पावसाळ्यात प्रचंड पाऊस पडूनही उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या गर्तेत सापडणाऱ्या मलंगगड डोंगररांगांमध्ये वसलेल्या गावांच्या पाणी पुरवठय़ासाठी या परिसरात जलसंवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भागातील डोंगरउतारांवर सिमेंटचे पक्के बंधारे बांधण्यात येणार असून पायथ्याशी वनतलावांची निर्मिती करण्यात येणार आहे. वनविभागाने यास मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील अंतिम आराखडा आठ दिवसात तयार करण्यात येणार असून जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेने हे काम पूर्ण केले जाणार आहे. तर सध्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी तातडीचा उपाय म्हणून मलंगगडाच्या डोंगरावरून पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांमधील गाळ काढून त्यांचे खोलीकरण करण्याच्या कामाला शनिवारपासून सुरू करण्यात आली आहे.
मलंगगगड परिसरामध्ये मोठय़ाप्रमाणात पाऊस पडत असून अनेक मोठय़ा नद्यांचे उगमस्थान हा परिसर आहे. मात्र उन्हाळ्यात या नद्या आणि पावसाचे पाणी पाहून नेणारे नाले कोरडे पडून येथील २० हून अधिक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. मलगंगड परिसर तिव्र उताराचा असल्याने येथील पाणी आडवण्यामध्येही मोठय़ाप्रमाणात अडचणी येत आहेत. यापाश्र्वभुमीवर कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी वनवभिागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या ठिकाणी योग्य जागा निवडून पाण्याच्या प्रवाहाला प्रतिबंध केल्यास पाणी जमिनीत मुरेल आणि भूजल पातळी वाढेल. त्यामुळे परिसरातील कुपनलिकांमधील पाण्याची पातळी वाढून नागरिकांना मोठय़ा प्रमाणावर दिलासा मिळेल. त्यानुसार वनविभागाने काही जागा निश्चित केल्या असून येत्या आठ दिवसांत अंतिम आराखडा तयार होणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. या आराखडय़ानुसार जिल्हा नियोजन समितीकडून निधीची मंजुरी घेण्यात येईल. त्यानंतर हे काम पुर्ण करून पुढील वर्षांमध्ये या परिसरातील पाणी टंचाईचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. तर सध्या तातडीचा उपाय म्हणून पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या डोंगर उतारावरील नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे.

पावसाळ्यात वृक्ष लागवड मोहिम..
यंदाच्या पावसाळ्यात या परिसरात मोठय़ा प्रमाणावर वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेण्याची सूचनाही यावेळी खासदारांनी केली. १ जुलै रोजी राज्यभरात दोन कोटी झाडांची लागवड करण्याची मोहीम राज्य सरकारने आखली असून त्या अंतर्गत या पट्टय़ात अधिकाधिक झाडांची लागवड करण्यात आली. या बैठकीला उप वन संरक्षक किशोर ठाकरे, वनविभागाचे अन्य अधिकारी, जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आणि रोटरी इंटरनॅशनलचे जल व्यवस्थापन तज्ज्ञ मनोज माडगुळकर उपस्थित होते.