भाजपच्या शक्तिप्रदर्शनानंतर निवडणूक नियमांच्या कठोर अंमलबजावणीच्या सूचना

भाजपच्या राज्यस्तरीय बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शहरभर बॅनरबाजीचा धुमाकूळ मांडत येथेच्छ शहर विद्रूपीकरण करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांकडे डोळेझाक करणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनाने येत्या दिवसात मात्र कोठेही आचारसंहितेचा भंग होणार नाही तसेच फलकबाजी होणार नाही यासाठी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील बेकायदा बांधकामे, अवैध धंद्यांविरोधात मोठी मोहीम सुरू करणारे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या प्रशासनाने आचारसंहितेच्या काळात सुरू असणाऱ्या या फलकबाजीकडे दुर्लक्ष केल्याची टीका गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. विरोधी पक्षांनी याप्रकरणी भाजपविरोधात गुन्हे दाखल करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले असताना जयस्वाल यांनी निवडणूक तयारीसंबंधी  बोलाविलेल्या बैठकीत मात्र फलकबाजी खपवून घेणार नाही, असा सूर लावला.

राज्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी जे.एस.सहारिया यांनी गेल्या बुधवारी पत्रकार परिषद घेऊन राज्यासह ठाणे महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. हा कार्यक्रम जाहीर होताच ठाणे महापालिका क्षेत्रात लागलीच अचारसंहिता लागू झाली. या काळात विनापरवानगी बॅनर उभारणे, प्रचार करणे तसेच शहर विद्रूपीकरणावर कडक र्निबध असतात. मात्र, या नियमांची जागोजागी ऐशीतैशी होत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. आचारसंहिता जाहीर होताच दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी भाजपची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह केंद्रातील व राज्यातील मंत्री व पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीच्या निमित्ताने ठाण्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अन्य नेत्यांच्या स्वागतासाठी शहरभर फलकबाजी केली होती. तसेच शहरातील सर्वच रस्त्यांवर पक्षांचे झेंडे लावले होते. या फलकबाजीमुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने राज्य निवडणूक आयोगाकडे याप्रकरणी तक्रार केली आहे. तसेच आचारसंहितेच्या काळात भाजपच्या फलकबाजीमुळे महापालिका प्रशासनावर टीकेचा भडिमार होऊ लागला होता. या फलबाजीनंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दोन दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यामध्ये बेकायदा फलकांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. यासंदर्भात अतिक्रमण व जाहिरात विभागाचे उपायुक्त तसेच सर्वच सहायक आयुक्तांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. त्याचप्रमाणे निवडणूक काळात आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण व अशोक रणखांब, उपायुक्त, साहाय्यक आयुक्त आणि सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. या बैठकीमध्ये आयुक्तांनी निवडणूक कामाचा आढावाही घेतला.