारे काही फटाके बाद ठरवून त्यांच्या विक्रीवर बंदी आणली आहे.

वाढते ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पोलीस विभागाने यंदा सार्वजनिक ठिकाणी डॉल्बी वाजविण्यास मनाई केली. गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवातही सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या आवाजाच्या पातळीवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. तेच धोरण दिवाळीतही कायम राहणार असून १४ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरदरम्यान फटक्यांसंदर्भात विशेष आचारसंहिता प्रसिद्ध केली आहे. अधिसूचनेनुसार फटाक्यांच्या आवरणावर कोणत्याही धर्माची,  देवदेवतांची छायाचित्रे छापण्यात मनाई करण्यात आली आहे. अशा फटाक्यांची विक्री करू नये. ते फटाके जवळील पोलीस ठाण्यात जमा करावेत, असे आवाहन दुकानदारांना करण्यात आले आहे. रस्त्यावर अनधिकृतपणे धोकादायकरीत्या फटाक्यांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाने दिला आहे.

या फटाक्यांवर बंदी

तडतडी (यात क्लोरेट व पिवळा फॉस्फरस यांचे मिश्रण असते.),उखडीबार, हवाई, डे आऊट, नाईट आऊट, रॉकेट, अ‍ॅटमबॉम्ब (सुतळी बॉम्ब), आपटी बार, कॉर्क ओमेस्पेस