tvlog01सरकते जिने, वातानुकूलित स्वच्छतागृह, लिफ्टची व्यवस्था, फूड प्लाझा, इलेक्ट्रॉनिक इंडिकेटर, सीसी टीव्ही आणि आता सुसज्ज अशा वाहनतळाची व्यवस्था. मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक अशी बिरुदावली मिरविणाऱ्या ठाणे स्थानकात ‘अच्छे दिन’ अवतरल्याचे चित्र गेल्या काही महिन्यांपासून पद्धतशीरपणे उभे केले जात आहे. या सुविधा गरजेच्या आहेत या विषयी कुणाच्याही मनात दुमत नाही, परंतु झपाटय़ाने वाढणाऱ्या ठाणे शहरातील एकमेव स्थानकासाठी या सुविधा म्हणजे वरवरची मलमपट्टी ठरण्याची शक्यता अधिक आहे.

मध्य रेल्वेच्या एका अहवालानुसार दररोज सुमारे सहा लाख प्रवासी ठाणे स्थानकातून प्रवास करतात. हा आकडा गेल्या वर्षभरात काही हजारांनी वाढला असण्याची शक्यता अधिक आहे. असे असताना केवळ सुविधांचा मारा करून येथील प्रश्न सुटणार आहेत का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. ठाणे आणि मुलुंडदरम्यान आणखी एक स्थानक असावे, अशा स्वरूपाचा प्रस्ताव गेली चार वर्षे रेल्वे मंत्रालयाच्या विचाराधीन आहे. कोपरी परिसरात मनोरुग्णालयाची जागा त्यासाठी हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव अद्याप कागदावर आहे. लहान सुविधा निर्माण करताना ठाणे आणि आसपासच्या रेल्वे प्रवासी सेवेवर दूरगामी परिणाम करतील, असे निर्णय घेण्याची आता वेळ आली आहे.
ठाणे स्थानकाच्या फलाट आणि गाडीतील पोकळीमध्ये पडून अपघात होत आहेत. मोठय़ा गर्दीमुळे सकाळ आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी ठाणे स्थानकातून प्रवास करणे नकोसे होते. प्रथम श्रेणी प्रवासही गर्दीच्या घुसमटीतून करावा लागतो. स्थानकातील पादचारी पुलांची जोडणी व्यवस्थित नसल्याने मुंबईकडील बाजूचा पूल गर्दीमुळे कोंडीमय होण्याच्या घटना दररोज घडत असतात. त्यामुळे प्रवाशांना वावरण्यासाठी पुरेशी जागा असेल, गर्दीचा त्रास कमी होईल, अपघात होणार नाहीत, स्वच्छतागृहाापासून स्वच्छ हवेपर्यंत सगळ्या गोष्टी प्रवाशांना सहज उपलब्ध होतील, अशा प्रवासीस्नेही स्थानकाची गरज निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेला स्थानकाचा विकास हा त्यामुळेच प्रवाशांना मलमपट्टीसारखा भासू लागला आहे.
तब्बल १६३ वर्षांपूर्वी बांधलेल्या ठाणे स्थानकाच्या मूळ इमारतीच्या आजूबाजूला स्थानक विस्तार करण्यात आला आहे. एक रूळ आणि एका फलाटांचे आता दहा फलाट झाले आहेत. मात्र त्यांच्या विस्तार करताना मूलभूत सुविधांचाच विचार केला जात नसल्याने प्रवाशांना ही स्थानके अद्यापही प्रवासासाठी सुयोग्य वाटत नाहीत. वाहतूक व्यवस्थेचे ठोस नियोजन नसताना ठाण्यासारख्या शहरात दररोज नव्या गृहप्रकल्पांना मान्यता दिली जात आहे. त्यामुळे वर्षांगणिक या शहराची लोकसंख्या काही लाखांनी वाढू लागली आहे. असे असताना रेल्वेव्यवस्थेचे सक्षमीकरण करण्यात येथील यंत्रणांना पुरेसे यश आलेले नाही. दरवर्षीच्या अर्थसंकल्पात प्रवाशांच्या अपेक्षांची यादी वाढते आहे. अर्थसंकल्प जाहीर होताच पदरी निराशा पडते. सिडकोने नियोजनपूर्वक उभारलेल्या नवी मुंबईतील स्थानकांच्या तुलनेत सर्वाधिक गर्दीच्या ठाणे स्थानकाची दुर्दशा का होऊ लागली आहे याचे उत्तर देण्यास कुणीही तयार नाही. भारतीय रेल्वे आणि सिडको महामंडळाच्या संयुक्त भागीदारीतून या स्थानकांचा विकास झाला. भविष्यातील प्रवासी संख्येचा विचार करून स्थानकाच्या क्षमतेचा विचार करण्यात आला होता. २०० किमी लांबी, २०० हेक्टर क्षेत्रव्याप्ती, ६ स्वतंत्र रेल्वे मार्ग व ३० स्थानकांचा या उपक्रमात समावेश आहे. प्रत्येक रेल्वे स्थानक पायी चालत गाठण्याच्या अंतरावर, रेल्वे मार्गाच्या अदलाबदलीसाठी सुलभ पर्याय, प्रत्येक स्थानकावर दुहेरी फलाटांची योजना, आरामदायक व सुखकर प्रवास ही नवी मुंबई उपनगरीय रेल्वेची वैशिष्टय़े आहेत. सिडकोच्या या दाव्यात बऱ्यात अंशी तथ्य आहे. कुठल्याही एका स्थानकावर मोठा भार पडणार नाही, असे नियोजन नवी मुंबई शहरात दिसते. ठाण्याचा विकास करताना नजीकच्या काळातही अशा स्वरूपाचा विचार झालेला नाही.
