भाजप प्रवेश सुकर करण्यासाठी तक्रारदारांचे अर्ज मागे? पक्षातील अनेक ज्येष्ठांची मात्र नाराजी

उल्हासनगरातील कलंकित नेते पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी यांना महापालिका निवडणुकीपूर्वी पक्षात घेण्याची जोरदार तयारी सध्या भाजपमध्ये सुरू झाली असून या प्रवेशात अडथळा ठरत असलेल्या गुन्ह्यांमधून ओमी यांना मुक्ती मिळावी अशी व्यूहरचना आता अंतिम टप्प्यात आल्याची चर्चा आहे.

‘टीम ओमी’च्या राजकीय उत्साहावर इतके दिवस विरजण टाकणाऱ्या गुन्ह्यांमधील तक्रारदारांनी शुक्रवारी तक्रार मागे घेत असल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केल्याने येथील राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून यामुळे ‘पावन’ झालेल्या ओमी यांनी पक्षप्रवेश देता येईल असा दावा भाजप नेते करू लागले आहेत. विशेष म्हणजे, या पक्षप्रवेशास उल्हासनगरातील भाजपचे माजी आमदार कुमार आयलानी आणि ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी तीव्र हरकत घेतली असून यामुळे पक्षात उभी फुट पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

उल्हासनगर महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत युती तोडण्यासाठी भाजपचे जिल्हास्तरीय नेते आग्रही आहेत. नरेंद्र मोदी यांच्या लाटेनंतरही उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांनी भाजपचा पराभव केला होता. त्यामुळे उल्हासनगरात शिवसेनेला वाकुल्या दाखवायच्या असतील तर कलानी पुत्र ओमी यांना पक्षप्रवेश देण्याशिवाय पर्याय नाही, असे भाजपतील चाणक्यांचे मत बनले आहे. भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि प्रदेश पातळीवरील काही नेत्यांनी ओमी यांच्या प्रवेशासाठी भलताच आग्रह धरला असून आयलानी आणि केळकर या पक्षातील जुन्या जाणत्यांनाही त्यासाठी बाजूला सारण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. ओमी यांच्या भाजप प्रवेशात त्यांच्यावरील दोन गंभीर गुन्ह्यांचा अडथळा ठरत आहे. या गुन्ह्यांमुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहचेल असा आयलानी, केळकर गटाचे म्हणणे आहे.  मुंबई, ठाण्यातील निवडणुकांवरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हा प्रवेश टाळावा यासाठी केळकर गट आग्रही असताना राज्यमंत्री चव्हाण मात्र यासाठी वेगवेगळ्या व्यूहरचना करताना दिसत आहेत.

प्रतिज्ञापत्रांची चर्चा

२०११ वर्षांत उल्हासनगर पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या हत्येचा प्रयत्न आणि त्यापूर्वी अशाच स्वरूपाचा एक गुन्हा ओमी यांच्याविरोधात दाखल झाला आहे. हे दोन्ही गुन्हे मागे घ्यावेत, अशा स्वरूपाचे प्रतिज्ञापत्र तक्रारदार सुनील सुखरामानी आणि प्रकाश कलवानी यांनी शुक्रवारी सत्र न्यायालयाकडे सादर केले. यासंबंधी सविस्तर प्रतिज्ञापत्र देण्यात आल्याने ओमी कलंकित आहेत असे म्हणता येणार नाही, असा दावा ओमी यांचे समर्थक आणि राष्ट्रवादीचे गटनेते मनोज लासी यांनी शनिवारी पत्रकारांना दिली. याबाबत ओमी कलानी यांना विचारले असता त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. या तक्रारी संबंधितांनी का मागे घेतल्या हे त्यांनाच विचारा असेही ते म्हणाले. दरम्यान, प्रतिज्ञापत्र नाटय़ानंतर ओमी यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोरात रंगली असून यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. यासंबंधी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, तर कुमार आयलानी यांनी प्रतिक्रियेस नकार दिला.

नाईकांची मध्यस्ती आणि निष्ठेचा दावा

ओमी यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोरात असताना राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी शनिवारी उल्हासनगरात कलानी कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी पक्ष कार्यकर्त्यांची मुलाखत घेण्यासाठी ज्योती आणि ओमी उपस्थित राहिल्याने त्यांचा पक्ष सोडून जाण्याचा प्रश्नच येत नाही, असा दावाही नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना केला. ओमी कलानी राष्ट्रवादीतच असल्याचे जरी नाईक सांगत तरी ते फार काळ राष्ट्रवादीत राहाणार नाहीत, असा दावा त्यांचे समर्थक करत होते.