ठाण्यातील रस्त्यांवर भरधाव वाहने चालवून वेगमर्यादेच्या नियमांना हरताळ फासण्यासोबतच अपघातांनाही कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकांच्या मुसक्या आवळण्यासाठी वाहतूक पोलीस आता ‘गन’चा वापर करणार आहेत. रस्त्यावरून धावणाऱ्या कोणत्याही वाहनाचा वेग टिपणाऱ्या पाच ‘स्पीड गन’ ठाणे वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे सुसाट वाहन-शर्यतींमुळे कुप्रसिद्ध झालेल्या येऊरचा पायथा, उपवन अशा परिसरांतील वाहनांच्या वेगाला नियमांनुसार आवर घालणे शक्य होणार आहे.
 राज्य शासनाकडून उपलब्ध झालेल्या निधीतून हे यंत्र वाहतूक पोलिसांना नुकतेच देण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील भरधाव वाहनांवर कारवाई करणे वाहतूक पोलिसांना शक्य होणार आहे. ठाणे शहरामध्ये भरधाव वेगाने वाहन चालविण्याचे प्रकार येऊर, कोपरी, उपवन, घोडबंदर मार्गावर सातत्याने घडत असल्याच्या तक्रारी पुढे येत होत्या. ठरावीक वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांचा वेग मोजण्याची यंत्रणा वाहतूक पोलिसांकडे नसल्याने नियमांचे उल्लंघन करणारे अनेक वाहनचालक कायद्याच्या कचाटय़ातून सुटत होते. काही वर्षांपूर्वी वाहतूक पोलिसांना एक स्पीड गन उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामध्ये तांत्रिक दोष असल्याने तिचा वापर पूर्णपणे बंद होता. ठाण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सुयश प्रधान यांनी मार्च महिन्यामध्ये केलेल्या माहिती अधिकार अर्जामधून ही माहिती उघड झाली होती.
आता पाच ‘स्पीड गन’ वाहतूक पोलिसांच्या हाती आल्या आहेत. या यंत्रावर भरधाव वाहनाचा क्रमांक, वाहनाच्या वेगासह अन्य माहिती या यंत्रणेवर नोंदवली जाणार आहे. यासाठी वाहतूक अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात येत आहे. लवकरच शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी या ‘स्पीड गन’चा वापर होताना दिसेल, अशी माहिती वाहतूक अधिकाऱ्यांनी दिली.