वाचकांची संख्या घटल्याने ३० जुलैपासून दुकान बंद करण्याचा निर्णय

एकीकडे इंग्रजी शाळांचे प्रस्थ आणि विद्यार्थ्यांचा अभाव यांमुळे मराठी शाळा बंद होत असतानाच मराठी पुस्तकांनाही वाचक नसल्याचे दिसून येत आहे. वसईतील मराठी पुस्तकविक्रीचे ‘केळकर-अभ्यंकर आणि मंडळी’ हे दुकान वाचकांअभावी ३० जुलैपासून बंद होत आहे. विशेष म्हणजे मराठी पुस्तक मिळण्याचे हे शहरातील एकमेव दुकान आहे. कमी झालेले मराठी वाचक, इंग्रजीकडे वाढता कल यांमुळे हे दुकान नाइलाजाने बंद करावे लागत असल्याचे मालकांनी सांगितले.

वसईच्या पारनाक्यावर ‘केळकर-अभ्यंकर आणि मंडळी’ हे दुकान आहे. अनिल वासुदेव अभ्यंकर यांच्या वडिलांनी १९३४ पासून म्हणजेच ८४ वर्षांपूर्वी हे दुकान सुरू केले. या दुकानात सुरुवातीला गरजेच्या विविध वस्तू उपलब्ध होत्या. त्यानंतर आपल्या वडिलांचा व्यवसाय पुढे चालवत अनिल अभ्यंकर यांनी वस्तूंव्यतिरिक्त विविध मराठी पुस्तकेही उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. पूर्वी डहाणू ते बोरिवलीपर्यंत मराठी साहित्य मिळणारे हे एकमेव पुस्तकांचे भांडार असल्यामुळे ते मिळवण्यासाठी खरा मराठी वाचकवर्ग अगदी सफाळे, पालघर, दहिसर, भाईंदर येथून यायचा. वसईतील मराठी वाचकांनाही या दुकानाने भरभरून साहित्य पुरवले. एखादे पुस्तक उपलब्ध नसल्यास ते वाचकाला उपलब्ध कसे करून देता येईल हा अभ्यंकरांचा प्रयत्न असायचा. मराठी पुस्तकांच्या तुलनेत २० टक्के इंग्रजी साहित्यही त्यांनी आपल्या दुकानात वाचकांच्या पसंतीनुसार ठेवले होते.

गेल्या काही वर्षांपासून मात्र मराठी वाचकवर्ग कमी झाला असून इंग्रजी वाचनाकडे जास्त वळत आहेत. आजकाल इंग्रजी माध्यमातून मुलांचे शिक्षण होत असल्याने मराठी वाचनात त्यांची रुची राहिलेली नसल्याने मराठी साहित्याच्या मागणीत हळूहळू घट होत गेली. आजचा तरुणवर्ग तर दुकानाकडे फिरकत नसून फक्त काही ज्येष्ठ नागरिक येथे खरेदीसाठी येत असल्याचे अभ्यंकर यांनी सांगितले. लहानग्यांना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी त्यांनी अनेक शकली लढवल्याचेही त्यांनी सांगितले. मुलांना मोफत पुस्तक देऊन त्या पुस्तकाबाबत लिहून आणण्याच्या प्रयत्नदेखील फोल ठरला. गेल्या काही वर्षांपासून खरेदीदारांची संख्या खूपच घटल्याने बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याचे अभ्यंकर म्हणाले.