प्रत्येक ऋतूच्या संधिकाळात वातावरणातील बदलामुळे तसेच त्या हंगामात असणाऱ्या हवामानाच्या प्रभुत्वामुळे सर्व सजिवांना कमी-जास्त प्रमाणात त्रास होतो. म्हणजेच उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या मुख्य ऋतूंच्या संधिकाळात वातावरणातील बदलाचा शारीरिक समतोल राखताना शरीरावर काही ताण येतात, त्या वेळी या ताणांनी आपल्याला थोडय़ाफार प्रमाणात आजारपण येण्याची शक्यता असते. उदा. उन्हाळ्यात पित्तप्रकोप पावसाळा, हिवाळा, कफप्रकोप होण्याची खूप शक्यता असते. पावसाळ्यात सर्दी-पडसे तर हिवाळ्यात छातीत कफ दाटून येतो.आजकाल तर वातावरणातील बदलांची गती नियमित राहिलेली नाही. यामुळेसुद्धा अनेक आजार सर्व सजिवांना होत असतात. यात शारीरिक व मानसिक दोन्हींचा समावेश असतो. अगदी नैराश्यापासून तापापर्यंत अनेक व्याधी वाढतात. यांचे निराकरण आपण वेगवेगळ्या वनस्पतींचे वेगवेगळे भाग वापरून करू शकतो. त्याकरिता आपल्या गच्चीत, गॅलरीत, आवारात आजार टाळण्यासाठी (प्रिव्हेन्शन दॅन क्युअर) आवश्यक असणाऱ्या वनस्पती लावून व्याधी टाळू शकतो किंवा त्यांची तीव्रता कमी करू शकतो.सामान्यपणे उद्भवणाऱ्या सर्दी, पडसे, ताप यांसाठी उपयुक्त अशा अनेक वनस्पती आहेत. त्या वेगवेगळ्या अथवा एकत्रितपणे वापरता येतात. यात अतिशय गुणकारी वनस्पती म्हणजे तुळस, कापूर तुळस, पानांचा ओवा, गवती चहा, सब्जा, कोरफड, भुई आवळा, भुई रिंगणी, वेखंड, अडुळसा, पारिजातक, बेल, निरगुडी, गुळवेल, कडीनिंब, पुदिना प्रकार, मोगरा, गुलाब, सोनचाफा, पानवेल तशा सर्वच वनस्पतींमध्ये थोडय़ाफार प्रमाणात औषधी गुणधर्म असतातच. वरील वनस्पती आपण कशा व किती लावायच्या हे आपल्याकडे असलेल्या जागेवर खूप अवलंबून असते. यातील काही वनस्पती वर्षभर असतात तर काही फक्त पावसाळ्यात असतात.
तुळस– तुळस ही अनन्यसाधारण महत्त्व असणारी वनस्पती. तुळस वर्गात २६ प्रकारच्या वनस्पती आहेत. या सर्व सुगंधी व झुडूप प्रकारात मोडतात. या सर्व पौष्टिक, ज्वरघ्न, उत्तेजक, बल्य व कृमिघ्न आहेत. सर्वाना वास येतो, सर्वात कडू रस असतो. तुळशीत प्रमुख दोन प्रकार आहेत. कृष्ण व श्वेत. काळी म्हणजे कृष्णतुळस व श्वेत म्हणजे वैजयंती तुळस. कृष्ण तुळसचे सर्व भाग औषधात वापरतात. मंजिऱ्या (फुले) येण्यापूर्वी तुळशीच्या झाडात औषधी गुणधर्म पूर्णपणे भरलेले असतात. औषधात वापरताना मंजिऱ्या आलेली तुळस वापरू नये. तुळस शीतप्रधान रोगात वापरतात. ज्वरात तुळशीचा अंगरस मिरपूडबरोबर देतात, तर अंगदुखी फार असल्यास ओवा व निर्गुडीबरोबर देतात. सर्दीच्या ज्वरात, कफासाठी तुळशीचा रस मधाबरोबर देतात. हिवताप असणाऱ्या ठिकाणी तुळस लावल्यास हिवताप येत नाही. म्हणजेच आपल्याकडे तुळशीची झाडे वेगवेगळ्या जागी असतील तर (तुळशीबाग) त्या घरातील व्यक्तींना हिवताप (मलेरिया) होत नाही. तुळस कृमिघ्न आहे. उलटी होत असल्यास तुळशीच्या पानांच्या अंगरसाने ती थांबते.
सब्जा– सर्वत्र होऊ शकणारे गुळगुळीत पानांचे तुळस वर्गातील सुगंधी झुडूप. या झाडाचे पंचांग म्हणजे सर्व भाग पान, खोड, मूळ किंवा बिया औषधी असतात. तुळशीएवढेच झाड होते. मंजिऱ्यांमध्ये असलेल्या बियांना सब्जा असे म्हणतात. तुळशीच्या बीप्रमाणेच पण आकाराने थोडे मोठे असलेले सब्जा रात्री पाण्यात भिजवून सकाळी दूध-साखर घालून घेतल्यास उष्णतेचे विकार कमी होतात. हॉटेलमध्ये मिळणाऱ्या फालुदामध्ये सब्जाचा वापर करतात. थकवा आल्यास व मेंदूस उत्तेजक म्हणून पानांचा अंगरस वापरतात. खोकला झाल्यास पानांचा अंगरस मधातून घेतल्यास ढास थांबते. कोरडा खोकला व कफ पडण्याचा त्रास कमी होतो. पोटदुखी, अजीर्ण झाल्यास पानांचा रस घेतल्याने बरे वाटते. जंतसुद्धा मरतात. तसेच कान दुखणे, दात ढिले होऊन हिरडय़ा दुखणे, जुन्या तापात अंगदुखणे इ.वर पानांचा रस उपयुक्त आहे. अनेक प्रकारच्या त्वचारोगांवर पानांचा रस चोळल्यास हे रोग बरे होतात.