भार वाढता वाढे..
ठाणे स्थानकातून दिवसाला दीड हजाराहून अधिक उपनगरीय रेल्वे गाडय़ा धावत असून सुमारे साडेसात लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. तितकीच गर्दी लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी असून लाखो प्रवासी प्रतिदिन राज्य आणि परराज्यात प्रवास करीत असतात. या प्रवाशांना अत्यंत गरजेची असलेली स्वच्छतागृहांची व्यवस्था स्थानकात अत्यंत तुटपुंजी आहे. स्थानकातील दहा फलाटांपैकी केवळ दोन फलाटांवर स्वच्छतागृहे आहेत. दहा क्रमांकाच्या फलाटावर एक तर अन्य दोन स्वच्छतागृह फलाट क्रमांक दोनवर आहेत. त्यात आणखी एका वातानुकूलित स्वच्छतागृहाची भर पडत आहे. हे स्वच्छतागृह पाच आणि सहा क्रमांकाच्या फलाटांवर आवश्यक असताना केवळ जाहिरातदाराला जाहिरात करण्यास अडचण येईल म्हणून वातानुकूलित स्वच्छतागृह फलाट क्रमांक दोन जवळ उभारण्यात आले आहे. त्यामुळे एकाच फलाटावर तीन स्वच्छतागृहे तर अन्य फलाटांवर मात्र स्वच्छतागृहच नाही, असा विरोधाभास या ठिकाणी पाहायला मिळतो. येथील रेल्वे पुलांची अवस्थाही अत्यंत विदारक बनू लागली आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाव्यतिरिक्त अन्य जुने दोन पुलांवर प्रवाशांची कोंडी होण्याचे प्रमाण नित्याची बाब बनली आहे. एकाच वेळी दोन फलांटवर गाडय़ा आल्यानंतर चढण्यासाठी जिन्यावर कोंडी होते. या गर्दीला हटवण्यासाठी पोलीस आणि आरपीएफच्या जवानांची दमछाक होते. मुंबईच्या बाजूच्या पुलाची अवस्था तर अत्यंत बिकट असून तेथून चालणे प्रवाशांना कठीण बनते. नव्या पुलाला सरकते जिने बसवण्यात आल्याने या पुलांवर जाण्याचा मार्ग अरुंद बनला असून प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागतो. स्थानकातील छतांचा प्रश्न गंभीर असून एका सर्वेक्षणामध्ये मुंबई उपनगरीय रेल्वेच्या सगळ्याच स्थानकातील पत्रे प्रवाशांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नव्या स्थानकाचा पर्याय..
ठाणे स्थानकावर प्रवाशांना मोठा भार पडू लागल्याने या भागात नव्या स्थानकाची अथवा विस्तारित फलाटाची आवश्यकता भासू लागली आहे. मनोरुग्णालयाच्या जागेवर विस्तारित ठाणे स्थानकाचा विचार अनेक वर्षांपासून केला जात आहे. रेल्वे आणि मेट्रो यांचे एकत्रित स्थानक या भागात उभे राहावे यासाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय मध्यंतरी महापालिकेने घेतला. मात्र, मनोरुग्णालयाच्या जागेच्या हस्तांतरणाचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे. काँग्रेस आघाडी सरकार असताना हा प्रश्न जाणीवपूर्वक ताणला जात असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. आता केंद्र आणि राज्यात युतीचे राज्य आहे. त्यामुळे आता  विस्तारित स्थानकाचा प्रश्न पुढे सरकतो का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

लोकप्रतिनिधींचे अपयश..
ठाणे स्थानकाचा पायाभूत सुविधांचा मुळापासून विकास व्हावा, अशी योजना काही अपवाद वगळले तर राजकीय वर्तुळात फारशी कुणी मांडली नाही. एखाद-दुसरा पूल अथवा सरकते जिने बसविले म्हणजे आपले काम झाले, अशा आविर्भावात स्थानिक लोकप्रतिनिधी वावरताना दिसतात. त्यामुळे विस्तारीत स्थानकासारख्या मूळ प्रश्नासाठी आक्रमकपणे पाठपुरावा होताना दिसत नाही. महापालिकेने यासंबंधी केलेल्या सर्वेक्षणाचे नेमके काय झाले याचे उत्तर येथील सत्ताधारी पक्षाचे नेतेही देताना दिसत नाहीत. या स्थानकावर आदळणारे प्रवाशांचे लोंढे कमी करण्यासाठी दुसरा पर्याय आखला जात नाही तोवर या सुविधांना अर्थ उरणार नाही.
श्रीकांत सावंत