मनमाड प्रवासासाठी कल्याण किंवा सीएसटी स्थानकात धाव * नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या ठाणेकर प्रवाशांना फटका
मनमाड-लोकमान्य टिळक टर्मिनस राज्यराणी एक्स्प्रेस थेट छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे वळवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या मार्गबदलामुळे या गाडीचा ठाणे स्थानकातील थांबा बंद करण्यात आला असून सोमवार, १२ ऑक्टोबरपासून हे नवे वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. त्यामुळे सोमवारी ठाणे स्थानकात दाखल झालेली राज्यराणी एक्स्प्रेस प्रवाशांना ठेंगा दाखवत निघून गेली. राज्यराणीच्या या बदलाची कल्पना अनेक प्रवाशांना नसल्याने ठाणे स्थानकातून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसला. त्यामुळे यापुढे मनमाड दिशेला प्रवास करणाऱ्या ठाणेकरांना कल्याण किंवा छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकांवरून गाडी पकडावी लागेल.

मनमाड-लोकमान्य टिळक टर्मिनस राज्यराणी एक्स्प्रेस मनमाड स्थानकातून सायंकाळी ५.२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसच्या दिशेने सुटत होती. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसला रात्री ९.५० वाजेपर्यंत पोहोचत होती. तर ठाणे स्थानकात पोहोचण्याची वेळ रात्री ९.१३ तर सुटण्याची वेळ ९.१५ होती. हीच गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून ७ वाजता मनमाडच्या दिशेने सुटत असून तिची ठाण्यात पोहोचण्याची वेळ सायंकाळी ७.२३ होती. ठाणेकरांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणाऱ्या या गाडीने मनमाड आणि नाशिकच्या दिशेने अनेक प्रवासी प्रवास करीत होते. या गाडीचा मार्ग बदलण्याचा निर्णय ७ ऑक्टोबर रोजी मध्य रेल्वेच्या वतीने घेण्यात आला. या गाडीला थेट छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत सोडण्यात आले. मात्र हा बदल करताना या गाडीचा ठाणे स्थानकातील थांबा मात्र रद्द करण्यात आला. विशेष म्हणजे याची कोणतीही माहिती प्रवाशांना दिली गेली नाही. याविषयी रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता याविषयीचे पत्रक प्रसिद्धिमाध्यमांकडे मंगळवारी पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बदललेले वेळापत्रक..

मनमाड स्थानकातून गाडी सुटण्याची वेळ सायंकाळी ५.२५ ही कायम असणार असून ही गाडी नव्या वेळापत्रकानुसार १०.७ मिनिटांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात पोहोचणार आहे. तर छत्रपती शिवाजी टर्मिनसमधून ही गाडी सायंकाळी ६.५० वाजता मनमाडच्या दिशेने प्रस्थान करील.