उल्हासनगरातील घटनेला एक आठवडा पूर्ण

चकली चोरल्याच्या आरोपातून दोन लहानग्यांच्या डोक्यावरील केस कापत, गळ्यात चपलांचा हार घालत विवस्त्र धिंड काढण्याची घटना उल्हासनगरात उघडकीस आली होती. या घटनेला आता आठवडा उलटेल, मात्र त्या मुलांच्या मनातील दहशत कायम आहे. सध्या पोलीस बंदोबस्तात त्यांना खेळण्यासाठी बाहेर पडावे लागते आहे. या घटनेमुळे या कुटुंबाच्या सुरळीत आयुष्यालाच धक्का बसला आहे.

मागील आठवडय़ात उल्हासनगर शहरातल्या एका घटनेने संपूर्ण देश हादरला होता. चकली चोरल्याच्या आरोपातून मोहम्मद पठाण या दुकानमालकाने दोन लहानग्यांना विवस्त्र करून केस कापत त्यांची परिसरात धिंड काढली होती. या वेळी पठाण याच्या इरफान आणि सलीम या दोन मुलांनी या घटनेचे चित्रीकरण मोबाइलमध्ये करीत ते समाजमाध्यमांवर पसरवले होते. या घटनेला पाच दिवस उलटल्यानंतरही या दोन्ही मुलांच्या मनात त्या घटनेची भीती कायम आहे. आजही दोन्ही मुले घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. बुधवारी पोलीस बंदोबस्तात या मुलांना खेळण्यासाठी घराबाहेर काढण्यात आले. मात्र अवघ्या काही मिनिटांत मुलांनी पुन्हा घरचा रस्ता धरला. पतीपासून विभक्त राहत असलेल्या आठ वर्षीय मुलाच्या आईने या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. ही अमानुष पद्धत असून बालविश्वात एकच खळबळ झाली असल्याचे त्या सांगतात. घरकाम करून आपल्या तीन मुलांना शिकवणारी ती आई मुलांच्या मनातील भीती काढण्यासाठी दिवसभर त्यांच्या सहवासात राहते आहे. मात्र त्याच वेळी  दररोजचा रोजगार बुडत आहे. आम्ही एकटय़ा महिला असल्याने आरोपींची हिंमत वाढल्याची भावनाही एका महिलेने व्यक्त केली. या प्रकरणी मुलांची मानसिकता सुधारण्यासाठी केंद्रीय महिला व बालविकासमंत्री मनेका गांधी यांनीही राज्याच्या बालहक्क आयोगाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्याच्या बालहक्क संरक्षण आयोगाच्या एन. ए. त्रिपाठी यांनी मुलांच्या घरी भेट दिली. तसेच बाल कल्याण समितीच्या सदस्यांनीही येथे भेट देऊन दोन्ही मुलांच्या पालकांशी संवाद साधला. स्थानिक पोलीस, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्तेही या कुटुंबांच्या सांत्वनासाठी सरसावले आहेत. मात्र हे सोपस्कार पार पडले तरी भविष्यात या मुलांच्या मनातून ही घटना पुसण्यासाठी सामाजिक प्रयत्नांचीही गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

[jwplayer XqTBRt27]