कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना सत्ताधारी शिवसेनेला पुन्हा एकदा मुंबई, ठाण्यातील निराशाजनक कामगिरीबद्दल विरोधी पक्षांनी चारही बाजूंनी घेरल्याचे चित्र आहे. कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेची गेली १५ वर्षांपासून सत्ता आहे. या काळात हे शहर नियोजनाच्या आघाडीवर कसे लयास गेले, याची अनेक उदाहरणे एव्हाना पुढे आली आहेत. सार्वजनिक सुविधांची आरक्षणे असलेल्या जमिनींवर झालेली बेसुमार बेकायदा बांधकामे, विकासकामांचा बोजवारा, पर्यावरणाच्या अपरिमित अशा शोषणाची अनेक उदाहरणे येथील मतदारांपुढे आहेत.

ठाणे महापालिकेतील राजकीय व्यवस्थेविषयी जाहीरपणे नाराजी व्यक्त करावी अशी स्थिती आहे. या ठिकाणी वर्षांनुवर्षे चालत आलेली बिल्डराभिमुख व्यवस्थेचे अनेक किस्से सातत्याने चर्चेला येत असताना सूरज परमार यांच्या आत्महत्येमुळे महापालिकेच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली जाऊ लागली आहेत. परमार यांनी लिहिलेल्या पत्रात काही नगरसेवकांची नावे पुढे येत असली तरी महापालिकेतील एकूण कारभाराविषयी शंका उपस्थित होण्यासारखी परिस्थिती या घटनेमुळे निर्माण झाली आहे. ठाण्यात वर्षांनुवर्षे सत्ता गाजविणाऱ्या शिवसेनेला आणि या पक्षाच्या नेत्यांना यापासून नामानिराळे निश्चितच राहता येणार नाही. ठाणे महापालिकेच्या अब्रूचे जेवढे िधडवडे निघतील त्या प्रमाणात कल्याण-डोंबिवलीत अनागोंदीची चर्चाही निवडणूक प्रचारात सातत्याने होत राहणार आहे. मुंबई, ठाणे असो वा कल्याण, डोंबिवली.. या शहरांच्या दुरवस्थेला जबाबदार कोण, हा सवाल उपस्थित होतोच. या तीनही ठिकाणी एक बाब समान असल्याचे सहज लक्षात येते आणि ते म्हणजे येथील सत्तेची सूत्रे शिवसेनेकडे आहेत.

अतिशय पोषक वातावरण असतानाही प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे जाताना राजकीय चाली रचताना केलेल्या गफलतींमुळे नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला सत्तासोपान गाठता आलेला नाही. या पराभवामागील राजकीय कारणांचे वेगवेगळ्या अंगांनी विश्लेषण होत असले तरी नवी मुंबईत शिवसेनेला बहुमताजवळ पोहोचता आले नाही, त्याचे हे एकमेव कारण नाही. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली यांसारख्या शहरांमध्ये शिवसेनेची वर्षांनुवर्षे सत्ता आहे. अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्येही या पक्षाची पाळेमुळे रुजली आहेत. वर्षांनुवर्षे सत्ता भोगूनही शिवसेनेने या शहरांच्या विकासासाठी नेमके काय केले, या प्रश्नाभोवती यंदा नवी मुंबईची निवडणूक गाजत राहिली.

हा प्रश्न निवडणूक निकालांवर प्रभाव पाडणारा ठरला हे शिवसेना नेत्यांनाही नाकारता येणार आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात स्थानिक नेते गणेश नाईक यांनी ठाणे, कल्याण महापालिकांमधील अंदाधुंदी कारभाराचे अनेक किस्से जाहीरपणे सांगत शिवसेना नेत्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मतदानाच्या आदल्या दिवशी वर्तमानपत्रातून निनावी पत्रके वाटली गेली. त्यामध्ये ठाणे, कल्याण शहरांचे कसे तीनतेरा वाजले आहेत आणि त्यास शिवसेनेचे नेतृत्व कसे जबाबदार आहे, याचा सविस्तर आढावा घेण्यात आला होता.
नवी मुंबई महापालिकेचे कर्तृत्व फार मोठे आहे अशातला भाग निश्चितच नव्हता. मात्र ठाणे, कल्याणची अवस्था पाहता आपली नवी मुंबई बरी, असा विचार येथील सुज्ञ मतदारांनी केला. नवी मुंबईत आपला पराभव का झाला, याचे नेमके विश्लेषण शिवसेनेच्या नेत्यांनी केले असते तर किमान सहा महिन्यांत कल्याण-डोंबिवलीत काही तरी ठोस करण्याचा प्रयत्न या पक्षाकडून झाला असता. मात्र, संघटनात्मक बांधणीच्या जोरावर हवेत वावरणाऱ्या या पक्षाच्या नेत्यांना शहराच्या विकासासाठी ठोस काही तरी करावे याचे भान उरत नाही हे अनेकदा ठाण्यातही दिसले आहे. कल्याण, डोंबिवलीत या पक्षाचे नेते नेमकी हीच चूक करताना दिसत आहेत.

