मुसळधार पावसामुळे बोईसर येथे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या १९ वर्षीय रबीउल्लाह या तरुणाचा मृतदेह बुधवारी आढळून आला. पाण्यात पडलेल्या बहिणीला वाचविण्याच्या प्रयत्नात तो वाहून गेला होता. त्याच्या या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

मंगळवारी पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला. बोईसर येथे राहणारी रिहाना शाह ही रात्री कामावरून बोईसर रेल्वे स्थानकात आली. पाऊस कोसळत असल्याने तिला घेण्यासाठी तिचा लहान भाऊ  रबीउल्लाह शाह (१९) हा स्थानकात गेला. त्यांच्या घरी जाण्यासाठी दांडीपाडा येथील नाल्यावरून जावे लागते. एक महिन्यापूर्वीच ग्रामपंचायतीने या नाल्यावरील या पुलाची डागडुजी केली होती. मात्र पुलाला संरक्षक कठडे बांधले नव्हते. पाऊस कोसळत असल्याने पूलावरून पाणी ओसंडून वाहत होते. पुलावरून पाणी वाहत असले तरी लोक मानवी साखळी बनवून जात होते. त्यावेळी रेहान यांचे दोन काका मकबूल शाह आणि इस्माईल शाह यांनीही मानवी साखळी करत पूल पार करण्याचा निर्णय घेतला. मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे ते तिघे पाण्यात पडले. बहिणीला पाण्यात पडताना पाहून रबीउल्लाहने पाण्यात उडी घेतली. त्याने रेहानाला धरून ठेवले आणि स्वत: पाण्यात गटांगळ्या खाऊ  लागला.

रेहाना आणि तिचे दोन्ही काका पाण्यातून बाहेर आले, मात्र रबीउल्लाह पाण्यात वाहून गेला. बुधवारी संध्यकाळी त्याचा मृतदेह सापडला.पालकमंत्री विष्णू सावरा यांनी  गुरुवारी रबीउल्लाच्या कुटुंबीयांची भेट घेऊना शासनाच्या वतीने चार लाख रुपयांची आर्थिक मदत दिली.