सारे शहर चकाचक करण्याचा निर्धार; कलाकारांचाही उत्स्फूर्त सहभाग

‘एक दिवस ठाण्यासाठी.. स्वच्छ सुंदर शहरासाठी’, या महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत रविवारी सकाळपासून शहरातील गृहसंकुल, रस्ते तसेच नाक्यानाक्यांवर नागरिकांचे जथे जमले होते. हातात झाडू घेत नागरिकांनी परिसर स्वच्छ करत महास्वच्छता अभियानाला हातभार लावला.

शहरात पहिल्यांदाच महास्वच्छता अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण शहरात एकाच वेळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून या मोहिमेमुळे दिवाळीपूर्वी संपूर्ण शहर एक प्रकारे चकाचक झाल्याचे चित्र आहे. या मोहिमेनंतर आयोजित महास्वच्छता अभियानाच्या सांगता समारंभात हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी उपस्थिती लावत ठाणेकरांना स्वच्छतेचा संदेश दिला. तसेच या समारंभास उपस्थित नागरिकांनी स्वच्छतेची शपथ घेऊन यापुढे शहर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार केला.

ठाणे महापालिका क्षेत्रात १ ऑक्टोबरपासून महास्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. या अभियानापूर्वी नागरिकांनी आपआपल्या परिसरात स्वच्छता करावी, असे आवाहन ठाण्याचे महापौर संजय मोरे आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील नागरिक सकाळपासून हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरले होते.

सकाळी ८ वाजता महापालिका मुख्यालय येथून दीडशे दुचाकीस्वारांनी रॅली काढत संपूर्ण शहरात स्वच्छतेचा संदेश देऊन अभियानाची सुरुवात केली. त्याचप्रमाणे आनंदनगर ते पातलीपाडा आणि तीन हात नाका ते मीनाताई ठाकरे चौक या ठिकाणी पालक आणि विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून स्वच्छतेचा संदेश दिला.

कलाकारांची उपस्थिती..

महास्वच्छता अभियानाच्या सांगता समारंभाला हिंदी चित्रपट निर्माते सुभाष घई, अभिनेता विवेक ओबेरॉय, अभिनेत्री अम्रिता राव, इशा कोप्पीकर, सुजेन बर्नेट यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता प्रशांत दामले, मंगेश देसाई, भाऊ  कदम, मधुरा वेलणकर, प्राजक्ता माळी, सुप्रिया पाठारे, चिन्मय उदगीरकर, पुष्कर श्रोत्री यांनी उपस्थिती लावून स्वच्छतेचा संदेश दिला. कलर्स मराठी वाहिनीवरील कॉमेडी नाइटसची बुलेट ट्रेनमधील भूषण कडू, सुहास परांजपे आणि अभिजीत चव्हाण यांनी स्वच्छतेचा संदेश देणारा कार्यक्रम या वेळी सादर केला.