अनागोंदीचे वर्तुळ

कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक अगदीच तोंडावर असताना ठाण्यातील प्रसिद्ध बिल्डर सूरज परमार यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या पत्रात ठाणे महापालिकेतील एकंदर कारभाराविषयी काही प्रश्न उपस्थित केले. या महापालिकेच्या शहर विकास विभागात कशी अनागोंदी सुरू आहे आणि मोठे बिल्डर या विभागाकडून आणि काही ठरावीक नगरसेवकांच्या टोळीकडून कसे नाडले जात आहेत याचा उल्लेखही या पत्रात असल्याचे सांगण्यात येते. परमार यांच्या आत्महत्येमागील नेमकी कारणे काय आणि त्यास जबाबदार कोण, याचा शोध पोलीस तपासात लागेल, अशी अपेक्षा आहे. मात्र त्यांनी लिहिलेल्या पत्रामुळे महापालिकेच्या कारभाराचे िधडवडे निघू लागले आहेत हे सत्य येथील सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांनाही नाकारता येणार नाही.

ठाणे महापालिकेत चाललेय काय, असा प्रश्न विचारण्याजोगी परिस्थिती येथे गेल्या अनेक महिन्यांपासून आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोटय़वधी रुपयांची कामे काढून तिजोरीत खडखडाट निर्माण करणाऱ्या व्यवस्थेपुढे सुरुवातीला महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही हात टेकल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. सुरुवातीच्या अनुभवानंतर जयस्वाल बरेचसे सावरले असून आता महापालिकेच्या कारभाराची सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली आहेत. एका अर्थाने हे बरेच झाले. गेल्या साडेतीन वर्षांपासून महापालिकेतील राजकीय व्यवस्था अतिशय गढूळ झाली आहे. या गढूळ राजकारणामुळे शहर विकासाचा गाडा अडकून पडल्यासारखी परिस्थिती असून सत्ताधारी शिवसेना नेते याविषयी फार गंभीर आहेत असे चित्र अपवादानेच दिसून आले. शिवसेनेचा मित्रपक्ष असलेला भाजप तर या काळात अस्तित्वहीन झाल्यासारखी परिस्थिती आहे. मध्यंतरी या पक्षाचे आमदार संजय केळकर यांनी महापालिकेतील कारभाराविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. महापालिकेत ठरावीक नगरसेवकांनी गोल्डन गँग कार्यरत असून त्यांच्यामार्फत सगळा कारभार हाकला जातो, असा जाहीर आरोप केळकर यांनी केला होता.

परमार यांच्या आत्महत्येनंतर शिवसेनेच्या काही आमदारांनीही हाच सूर कायम ठेवला आहे. सुदैवाने राज्यात आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी शिवसेना-भाजपचे सरकार अस्तित्वात आहे. आमदार केळकर ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात त्या पक्षाचे नेते या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे परमार यांच्या आत्महत्येमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाल्याने केळकर यांनी शहर विकास विभागातील सर्व प्रकरणांचा चौकशीचा आग्रह धरण्याची आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षांत शहर विकास विभागाने मंजूर केलेले विकास प्रस्ताव दंड आकारून नियमित केलेले बांधकाम, वाढीव बांधकामांना दिलेल्या परवानग्या, विकास हस्तांतरण हक्कांचे व्यवहार या सर्वाची सखोल चौकशी नगरविकास विभागामार्फत करण्याचा आग्रह केळकर आणि त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या आमदारांनी धरायला खरे तर हरकत नाही.

महापालिकेत ठरावीक नगरसेवकांची सद्दी चालते आणि गोल्डन गँग नावाने ही मंडळी ओळखले जातात हे उघड सत्य आहे. त्यामुळे महापालिकेचे जे काही वाटोळे झाले त्यास जबाबदार असणाऱ्या गोल्डन गँगच्या मुसक्या आवळण्यासाठी इतकी वर्षे ठाण्यातील सर्वपक्षीय आमदार आणि नेत्यांनी नेमके काय केले, याचे उत्तर या मंडळींनाही द्यावे लागणार आहे. महापालिकेतील अनागोंदीला आपण जबाबदार नाही असा आव आणत या नेत्यांना नामानिराळे राहता येणार नाही. ठाणे महापालिकेतील बोकाळलेल्या व्यवस्थेला एखाददुसरा नेता जबाबदार असण्यापेक्षा सत्ताधारी आणि विरोधी पक्ष म्हणून आपली काही जबाबदारी आहे याचे भान सर्वपक्षीय नेत्यांना बाळगावे लागणार आहे. कल्याणपाठोपाठ मुंबई, ठाण्याच्या निवडणुकीला सामोरे जाताना शिवसेना नेते यातून काही तरी धडा घेतील, अशी अपेक्षा आहे.