कमकुवत फळ्यांमुळे लाखो प्रवाशांच्या जीवाला धोका; ग्रामस्थ धास्तावले

कल्याण शिळफाटा रस्त्यावरील निळजे पूल कमकुवत झाला आहे. या पुलांवरून २४ वाहनांची वाहतूक सुरू असते. तसेच पुलाच्या बोगद्यातून सतत लांबपल्ल्याच्या रेल्वे गाडय़ांची ये-जा सुरू असते. या सततच्या दणक्यांमुळे ५४ वर्षांचा निळजे पूल कमकुवत झाला आहे. पुलाच्या खांबांवरील रस्त्याच्या आडव्या पट्टय़ाचे स्लॅब सध्या निखळले आहेत. स्लॅब कोसळण्याच्या ठिकाणी तात्पुरता उपाय म्हणून प्लायवूडच्या जाड फळ्या ठोकण्यात येत आहेत. पुलाच्या तळाला ही लाकडी फळकुटे जागोजागी ठोकल्याचे दिसून येत आहे. या फळकुटय़ांच्या आधारे सध्या ही वाहतूक सुरू असल्याने लाखो प्रवाशांच्या जीवाला घोर लागला आहे.
दररोज हजारो वाहने आणि लाखो प्रवासी निळजे पुलावरून मुंबई, कल्याणच्या दिशेने ये-जा करीत असतात. पुलांवरील अवजड व सर्व प्रकारच्या वाहतुकीमुळे या कमकुवत पुलाच्या स्लॅबचे बांधकाम निखळू लागले आहे. या तुटणाऱ्या स्लॅबमुळे नवीन धोका उद्भवू नये यासाठी पुलाखाली लाकडी फळ्या ठोकण्यात आल्या आहेत. या लाकडी फळकुटांच्या पट्टय़ा सध्या लाखो प्रवाशांच्या जीवाला मोठा आधार देत आहेत. पुलाखालील स्लॅबचा उर्वरित भाग सतत सुरू असणाऱ्या वाहतुकीच्या भारामुळे कोसळू नये यासाठी बांधकाम यंत्रणांनी पुलाच्या खाली प्लायवुडचे जाड पट्टे धारदार खिळ्यांनी ठोकून ठेवले आहेत. सिमेंट आणि लाकूड हे कधीच एक जीव होत नसते. तरीही केवळ पुलाला आणि स्लॅबला आधार म्हणून ही तात्पुरती मलमपट्टी पुलाच्या नियंत्रक संस्थांनी करून ठेवली आहे. पुलाखालून रेल्वे मार्ग गेला आहे. त्यामुळे पुलाला खालून लोखंडी, सीमेंटचे टेकू देणे शक्य होत नाही, अशी खंत बांधकाम विभागातील एका सूत्राने व्यक्त केली. स्लॅब कोसळल्यानंतर त्या ठिकाणी करावयाच्या उपाययोजनांसाठी नवीन प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध असताना बांधकाम यंत्रणेवर फळ्या ठोकण्याची वेळ का आली, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
निळजे उड्डाणपूल ५४ वर्षांपूर्वी बांधला आहे. हा पूल कमकुवत झाला असल्याची माहिती रेल्वे सूत्राने दिली आहे. या पुलाची तात्पुरती डागडुजी करण्यात येत असली तरी पूल लवकरच नव्याने उभारणे आवश्यक आहे, असे रेल्वे सूत्रांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत शिळफाटा रस्ता येत आहे. या रस्त्यावर निळजे उड्डाण पूल आहे. त्यामुळे पुलाच्या उभारणीसाठी महामंडळाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. विकास कामांसाठी कोटय़वधी रुपये या यंत्रणेकडे उपलब्ध असताना पुलाच्या डागडुजीच्या कामासाठी सुमारे चौदा ते पंधरा लाखांची रक्कम रेल्वेकडे भरणा करण्यासाठी ‘एमएसआरडीसी’ टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे पुलाच्या डागडुजीचे काम रखडत आहे.
भगवान मंडलिक