नालासोपाऱ्यातील घटना; पाच जणांना अटक

नालासोपारा येथे एका मनोरुग्ण तरुणाने गर्दीतील काही जणांवर चाकूहल्ला केल्यानंतर जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने मारहाण करणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे.

मूळचा आसामचा असलेला कोमल कुटुंब (३४) हा तरुण वडिलांच्या उपचारासाठी मुंबईत आला होता. नालसोपारा येथे राहत असलेल्या त्याच्या वडिलांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोमल हा मनोरुग्ण असून अधूनमधून त्याला वेडाचा झटके येत असतात, अशी माहिती तुळिंज पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी दिली.

गेल्या आठवडय़ात त्याचे वडील आणि एक नातेवाईक उपचारासाठी मुंबईला गेले होते. कोमलला वेडाचे झटके येत असल्याने त्याला सोबत घेतले नाही. संध्याकाळी कोमल बाहेर पडला आणि नालासोपारा स्थानकाजवळ येताच त्याने खिशातील चाकू काढला आणि लोकांवर बेछूट हल्ला करायला सुरुवात केली. या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी

झाला, तर एका महिलेसह पाच जणांना किरकोळ दुखापत झाली. या वेळी १५ ते २० जणांच्या जमावाने कोमलला पकडून बेदम मारहाण केली आणि तुळिंज पोलिसांच्या ताब्यात दिले.

तुळिंज पोलिसांच्या पथकाने त्याला उपचारासाठी ठाण्याच्या मनोरुग्णालयात नेले, मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयातून प्रमाणपत्र आणण्यास सांगितले होते. त्या कालावधीत अचानक कोमलची तब्येत बिघडली आणि रुग्णालयात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला.

शवविच्छेदन अहवालात मारहाणीत बरगडय़ा तुटल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तुळिंज पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मारहाण करणाऱ्या पाच जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

कोमलचा मृत्यू हा पोलिसांच्या ताब्यात असताना झाल्याने या प्रकरणाचा तपास पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.