महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ठाणे शहराला होणाऱ्या पाणीपुरवठय़ात तब्बल ३० टक्क्यांची पाणीकपात लागू झाल्याने गुरुवार आणि शुक्रवार असे सलग दोन दिवस कळवा आणि मुंब्रा परिसराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
ठाणे महापालिका महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून दररोज सुमारे १०० एमएलडी इतके पाणी घेऊन कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसराला वितरित करत असते. यंदा कमी पावसामुळे बारवी धरणातील पाण्याची पातळी रोडावल्याने औद्योगिक विकास महामंडळाने ठाण्यासह सर्वच शहरांना करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठय़ात कपात केली आहे. पालिकेच्या पाणीपुरवठय़ात तब्बल ३० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. यामुळे कळवा, मुंब्रा, दिवा, बाळकुम पाडा क्र. १, कोलशेत या परिसराचा पाणीपुरवठा ४८ तास बंद राहील, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली. पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.