रसिक श्रोत्यांचे प्रेम हीच कलावंताची जगण्याची एक ऊर्जा असते. गेली ५० वर्षे मी जे काम केले ते रसिकांच्या आजही स्मरणात आहे, त्यांचे हे प्रेमच मला जगण्याची एक नवी प्रेरणा देते. डोंबिवलीतील दर्दी रसिक श्रोत्यांसमोर मी काम केले असून येथे काम करण्यास मला नेहमीच आवडते, असे उद्गार नाटय़ संमेलनाध्यक्ष व प्रसिद्ध अभिनेत्री फैयाज यांनी येथे नाटय़ महोत्सवात काढले.
भारतीय संगीत नाटय़ाने १२५ वर्षे रसिकांच्या मनावर मोहिनी घातली, मात्र कालानुसार संगीत नाटके मागे पडत गेली आणि त्यांची जागा गद्य नाटकांनी घेतली. आजच्या पिढीशी या संगीतमय नाटकाची नाळ पुन्हा जुळावी यासाठी अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद डोंबिवली शाखेच्या वतीने येथील सावित्रीबाई फुले नाटय़गृहात तीनदिवसीय संगीत नाटय़ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. संगीत स्वयंवर या नाटकाने महोत्सवाचा शुभारंभ शनिवारी झाला. रविवारी संगीत सौभद्र, तर सोमवारी गीत गाती ज्ञानेश्वर हे नाटय़प्रयोग सादर करण्यात आले.
नाटय़महोत्सवाच्या पहिल्या दिवशी नाटय़संमेलनाध्यक्ष व प्रसिद्ध अभिनेत्री फैयाज यांचा अखिल भारतीय नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच संगीत नाटकातील अभिनेत्री रजनी जोशी व अभिनेते अरविंद पिळगांवकर, ज्येष्ठ नेपथ्यकार, प्रकाश योजनाकार सुधीर ठाकूर या दिग्गजांचा सन्मान करण्यात आला. प्रमोद पवार यांनी काढलेली फैयाज, मोहन जोशी यांची चित्रे या वेळी त्यांना भेट देण्यात आली. मोहन जोशी यांच्या पत्नी ज्योती जोशी या वेळी उपस्थित होत्या.
मोहन जोशी यांनी नावीन्यपूर्ण कार्यक्रमाला मध्यवर्ती शाखेचा कायम पाठिंबा राहील, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. संस्थेचे कार्यवाह निशिकांत रानडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डोंबिवली शाखेचे अध्यक्ष दिलीप गुजर यांनी शाखेची पुढील उद्दिष्टे स्पष्ट करताना सांगितले, ठाणे जिल्ह्य़ात आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा घेण्याचा मानस असून, डोंबिवली शहरात अभिनय अकादमी सुरू करण्याचा विचार आहे.

डोंबिवलीला स्वत:ची अशी एक वेगळी ओळख आहे, मराठीपणाचा चेहरा या शहराने आजही जपला आहे. त्यामुळे या शहराला सर्व जण छोटे पुणे म्हणतात. नाटय़ संगीतासोबतच आजच्या नव्या पिढीला या क्षेत्रात आणण्यासाठी त्यांनी बसविलेल्या नाटकांचे सादरीकरण होणे आवश्यक आहे. तसेच बालनाटय़ाचे प्रयोग, महोत्सव येथे भरले गेले पाहिजेत. जेणेकरून लहानपणापासूनच त्यांच्यावर नाटय़ाचे संस्कार होतील. -फैयाज