पुदिना– पुदिना आहारात वापरल्यास अजीर्ण कुपचन, पोटफुगी व पोटदुखी होत नाही. पानांच्या रसाने उलटी थांबते. तापात व उन्हाने शरीरातील उष्णता वाढल्यास पाने पाण्यात टाकून ते पाणी प्यायल्यामुळे उष्णता कमी होते. सुक्या पानांच्या पावडरने दात घासल्यास दात चांगले होतात. चक्कर आल्यास पानांचा रस नाकात टाकावा.
कापूर तुळस– या पानांना कापरासारखा वास येतो. याची फांदीसुद्धा जगते. दोन ते तीन फुट उंचीचे झुडूप स्वरूपात वाढ होते. पोटांचे, उष्णतेचे विकार, सर्व प्रकारच्या तापांत पानांचा रस उपयुक्त होतो.
पानांचा ओवा– मखमली पोपटी रंगाची पाने असलेले हे झाड बहुतेक जणांच्या कुंडीत असतेच. या पानांना ओव्यासारखा वास येतो. याची भजी खूप छान लागतात. याच्या पानांना वास येतो, पण फुले येत नाहीत. वाताच्या विकारावर या पानांचा चांगला उपयोग होतो. पानांचा रस घेतल्याने गॅसेस कमी होतात.
ब्राह्मी – छोटी छोटी गोल पाने असलेली ब्राह्मी कुंडीतपण शोभून दिसते. ब्राह्मीची पाने वाटून त्यात दुप्पट साखर घालून आटवून ब्राह्मी-पाक केल्यास मेंदूची कार्यक्षमता व स्मरणशक्ती वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. ब्राह्मीमुळे मज्जातंतू व मेंदूची पुष्टी होते. ब्राह्मी घालून सिद्ध केलेले तेल डोक्याला लावल्यास मेंदू शांत व तल्लख होतो. स्मृतिभ्रंशमध्ये ब्राह्मी-पाक व तेल दोन्हींचा उपयोग होतो.
आडुळसा- हिरव्या लांबट पानांचे हे झुडूप कुंडीत चांगले वाढते. हिवाळ्यात अबोलीप्रमाणे याला पांढरी फुले येतात. हिवाळ्यात इतर फुले खूप कमी प्रमाणात असतात तेव्हा मधमाश्यांसाठी ही झुडपे उपयुक्त होतात. याची जून पाने, फुले व मुळ्या औषधात वापरतात. अडुळसा सीरप खोकल्यासाठी खूप उपयोगी होते. याने कफ पातळ होऊन लवकर बाहेर पडतो. खोकला, दमा, ज्वर इ.वर तसेच मूत्रदाह कमी करण्यास याचा उपयोग होतो.
भुईआवळा– ही वनस्पती छोटय़ा पानांची व कमी उंचीची जमिनीलगत वाढणारी आहे. चिंचेसारखी संयुक्त पाने असतात व पानांच्या खालच्या बाजूस मोहरीएवढी पुष्कळ पिवळी फळे असतात. चव आवळ्यासारखी असते. याची पंचांगे औषधात वापरतात. एकदा झाड कुंडीत लावल्यास बिया पडून सतत नवीन झाड येत असते. पावसाळ्यात सर्वत्र येते. आव झाल्यास कोवळ्या पानांचा व फांद्यांचा वापर करतात.
कोरफड
कोरफडला कुमारी असेही म्हणतात, म्हणजेच कायम तरुण असणारी अशी ही वनस्पती माणसालासुद्धा तरुण ठेवण्यास मदत करते. ऑक्सिडायझेशन कमी करण्यासाठी कोरफडीचा फार उपयोग होतो.

कोरफडीच्या पानांमधील गर ताजा किंवा सुकविलेला अनेक रोगांवर उपयुक्त आहे. सध्या जे मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे त्यासाठी, त्वचा चांगली होण्यासाठी याचा उपयोग होतो. याचा गर हळद व सैंधव मिसळून घेतल्यास अपचनाचा त्रास कमी होतो.

Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
Shukra Gochar 2024
हनुमान जयंतीनंतर या ६ राशींचे नशीब चमकणार! मेष राशीमध्ये होणार शुक्राचे गोचर, नोकरदारांचे चांगले दिवस येणार
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
climate changes Heat wave warning in Vidarbha
विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, येत्या ४८ तासात…

मधाबरोबर घेतल्यास कफाचा त्रास कमी होतो. भाजल्याने त्वचेवर डाग पडल्यास कोरफडीचा गर चोळल्यास व्रण कमी होतात व शीतलता निर्माण होते. कोरफडीचा रस कडू, शीतल, मूत्रजन्य, बल्य, दाहप्रशमक आहे.

कोरफडीसारखे दुसरे उपयुक्त औषध नाही. दैनंदिन जीवनात वापरण्यासाठी अगदी कुंडीतसुद्धा आपण याची लागवड करू शकतो.