लोकलच्या दारात बसून प्रवास करणारा एक तरुण डुलकी लागून पडल्याने जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी ठाणे-मुलुंडदरम्यान घडली. या तरुणाचे नाव नितीन पवार (३०) असून तो डोंबिवलीला राहणारा आहे. दरवाजात बसून प्रवास करणाऱ्या नितीनला चक्क झोप लागली. त्यातच तो धावत्या लोकलमधून बाहेर पडला.
ठाणे व मुलुंड दरम्यानच्या कोपरी पूल परिसरात दुपारी दोन वाजता ही विचित्र घटना घडली. त्यात हा तरुण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

आणखी एक अपघात
त्याच सुमारास दुपारी पावणेतीन वाजता ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील फलाट क्रमांक सहावर २५ वर्षांचा तरुण लोकलची धडक लागून जखमी झाला. त्यालाही उपचारांसाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले आहे. संध्याकाळपर्यंत तो बेशुद्धच होता. त्याची ओळख अद्याप पोलिसांना पटलेली नसून अधिक तपास सुरू आहे.