हल्लीच्या बदलेल्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाइलच्या पद्धतीत नवनवीन बदल होताना दिसतात. सोईचे साधन म्हणून मोबाइल फायदेशीर ठरत असताना मोबाइलच्या माध्यमातून सेल्फी काढण्याच्या मोहापायी अपघाताचे प्रमाणही वाढताना दिसते. ठाण्यात खाडी किनाऱ्यावर मागील वर्षी सेल्फी काढत असताना शुभम नावाच्या शाळकरी मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यात आता ठाणे महापालिका धोकादायक सेल्फी पॉईंट संदर्भात विचार करत आहे. भविष्यात जर पालिकेने सेल्फी पॉईंट देण्याचा विचार केला तर त्या ठिकाणी संरक्षण दिले पाहिजे, असे मत ठाणेकरांनी व्यक्त केले.

तरुणाईमध्ये हल्ली सेल्फीची क्रेझ आहे. त्यामुळेच ठाण्यात खाडी परिसर आणि तळ्याच्या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी नेहमीच गर्दी होताना दिसते. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील खाडी किनारी परिसरात नियोजित सेल्फी पॉईंट संदर्भात ठाण्यातील तरुणाईशी आणि नागरिकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी सेल्फी पॉईंटच्या ठिकाणी सुरक्षा असायला हवी, असे मत ठाणेकरांनी व्यक्त केले. ठाण्यातील खाडी किनारी मोठ्या प्रमाणावर अपघात घडतात. त्यामुळेच ठाण्यातील चांगले वातावरण मृत्यूचा सापळा ठरु नये, असा सूर या संवादात ठाणेकरांमध्ये पाहायला मिळाला. ठाणे खाडी परिसरात कोणत्याही सुरक्षिततेच्या हमी शिवाय सेल्फी पॉईंट उभारु नयेत, वन विभागाच्या परिसरात सेल्फी पॉईंट तयार करता येऊ शकतात, असा सल्लाही ठाणेकरांनी यावेळी दिला.