उत्तन परिसरात होत असलेल्या वाळूचोरीचा फटका; पाली, चौक किनाऱ्यावर बेधडक रेतीउपसा

उत्तन येथील पाली, चौक किनाऱ्यावर वाळूमाफियांकडून बेधडकपणे वाळूचोरी केली जात असल्यामुळे येथील किनारा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. समुद्राच्या भरतीच्यावेळी पाणी थेट रस्त्याला स्पर्श करू लागले आहे. वारंवार तक्रारी करूनही वाळूचोरांवर कारवाई होत नसल्याने स्थानिक मच्छीमार आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

उत्तनपासून ते थेट पाली चौकपर्यंत समुद्रकिनारा पसरला आहे. या किनाऱ्याचा वापर स्थानिक मच्छीमार समाज मासळी सुकवण्यासाठी केला जातो, त्याशिवाय पावसाळ्यात मासेमारी बोटी उभ्या करण्यासाठीही या किनाऱ्याचा वापर होत असतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून याठिकाणी बेधडक किनाऱ्यावरील वाळूचोरी केली जात आहे. वाळूमाफिया रात्रीच्यावेळी अंधाराचा फायदा घेऊन किनाऱ्यावरील वाळू टेम्पोत भरून नेतात. ही वाळू स्थानिकांना घरबांधणीसाठी विकली जाते अथवा उत्तनबाहेर पाठवली जाते. वाळूमाफियांची दहशत इतकी आहे की या अवैध व्यवसायाविरोधात आवाज उठवणाऱ्याला मारहाण करणे, धमक्या देणे असे प्रकार केले जातात. वाळूचोरीचा थेट फटका बसलेल्या एका कुटुंबाने या चोरीला विरोध केला असता कुटुंबातील सदस्याच्या अंगावर गाडी चढवण्याचा प्रकार करण्यात आला होता. चोरीविरोधात पोलीस ठाणे, महसूल विभाग अशा सर्व ठिकाणी तक्रारी करण्यात आल्या आहेत, परंतु कोणतीही कारवाई झालेली नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

वाळूचोरी थांबली नाही तर किनाऱ्यावर वसलेल्या पाली, शांतीनगर या भागातील घरांना धोका निर्माण होणार आहे. वाळूचोरीमुळे किनाऱ्याचे अस्तित्वच धोक्यात आले असून मासळी सुकवण्याच्या जागांवर आता समुद्राचे पाणी येऊन धडकू लागले आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून समुद्राला मोठी भरती आहे. त्यामुळे भरतीचे पाणी आता रस्त्यापर्यंत येऊन पोहोचले आहे.  मेल्वीन सांबऱ्या, स्थानिक रहिवासी

आंदोलनाचा इशारा

वाळूचोरीविरोधात ग्रामस्थांनी ‘पाली-शांतीनगर स्थानिक संघर्ष समिती’ची स्थापना केली आहे. या समितीने वाळूचोरीविरोधात भूमिका स्पष्ट करण्यासाठी २५ जूनला ग्रामस्थांची सभा आयोजित केली होती, परंतु सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने ती होऊ शकली नाही. मात्र वाळूचोरीविरोधात संघर्ष समितीच्या माध्यमातून आंदोलन उभारण्यात येणार असून लवकरच उत्तन सागरी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे स्थानिक रहिवासी मेल्वीन सांबऱ्या यांनी सांगितले.